Goa Politics: खरी कुजबुज; ...म्हणून पालेकरांच्या हाती नारळ!

Khari Kujbuj Political Satire: किनारी भागातील सर्व गोष्टी साफ केल्या पाहिजेत अशी जोरजोरात भूमिका मांडणारे आमदार मायकल लोबो अलीकडे त्याविषयावर का बोलत नाहीत अशी विचारणा होऊ लागली आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मायकल लोबो गप्‍प का?

मध्यंतरी किनारी भागातील सर्व गोष्टी साफ केल्या पाहिजेत अशी जोरजोरात भूमिका मांडणारे आमदार मायकल लोबो अलीकडे त्याविषयावर का बोलत नाहीत अशी विचारणा होऊ लागली आहे. लोबो यांनी सुरवातीला अशा गोष्टी आपणास ठाऊकच नाहीत असे सांगण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्यांनी लोबो यांना लेखी स्वरूपात सारेकाही कळवले होते हे जाहीर केल्यानंतर लोबो यांनी या विषयावर फारसे भाष्य केलेले नाही. आता दंडाधिकाऱ्यांकरवी झालेल्या चौकशीचा अहवालही सरकारला मिळाला आहे. लोबो यांच्या शांततेमागे ते कारण असावे की काय अशी शंका व्यक्त होताना दिसत आहे. ∙∙∙

थिवी मतदारसंघाची चर्चा

जिल्हा पंचायत निवडणुकीत माजी मंत्री किरण कांदोळकर यांनी कविता कांदोळकर यांना निवडून आणले. थिवी मतदारसंघात मंत्री नीळकंठ हळर्णकर भाजपचे प्रतिनिधित्व करतात. ते भाजपचा उमेदवार तेथे निवडून आणू शकले नाहीत. याची दखल प्रदेश पातळीवर घेण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीवर हा निकाल कसा परिणाम करेल याचा अभ्यास केला जात आहे. त्यामुळे हळर्णकर यांना आता मेहनत घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कदाचित भाजप थिवीत वेगळा विचार करेल अशीही चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. ∙∙∙

...म्हणून पालेकरांच्या हाती नारळ!

आम आदमी पक्षाने जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागताच ‘आप’चे राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांना पदावरून हटवले. तडकाफडकी त्यांच्या केलेल्या या उचलबांगडीविषयी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यात भंडारी समाजाचा टक्का अधिक असल्याने त्याचा फायदा पक्षाला होईल म्हणून पालेकर यांच्याकडे राज्याची धुरा दिली होती, परंतु भंडारी समाजीची मते अपेक्षेप्रमाणे ते पक्षाकडे वळवू शकले नाहीत असे दिसते. जिल्हा पंचायतीची निवडणूक खऱ्या अर्थाने ‘आप’ने प्रतिष्ठेची केली. कारण एक महिना अगोदरच त्यांनी पक्षाचा प्रचार सुरू केला होता. विविध आंदोलनामार्फत ते लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु पक्षाला या निवडणुकीत मतदारांनी पूर्णतः झिडकारले. विशेषतः बाणावलीत त्यांचा आमदार असतानाही तेथील जिल्हा पंचायत जागा त्यांना जिंकता आली नाही. या सर्व बाबी पालेकरांच्या हातात नारळ देण्यासाठी पुरेशा होत्या, असे कदाचित राष्ट्रीय नेत्यांना वाटले असावे आणि कोणालाही कल्पना नसताना त्यांनी त्यांना बाजूला केले. अजूनपर्यंत ते पक्षात असले तरी भविष्याचा विचार करून २०२६ मध्ये पालेकर वेगळ्याच ठिकाणी असू शकतात. ∙∙∙

फुकट प्रवासाची मौज

कोकण रेल्वे मार्गाने अनेक रेल्वे ये जा करत असतात. तिकीट काढून हा प्रवास करणे अपेक्षित असतानाच एका नोव्हेंबर महिन्यात तब्बल ४२ हजार ९६५ फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले आहे. सर्वच फुकटे प्रवासी पकडले जातात असे नव्हे. त्यामुळे हा आकडा वाढलेलाही असू शकतो. फुकट्या प्रवाशांकडून दंड म्हणून २ कोटी ३३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. यावरून कोकण रेल्वे मार्गावर फुकट प्रवाशांची किती मौज चालली होती हे लक्षात येते. आता रेल्वेत बसण्यापूर्वी तिकीट तपासण्याची काही व्यवस्था रेल्वे आणणार का असा प्रश्न त्यामुळे चर्चेत आला आहे. ∙∙∙

