फोंडा: फोंडा पालिकेच्या आज (मंगळवारी) झालेल्या खास बैठकीत सोपो कराबरोबरच पालिका इमारतीतील दुकाने व कार्यालयांचा लिलाव, कचरा प्रश्नासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
पालिकेच्या बाजार तसेच बसस्थानक व इतर भागातील विक्रेत्यांकडून गोळा करण्यात येणाऱ्या सोपो करावर बरीच चर्चा झाली शेवटी येत्या मार्चपर्यंत साडेसात महिन्यांसाठी एकूण ३२ लाख रुपयांच्या सोपोची निविदा लवकरच जाहीर करण्याचे ठरले.
नगराध्यक्ष आनंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला. नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी बैठक बऱ्यापैकी हाताळली.
पालिकेच्या सोपोकरासंबंधीचा विषय बैठकीला चर्चेला आला असता मागच्या दोन लिलावात कुणीच भाग घेतला नसल्याने यावेळेला येत्या साडेसात महिन्यांसाठी ३२ लाखांची निविदा जाहीर करण्याचे ठरले. पालिकेच्या शेडमधील विक्रेत्यांकडून पालिका कर्मचारी सोपो गोळा करतात, त्यामुळे बाजाराबाहेरील विक्रेत्यांकडून हा सोपो कर गोळा करण्यात येणार आहे.
पालिकेच्या मार्केट इमारतीतील दुकाने व कार्यालयांचाही लीलाव करण्याचे ठरले. या इमारतीत एकूण १५४ दुकाने, ४० कार्यालये, दोन स्टॉल्स व एक सभागृह आहे. लिलावाच्या निर्णयावर मासिक भाडे किती आकारणार असा प्रश्न माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी उपस्थित केला. मार्केट प्रकल्पातील दुकाने व कार्यालयांचा लिलाव करताना ‘फेसवाईज'' वरच्या मजल्यापासून सुरुवात करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
पालिका क्षेत्रातील घरोघर कचरा गोळा करण्याचे कंत्राट येत्या सप्टेंबरमध्ये संपते त्यामुळे हा करार राज्य वेस्ट मॅनेजमेंट निधी किंवा पालिकेच्या इतर निधीतून करावा काय, यासंबंधीही चर्चा झाली. सध्याच्या पालिका इमारतीच्या जवळच उभारण्यात येणाऱ्या इमारतीत आणखी दोन मजले बांधण्याचा विचारही बैठकीत झाला.
यासंबंधीची मागणी पालिका संचालनालयाकडे करण्यासंबंधी ठरले. पालिकेची ही नूतन इमारत येत्या १९ डिसेंबरला उद्घाटन करण्याचा मानस असल्याची माहितीही नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी दिली. या बैठकीला नगरसेवकांसोबत पालिका मुख्याधिकारी योगिराज गोसावी, पालिका अभियंता विशांत नाईक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
पालिका इमारतीतील दुकाने पाहण्यासाठी उद्या १ ऑगस्ट ते १० ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी मार्केट इमारत खुली करण्यात येणार आहे. या इमारतीत आता सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात तीन लिफ्ट सेवा, विजेचे काम, व्यवस्थित आच्छादन आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याशिवाय वरच्या मजल्यावर अद्ययावत असे सभागृह उपलब्ध करण्यात आले असून त्यात नागरिकांना एखादा कार्यक्रम करण्यासाठी हे सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या इमारतीतील दुकानांचा लिलाव करण्यात येणार असून मागच्या लिलावांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता शेवटचा उपाय पालिकेने घेतला असून त्यासाठी दुकाने व मार्केट परिसर पाहण्यासाठी लोकांना ही इमारत दहा दिवसांसाठी खुले असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.