

फोंडा: ज्येष्ठ नेते रवी नाईक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या फोंडा मतदारसंघाच्या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. मगो नेते केतन भाटीकरांनी निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर आता काँग्रेसने देखील चाचपणी सुरु केल्याची माहिती समोर आलीये. पोटनिवडणूक आणि उमेदवारी याबाबत रवींचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांनी आज (०३ नोव्हेंबर) रोजी फोंडा येथील बाबा रवी नाईक यांच्या कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी रितेश यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मी आणि भाऊ रॉय देघेही आम्ही बाबांचा वारसा पुढे घेऊन जाऊ, असे रितेश नाईक यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी उमेदवारीबाबत देखील भाष्य केले.
फोंड्यात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत भाजप नेते निर्णय घेतील, असे रितेश नाईख म्हणाले. रॉय किंवा मी दोघेही बाबांचा विकासाचा वारसा पुढे घेऊन जाऊ, असे रितेश म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील गेल्या आठवड्यात उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेणार असल्याचे म्हणत चेंडू पक्षाच्या कोर्टात टाकला होता. आता रवींचे दोन्ही पुत्र या लढाईसाठी तयार असल्याचे निश्चित झाले असून, अंतिम निर्णय मात्र पक्षाकडे सोपविण्यात आला आहे.
मगो नेते केतन भाटीकरांनी फोंडा पोट निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युतीच्या तिकीटावर नाहीतर अपक्ष का होईना पण निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी सुदीन ढवळीकर देखील समर्थन देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे काँग्रेस देखील या निवडणुकीत नशीब आजमावू शकते, अशी शक्यता आहे.
स्थानिक काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी फोंडा निवडणूक लढण्याची इच्छा एका मुलाखतीतून व्यक्त केली आहे. काँग्रेसने याबाबत अधिकृत भाष्य केले नसले तरी वेरेनकर इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे फोंड्याची पोटनिवडणूक दुरंगी किंवा तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे. २०२२ मध्ये रवी नाईक यांच्याविरोधात केतन भाटीकर आणि राजेश वेरेकरांनी निवडणूक लढवली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.