Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यासाठी दामू नाईक उमेदवार!

Goa Latest Political News: बाणावलीत आमचा उमेदवार कुठल्‍याही परिस्‍थितीत जिंकेल असा आम आदमीचे नेते छातीठोकपणे दावा करायचे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

फोंड्यासाठी दामू नाईक उमेदवार!

माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंडात पोटनिवडणूक मार्च - एप्रिल महिन्यात शक्य आहे. या पोटनिवडणुकीसाठी रवी नाईक यांचे पुत्र रितेश - रॉय यांच्यासह डॉ. केतन भाटीकर, विश्र्वानाथ दळवी, राजेश वेरेकर, यांच्या नावांची चर्चा भाजप, कॉंग्रेसमधून सुरु आहे. अधून मधून अॅड. नरेंद्र सावईकर यांच्या नावाची भर पडते. आता तर चक्क भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे उमेदवार होऊ शकतील काय? याची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते. जोपर्यंत भाजप, काँग्रेस व मगो पक्षाकडून उमेदवार निश्र्चित होत नाही, तोपर्यंत अशी अनेक नावे पुढे येत राहणार आहे. पण दामू नाईक फोंड्यात हे तर्कात बसत नाही. पत्रकाराने त्याबद्दल दामू नाईक यांना विचारले तेव्हा ते सुद्धा आश्र्चर्यचकीत झाले. आपल्या नावाची चर्चा होत आहे, हे आपण तुमच्याकडूनच ऐकत आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले खरे, पण शेवटी भाजप कोणाच्या गळ्यात माळ घालेल, हे सांगता येत नाही. दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपने घेतलेला निर्णयच बघा ना, जो अनअपेक्षित व आश्चर्यचकीत करणाराच होता असे लोक अजूनही बोलतात. ∙∙∙

मायकल काय करत होते?

हडफडेचे बडतर्फ सरपंच रोशन रेडकर यांनी किती ना हरकत दाखले दिले, किती इमारत दुरूस्तीच्या परवान्यांवर सह्या केल्या याची आकडेवारी आता खुद्द कळंगुटचे आमदार मायकल लोबो जाहीर करत आहेत. त्यांना रेडकर यांना दडून न राहता तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. रेडकर यांनी खुशाल आपल्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी पण लपून राहू नये असे लोबो यांचे म्हणणे आहे. एवढे सारे होत असताना, रेडकर पटापट दाखले, परवानग्या यांच्यावर सह्या ठोकत असताना लोबो यांना त्याची साधी माहितीही कशी मिळाली नाही अशी विचारणा आता होऊ लागली आहे. ∙∙∙

कुंकळ्ळीतून नव्या क्रांतीची नवी सकाळ?

माणूस यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतरही शेवटी त्याला आपल्या जन्मभूमीची आठवण होतेच. कुंकळ्ळीचे सुपुत्र माजी आमदार व सेवा निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी गोवा रक्षणाची हाक दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश रिबेलो हे १९७७ ते १९८० पर्यंत कुंकळ्ळीचे आमदार होते. जनता पक्षाच्या उमेदवारीवर ते निवडून आले होते. नंतर न्यायाधीश झाल्यावर त्यांचा कुंकळ्ळीशी संपर्क तुटला होता. आता रिबेलो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोकात आले आहेत. गोवा बचाव आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे. कुंकळ्ळीच्या माजी आमदाराला विद्यमान आमदार युरी आलेमाव यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याचा अर्थ कुंकळ्ळीतून नव्या क्रांतीची ‘नवी सकाळ’ उगवणार आहे, असे लोक म्हणू लागले आहेत. स्वराज्याचा प्रथम लढा कुंकळळीत झाला होता. जनमत कौलाची ज्योत कुंकळळीतून काढण्यात आली होती. या क्रांतिवीरांच्या भूमीतून नवी क्रांती यशस्वी होणार का? येणारा काळच ठरविणार. ∙∙∙

