Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Ponda By Election 2026: भाजपनेही काँग्रेसला घेरण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यात येत आहेत.
Ponda by election
Ponda by electionDainik Gomatnak
Published on
Updated on

फोंडा : फोंडा पोटनिवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडून एकमेकांची कोंडी करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून प्रचाराला अधिक धार आली आहे.

शोषण प्रकरण चर्चेत आहे. हे प्रकरण भाजपशी जोडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. काही छायाचित्रांच्या आधारे हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे.

यावर भाजपचे माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी सोहम नाईक किंवा त्याचे वडील नगरसेवक सुशांत नाईक यांचा भाजपशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी हे आव्हान स्वीकारत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. हा विषय थेट फोंड्याशी संबंधित नसला तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

दुसरीकडे भाजपनेही काँग्रेसला घेरण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ काही महिन्यांसाठी होणारी ही पोटनिवडणूक व्यापक राजकीय रंग घेऊ लागली आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी या निवडणुकीत स्वतः लक्ष घातले आहे.

काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा आणि कार्लुस फेरेरा हे प्रचारात सक्रिय झाले आहेत. कोपरा बैठकांतून पक्षाची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार ‘रस्सीखेच’ सुरू झाली आहे. ‘इनफ इज इनफ’ या चळवळीतील ‘३९-अ’ प्रकरणही निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न होत आहेत.

दुसरीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचे निर्देश पक्ष कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत या कोपरा बैठका घेऊन महिलांना मार्गदर्शन करत आहेत.

एकंदरीत, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आक्रमक भूमिकेत असून दररोज बदलणाऱ्या घडामोडींमुळे वातावरण अधिकच रंगतदार बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूकही मागील विधानसभा निवडणुकीसारखी अटीतटीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निकाल कमी फरकाने लागण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

गोविंद गावडे यांना गुरु-शिष्य नात्याची जाणीव!

माजी मंत्री तथा प्रियोळचे विद्यमान आमदार गोविंद गावडे हे दिवंगत रवी नाईक यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संपर्क साधून संवाद वाढवताना दिसत आहेत. रवी नाईक हे आपले राजकीय गुरू असल्याची आठवण करून देत, त्यांचे पुत्र रितेश यांना पुढे आणण्याबाबत भावनिक साद घालत आहेत. या प्रयत्नांतून गुरु-शिष्य नात्याची जाणीव अधोरेखित होत असल्याचे जाणवते.

Ponda by election
Ponda By Election: दळवींच्या कार्यकर्त्यांपुढे प्रश्नचिन्ह! अन्‍याय झाल्‍याची भावना; रितेश नाईकांपुढे मोठे आव्हान

२००२ च्या निवडणुकीची आठवण

सध्याच्या राजकीय वातावरणामुळे अनेकांना २००२ सालच्या निवडणुकीची आठवण होत आहे. त्यावेळी रवी नाईक आणि श्रीपाद नाईक यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. त्या निवडणुकीने फोंड्याचे राजकारण ढवळून निघाले होते. यंदाही तसाच चुरशीचा सामना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निकालासाठी ४ मेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Ponda by election
रवी नाईकांचा वारसा की केतन भाटीकरांचे जनबळ? फोंड्यात वर्चस्वाची लढाई - संपादकीय

‘आप’चा घरोघरी प्रचार

या निवडणुकीत आम आदमी पक्ष तिसरा पर्याय म्हणून समोर आला आहे. त्यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. उमेदवार गीतेश नाईक आणि कार्यकर्ते ‘आठ महिन्यांसाठी एक संधी द्या’ असे आवाहन मतदारांना करत आहेत. या प्रचाराचा मतदारांवर कितपत प्रभाव पडतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com