मिलिंद म्हाडगुत
फोंडा पालिका निवडणुकीचा निकाल आज लागणार असून दुपारी बारापर्यंत स्थिती स्पष्ट होणार आहे. यावेळी १३ प्रभागांत ४३ उमेदवार असून मतदान सरासरी ७५ टक्के झालेले आहे. दोन प्रभागांतील उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. ४३ उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल. काही प्रभागांत धक्कादायक निकालांचीही शक्यता आहे.
२०१८ साली झालेल्या पालिका निवडणुकीत ८५ टक्के मतदान झाले होते. त्यामानाने यावेळी मतदानाची टक्केवारी बरीच घसरल्याचे दिसले. साखळी पालिका निवडणुकीत ८७ टक्के मतदान होत असताना, फोंड्यात कमी झालेल्या टक्केवारीने एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तरी पण निकालाबाबत उत्साह कायम आहे.
आज दिवसभर ‘कोण जिंकणार?’ यावर चर्चा सुरू होती. प्रत्येक जण आपापल्या परीने निकालाचा अंदाज बांधताना दिसत होता. काहीजण तर छातीठोकपणे अमुकच निवडून येणार असे सांगताना दिसले. अनेक तर्कवितर्क, अनेक ‘जरतर’ची समीकरणे बांधली जात होती.
मतदारांचा कानोसा काय सांगतोय?
विविध प्रभागांतील मतदारांचा आज दिवसभर कानोसा घेतल्यावर काही प्रभागांतील चित्र स्पष्ट झाले तर काही अधांतरीच राहिले. सर्वाधिक ८१ टक्के मतदान झालेल्या प्रभाग एकमध्ये भाजपचे रॉय रवी नाईक, दोन मध्ये भाजपचे वीरेंद्र ढवळीकर तर प्रभाग तीनमध्ये भाजपच्याच ज्योती नाईक या आघाडीवर असल्याचे दिसते.
प्रभाग चारमध्ये अपक्ष उमेदवार व्यंकटेश नाईक यांचे पारडे जड दिसत असून पाचमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत नगराध्यक्ष रितेश नाईक हे कमी फरकाने का होईना, पण बाजी मारतील असा होरा व्यक्त होत आहे. प्रभाग सहामध्ये भाजपचे शौनक बोरकर हे आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
आठमध्ये ‘रायझिंग फोंडा’च्या ॲड. प्रतीक्षा नाईक या पुढे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्वांत कमी मतदान (६९ टक्के) झालेल्या प्रभाग नऊमध्ये ‘काँटे की टक्कर’ असून माजी नगरसेवक व्हिन्सेंट फर्नांडिस हे ‘डेंजर झोन’ मध्ये असल्यासारखे दिसत आहेत. भाजपचे रुपक देसाई यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केलेले आहे.
प्रभाग दहामध्ये तशीच स्थिती असून विद्यमान नगरसेवक शांताराम कोलवेकर यांची पत्नी दीपा या बाजी मारतात काय, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘रायझिंग फोंडा’च्या मनस्वी मामलेदार या त्यांना आव्हान देत आहेत. भाजपने हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनवला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांनीही येथे प्रचार केला होता. त्यामुळे कोलवेकरांचे वजन थोडे वाढल्यासारखे झाले आहे.
प्रभाग ११ मध्ये काँग्रेसच्या शुभलक्ष्मी शिंक्रे या पुढे असून १२ मध्ये काँग्रेसचे विराज सप्रे हे ‘रायझिंग फोंडा’च्या शिवानंद सावंत यांना धोबीपछाड देऊ शकतात असा तर्क व्यक्त केला जात आहे. प्रभाग १४ मध्ये भाजपचे आनंद नाईक यांचा विजय निश्चित मानला जात असून पंधरामध्ये भाजपच्या संपदा नाईक या दोन वेळा निवडून आलेल्या नगरसेविका गीताली तळावलीकर यांच्यावर मात करून धक्कादायक निकाल नोंदवू शकतात. अर्थात हा मतदारांचा कानोसा घेतल्यानंतरचा अंदाज आहे.
सुदिन ढवळीकरांची तटस्थ भूमिका
यावेळी खरी लढत आहे ती भाजपच्या फोंडा नागरिक समिती व रायझिंग फोंडामध्ये. गेल्या पालिका निवडणुकीत ‘रायझिंग फोंडा’ने सर्वाधिक ७ जागा मिळविल्या होत्या. भाजपच्या फोंडा नागरिक समितीला ५ जागांवर समाधान मानावे लागले होते.
नंतर दोघांची युती होऊन नगराध्यक्ष ‘रायझिंग फोंडा’चा तर उपनगराध्यक्ष फोंडा नागरिक समितीचा होऊन मंडळ स्थापन झाले होते. त्यावेळी ‘रायझिंग फोंडा’च्या यशात मंत्री सुदिन ढवळीकरांचा सिंहाचा वाटा होता. पण यावेळी ढवळीकरांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे सर्व भार फोंड्याचे मगोचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना उचलावा लागला.
डॉ. भाटीकर यांची अस्तित्वासाठी लढाई
भाजपने यावेळी आपली सर्व शक्ती पणाला लावल्याचे दिसून आले. दोन नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आल्यामुळे भाजपचे निकालापूर्वीच खाते खोलले आहे. काँग्रेसलाही दोन-तीन जागांची अपेक्षा असून काही प्रभागांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पण खरा सामना आहे तो १३ जागा लढवणाऱ्या भाजप व १२ जागा लढवणाऱ्या ‘रायझिंग फोंडा’मध्येच.
विधानसभा निवडणुकीत केवळ ७७ मतांनी पराभूत झालेल्या डॉ. केतन भाटीकर यांना आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवायचे आहे, तर पहिल्यांदाच फोंडा मतदारसंघ काबीज केलेल्या भाजपला आपले स्थान अधिक बळकट करावयाचे आहे.
पुढील राजकारणाची दिशा आज ठरणार
विधानसभा निवडणुकीत ६८६० मते प्राप्त केलेले काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनाही आपली शक्ती दाखवून द्यायची आहे. आता या वर्चस्वाच्या स्पर्धेत कोण ‘सिकंदर’ ठरतो याचे उत्तर आज दुपारपर्यंत मिळणार आहे. निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून ‘खुल जा सिम सिम’ असे म्हणत आज हा निकालाचा पेटारा उघडणार आहे. त्यातून जे काही हाती लागेल, त्यावरच आगामी राजकारण अवलंबून असेल.
मतदान कमी होण्याची कारणे अनेक
यावेळी फोंड्यात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. प्रभागांची पुनर्रचना काहींना मानवली नाही. एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या प्रभागात टाकल्यामुळे काहींचा गोंधळ उडाल्यामुळेही त्यांनी मतदानापासून दूर राहण्याचे ठरविले असल्याचे काही मतदारांनी सांगितले.
फोंडा सोडून दूर ठिकाणी राहायला गेलेले काही मतदार मतदानाला न आल्यामुळे टक्केवारी घसरली असेही समजते. ते कुठे राहायला गेले हे न कळल्यामुळे उमेदवारांनाही त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण बनले होते. त्याचाही परिणाम झालाच.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.