बाणावलीतील अदृश्य फॅमिलीराज

बाणावलीत आमचा उमेदवार कुठल्‍याही परिस्‍थितीत जिंकेल असा आम आदमीचे नेते छातीठोकपणे दावा करायचे. बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांनी बाणावली हा मतदारसंघ जिंकणार हे गृहीत धरून कोलवा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. पण बाणावलीचा मतदारसंघ गमवावा लागला. आता भांबावलेले ‘आप''चे नेते फॅमिलीराजमुळे आपला बाणावलीत पराभव स्‍वीकारावा लागला, असे सांगू लागले आहेत आणि त्‍यामुळे लोकही भांबावून गेले आहेत. याचे कारण म्‍हणजे, बाणावलीतून जिंकून आलेल्‍या काँग्रेसच्‍या उमेदवाराला कुठलीही फॅमिलीराजची पार्श्वभूमी नाही आणि आपच्‍या उमेदवारालाही. मग बाणावलीत फॅमिलीराजचा मुद्दा आलाच कसा? वेंझी आणि इतरांना कुठल्‍या एका राजकीय कुटुंबाला या पराभवासाठी दोषी धरायचे नाही ना? ∙∙∙

युरींचे वरातीमागून घोडे!

युरी आलेमाव यांनी ३ जानेवारीला आपण सातही विरोधी आमदारांची बैठक घेणार असे जाहीर केले. पण काही पत्रकार पर्वरीत गेले असता केवळ युरीबाब व आमदार कार्लोस फेरेरा त्यांना भेटले. आप, गोवा फॉरवर्डचे सोडा, काँग्रेसचेच एल्टनबाब या बैठकीस आले नाहीत. एल्टन म्हणे केपेत दोन अपघात झाल्याने येऊ शकले नाहीत, असे युरींचे उत्तर. तर आमदार विजय सरदेसाई गोव्याबाहेर आहेत, असे सांगत युरीबाबनी वेळ मारून नेण्याचा केविलवाना प्रयत्न केला. खरे म्हणजे महत्त्वाचे असे तारांकित व अतारांकीत प्रश्न मांडण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर असताना तसेच खासगी विधेयक व ठराव दाखल करण्याची मुदत १ जानेवारीला संपली असताना त्यानंतर बैठक घेऊन काय फायदा? यावरून युरींचे ‘वरातीमागून घोडे’, असे प्रकार सुरू झालेत काय असे राजकीय विश्लेषकांना वाटणे साहजिकच आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: 'राज्यात हुकूमशाही कारभार सुरु'! LOP आलेमाव यांचे टीकास्त्र; हडफडे प्रकरणाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

काँग्रेस - गोवा फॉरवर्ड युती!

मडगावचे विद्यमान आमदार व मंत्री दिगंबर कामत हे एवढे बलवान आहेत, की त्यांचा पाडाव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. मडगावत बलवान कोण? हे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा मडगावात प्रवेश करण्याचा इरादा आहे, तसे त्यांनी बोलून दाखवले आहे. नगरपालिका निवडणूक ही त्यासाठी योग्य मुहूर्त आहे, असे सरदेसाई यांचे समर्थक बोलतात. गोवा फॉरवर्ड व काँग्रेस एकत्र येण्यासाठी इच्छुक आहे, हे या दोन्ही पक्षांतील नेते, कार्यकर्ते यांच्या बोलण्यातून दिसते. पण मडगाव काँग्रेसमध्ये दोन प्रवाह आढळतात. एक प्रवाह सावियो कुतिन्होच्या तर दुसरा चिराग नायक यांच्या मागे आहे. त्यामुळे विजयबाबांना याचा सुद्धा सारासार विचार करावा लागेल, अशी चर्चा सुद्धा लोकांमध्ये सुरू आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; युरीला ‘भायलो’ म्हणणारे बनले युरी समर्थक !

डीपीच्या हालचाली सुरू!

यावर्षी मडगाव पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. नगरसेवक बनण्यासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आतापासूनच तयार झाले आहेत. त्यात नव्या चेहऱ्याबरोबर जुन्याचाही समावेश आहे बर का? बड्डे प्रभागातील माजी नगरसेवक दुर्गादास प्रभू ऊर्फ डीपी यांचाही यात समावेश आहे. तूर्त त्यांनी फातोर्ड्यातील दोन प्रभागात आपले लक्ष केंद्रित केले आहे. डीपी एकेकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक याचे जिवलग मित्र. मात्र आता त्याच्यात पराकोटीचा छत्तीसाचा आकडा आहे. स्वत डीपी अजूनही आपण भाजपवाले म्हणतात, मात्र पालिका निवडणूक कुणाच्या पॅनलवर लढविणार हे मात्र सांगत नाहीत. कदाचित ते यावेळी वेगळी चूल मांडू शकतात. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी फातोर्ड्यात फॉरवर्डसाठी काम केले होते हा इतिहास अजूनही ताजा आहे. ‘समजने वाले को इशारा काफी है!’ ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com