जेन-झी पिढीचे नेतृत्व

गोवा विद्यापीठ निवडणुकीत एनएसयूआयने पंधरा वर्षानंतर एकहाती सत्ता मिळविली, परंतु या यशाचे खरे शिलेदार माध्यमांसमोर कधी आलेच नाहीत किंवा आमच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले असा बडेजावपणाही कधीच कोणी मारताना दिसले नाही. अभाविपला चारीमुंड्या चीत करून केवळ एक प्रतिनिधी वगळता सर्व प्रतिनिधी निवडून आणणे ही सामान्य गोष्ट नाही. हे जेन-झी पिढीच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्यच मानावे लागेल. पक्षांच्या श्रेष्ठींनी त्यांची पाठ निश्‍चितपणे थोपटली आहे. गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी देखील या कामगिरीबाबत आपल्या शिलेदारांचे कौतुक केले आहे, परंतु येत्या काळात २०२७ साली होणाऱ्या गोवा विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर युवकांना कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्डकडे आणण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देणे जरुरीचे असल्याचे बोलले जात आहे. जेन-झी पिढी कशी विचार करते, त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, विचारसरणीची माहिती असलेल्या नेत्यांना पुढे करणे, त्यांना राजकीय व्यासपीठ देणे गरजेचे असल्याची चर्चा आता गोवा विद्यापीठ स्तरावर रंगू लागली आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का'! मंत्री ढवळीकरांची RGP वर टीका, Watch Video

‘मगो’ची पालिकेची तयारी

मगोने जिल्हा पंचायत निवडणुकीत तीनपैकी तीन जागा जिंकल्यानंतर आता पालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपसोबतची युती पालिका निवडणुकीतही कायम असेल असे सांगत पालिका निवडणुकीतील जागा पदरात पाडून घेण्याचा मगोचा विचार आहे. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मगोसारख्या प्रादेशिक पक्षांना देणग्या मिळत नाहीत, राष्ट्रीय पक्षांना शंभर कोटींच्या पटीत देणग्या मिळतात असे सांगून मगोच्या आर्थिक ताकदीवर प्रकाश टाकला तरी मगो पालिका निवडणुकीच्या माध्यमातून पालिकांत चंचुप्रवेश करण्याची तयारी करत आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: मैत्रीत 'दगा' की राजकारणाची 'मजा'? भाजपच्या बालेकिल्ल्यात मगोचा शिरकाव; युतीचे समीकरण धोक्यात!

खात्याची लक्तरे चव्हाट्यावर

गोवा छोटे राज्य आणि त्या राज्यातील पोलिस यंत्रणा फार सुसज्ज हवी होती, अजूनही पोलिस स्थानकांना स्वतःच्या इमारती मिळाल्या नाहीत. याशिवाय दुसरीकडे ज्या पोलिस स्थानकांना वाहने दिली जातात, त्या वाहनांची स्थिती काही वर्षांनी खात्याप्रमाणेच खिळखिळी झालेली दिसते. कारण शुक्रवारी खात्याकडून पोलिसांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा कसा बोजवारा उडाला होता, ते दिसून आले. पेडणेतील सर्व्हिस रस्त्यावर अमलीपदार्थ कायद्यातील (एनडीपीएस) एका आरोपीला कोलवाळ येथील न्यायालयीन कोठडीत नेत असताना गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वाहन बंद पडले. या वाहनाचे सस्पेंशन धावत्या गाडीतच निखळले. त्यामुळे आरोपी, एक पोलिस शिपाई आणि चालक आत असताना गाडी थांबली. आरोपीला सुरक्षित वाहतुकीसाठी एएनसीच्या (अँटी-नार्कोटिक्स सेल) वाहनात हलवावे लागले. वाहनाची स्थिती पाहिल्यानंतर ते किती सुरक्षीत आहे, याचा विचार न केलेला बरा. खात्याने किमान यातून काहीतरी बोध घ्यावा, एवढेच. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com