Ponda By Election: 'मी रिंगणात उतरणार'! भाटीकरांचे आव्हान; फोंडा पोटनिवडणुकीवर कुर्टी झेडपीची छाया, भाजप उमेदवारी कोणाला?

Ponda Politics: कुर्टी झेडपी मतदारसंघ हा फोंडा विधानसभा मतदारसंघात येत असल्यामुळे या झेडपी निवडणुकीत मिळालेली मते पोटनिवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकतात, असे बोलले जात आहे.
Ponda By Election
Ponda By ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: आता जिल्हा पंचायत निवडणुका संपल्यानंतर सगळ्या पक्षांचे विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित झाले आहे. तत्पूर्वी फोंडा पोटनिवडणूक होणार असल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय घडामोडींना सुरवात झाली आहे. कुर्टी झेडपी मतदारसंघ हा फोंडा विधानसभा मतदारसंघात येत असल्यामुळे या झेडपी निवडणुकीत मिळालेली मते पोटनिवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकतात, असे बोलले जात आहे.

कुर्टी झेडपीत खांडेपार पंचायतीबरोबर वेरे-वाघुर्मे पंचायतही येत असल्यामुळे त्या पंचायतीत मिळालेली मते वजा करून फक्त खांडेपार पंचायतीत मते किती मिळाली याची आकडे मोजणी सध्या केली जात आहे. या निवडणुकीत भाजप जरी जिंकला असला तरी डॉ. केतन भाटीकर यांनी रिंगणात उतरविलेला अपक्ष उमेदवारही फार मागे नाही.

भाजपला या मतदारसंघात ६,४९४ मते मिळाली असून भाटीकरांच्या अपक्ष उमेदवाराला ५,६३७ मते प्राप्त झाली आहेत. यामुळे भाजपची आघाडी ८५७ ठरत असली तरी वेरे पंचायत वजा केल्यास खांडेपार पंचायतीत ही आघाडी २८७ एवढी कमी होते. हे पाहता भाजपच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा ठरू शकते.

आगामी पोटनिवडणुकीतही भाटीकर रिंगणात उतरणार असल्यामुळे तुल्यबळ लढतीचे संकेत आतापासूनच मिळायला लागले आहेत. कुर्टी झेडपी निवडणुकीत काँग्रेसला फक्त १,८७८ मते मिळाल्यामुळे कुर्टी झेडपीप्रमाणे आगामी पोटनिवडणुकीतही भाजप विरुद्ध भाटीकर अशी लढत होण्याची शक्यता सध्या व्यक्त होत आहे. यामुळे फोंडा पोटनिवडणूक जाहीर न होऊनही या मतदारसंघातील राजकीय वातावरण तप्त व्हायला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत त्याला धार चढणार, हे निश्चित आहे.

भाजप उमेदवारी कोणाला?

फोंडा पोटनिवडणुकीची भाजप उमेदवारी कोणाला, हे अजून निश्चित झालेले नाही. दक्षिण गोवा भाजपचे सचिव विश्वनाथ दळवी व दिवंगत रवी नाईक पुत्र रितेश हे भाजप उमेदवारीचे प्रमुख दावेदार असून या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार की, एखाद्या तिसऱ्याचा नंबर लागतो, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दळवी वा रितेश या दोघांपैकी कोणा एकाला उमेदवारी दिल्यास दुसऱ्याचे कार्यकर्ते त्याला पाठिंबा देतील की काय, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

भाजपसमोर भाटीकरांचे आव्हान

या झेडपी निवडणुकीत भाजपच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सर्व नेत्यांनी आक्रमक प्रचार करूनही तसेच सर्व प्रचार यंत्रणा विरोधात असूनही केतन भाटीकरांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराने साडेपाच हजारांहून अधिक मते घेतल्यामुळे तो सध्या फोंडा भागात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे फोंड्याची आगामी पोटनिवडणूक भाजपकरता पूर्वी वाटत होती तेवढी सोपी नाही, असेही संकेत मिळायला लागले आहेत.

Ponda By Election
Goa Politics: खरी कुजबुज; ...म्हणून पालेकरांच्या हाती नारळ!

मी रिंगणात उतरणार!

फोंडा पोटनिवडणुकीत मी रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. कुर्टी जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्व राज्यस्तरीय तसेच स्थानिक नेते व यंत्रणा माझ्याविरोधात असूनही माझ्या अपक्ष उमेदवाराने जवळजवळ पावणेसहा हजार मते घेतल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला असून त्यामुळे येणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीला तोंड देण्यास मी सज्ज झालो आहे. पक्षाच्या उमेदवारीवर की अपक्ष लढणार याचे उत्तर आणखी काही दिवसांत मिळेल, असे डॉ. केतन भाटीकर यांनी सांगितले.

Ponda By Election
Goa Politics: त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का'! मंत्री ढवळीकरांची RGP वर टीका, Watch Video

श्रेष्ठी उमेदवार ठरवतील!

भाजप पक्षाची एक निवडणूक प्रक्रिया असते आणि त्याप्रमाणे उमेदवाराची निवड केली जाते. या प्रक्रियेप्रमाणे भाजपचे श्रेष्ठी फोंडा पोटनिवडणुकीकरता उमेदवाराची निवड करतील. आणि ज्याची निवड होईल त्याला विजयी करणे ही फोड्याच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांची जबाबदारी असेल, असे भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव विश्वनाथ दळवी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com