फोंडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काल शुक्रवारी मतदान झाले. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी कमी मतदान झाले. त्यात पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले. निवडणुकीवेळी सर्व उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ झाली. आता रविवारी (७ मे) रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
मतदानावेळी झालेल्या धावपळीनंतर आज शनिवारी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुट्टीचा दिवस निवांत घालविला. मात्र हातात मतदारयादी घेऊन आकडेमोड करायला हे उमेदवार विसरले नाहीत.
आपल्याला किती व प्रतिस्पर्ध्याला किती मतदान होईल, याची आकडेमोड करताना आपणच जिंकणार असा दावा ठोकायलाही ते मागे राहिले नाहीत. पत्रकारांशी संवाद साधताना आपल्यालाच भरघोस मते पडल्याचे बहुतांश उमेदवारांनी सांगितले. तरीसुद्धा उद्या रविवारी होणाऱ्या निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
फोंडा पालिकेच्या या निवडणुकीत भाजप पुरस्कृत फोंडा नागरिक समिती आणि रायझिंग फोंडा असे दोन गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. काँग्रेसपुरस्कृत तीन उमेदवारही जिंकण्याची इर्षा बाळगून आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपल्यालाच जिंकण्याची जास्त संधी असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रवी नाईक बिनधास्त
फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक मतदानानंतर बिनधास्त दिसले. फोंड्याचे मतदार सुज्ञ आहेत आणि त्यांनी फोंड्याच्या विकासालाच मतदान केले असल्याचा दावा त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात आणि केंद्रात असल्याने फोंडा नगरपालिकेच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध होईल असे सांगताना आपण त्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.