BJP: पंजाबमधील नियुक्तीने फुटीर सुखावले 'खरी कुजबूज'

BJP: पंजाबमधील काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेतले आहे.
BJP | Congress
BJP | CongressDainik Gomantak
Published on
Updated on

BJP: काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आठ आमदारांना मंत्रिपदे आणि महामंडळे मिळणार याबाबत गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ केवळ चर्चाच होत आहे. या दरम्यानच पंजाबमधील काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेतले आहे.

कारण तेथे भाजपची सत्ता नाही. मात्र, या नियुक्त्यांनी राज्यातील फुटीर सुखावले आहेत. त्यांनाही लाभाची पदे देण्याची सूचना पक्षाच्या केंद्रीय कमिटीने केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचे सुखावणे साहजिकच मानावे लागेल. कारण गेल्या काही महिन्यांपासून ते पदांची आशा बाळगून आहेत.

मोपाला पर्रीकरांचे नाव?

उत्तर गोव्यात उभारलेल्या मोपा विमानतळाला कुणाचे नाव द्यायचे याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात खल सुरू आहे. विमुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोपा विमानतळाला द्यावे, अशी मागणी पेडणे भागातून केली जात आहे. त्यानंतर मोपाला जॅक सिक्वेरा, टी. बी. कुन्हा यापैकी एकाचे नाव द्यावे अशी मागणीही काही नेत्यांनी केली होती.

मात्र, भाजपने या विमानतळाला स्व. मनोहर पर्रीकर यांचेच नाव द्यावे असा गुपचूप प्रस्ताव केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठविला आहे आणि त्यांनीही या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोपा विमानतळाला पर्रीकरांचे नाव मिळणार असल्याने पर्रीकरप्रेमी खूष आहेत.

BJP | Congress
Goa Corona Update: गोव्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने, शनिवारी केवळ एक नवीन रूग्ण

सभेला गर्दी जमविण्याची सक्ती!

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला राज्यात येत आहेत. यावेळी ते अनेक प्रकल्पांचे उद्‍घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यासाठी मोदी यांच्या पणजी आणि मोपा येथे दोन जाहीर सभा होणार आहेत. या सभांना 20 हजार नागरिक जमतील अशी अपेक्षा भाजपने धरली आहे.

अर्थात यासाठीच त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, नेते, मंडल अध्यक्ष, आमदार आणि मंत्र्यांना गर्दीचे टार्गेट देण्यात आले आहे. या सभा यशस्वी झाल्याच पाहिजेत असा सज्जड दमही पक्षाने दिला आहे. करणार काय, लोकसभेची निवडणूक तर जवळ येत आहे आणि तीही जिंकायची आहे. त्यामुळेच पक्षाचा हा खटाटोप सुरू आहे.

भावी उपनिरीक्षकांची प्रतीक्षा संपली...

‘सब्र का फल मिठा होता है’ असे म्हणतात ते खरे. पोलिस खात्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड होऊनही गेले अनेक महिने नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या त्या 112 पुरुष व 23 महिला पोलिस उपनिरीक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली.

पोलिस अधीक्षक एस. एम. प्रभुदेसाई यांनी यासंदर्भात नव्या आदेशात निवडलेल्या पोलिस निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे. खरे म्हणजे चार महिन्यांपूर्वीच या निवडलेल्या पोलिस उपनिरीक्षकांना नेमणूक पत्र देऊन प्रशिक्षणास पाठविले असते.

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी पोलिस उपनिरीक्षक भरतीत घोटाळा असल्याचा आरोप केल्यामुळे सरकारने या निवड प्रक्रियेची चौकशी केली होती. आता सरकारने त्या निवडलेल्या युवकांची वाट मोकळी केली आहे. प्रतीक्षेत असलेले हे भावी पोलिस निरीक्षक आता खूष असले, तरी विजयबाब मात्र दुःखी आहेत.

सत्तेची नशा

2022 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांना नागरिकांनी घरी पाठवून त्यांच्या जागी नवीन नेत्यांना संधी दिली होती. तरी देखील माजी आमदार अजूनही आपणच आमदार असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या मतदारसंघात पाहणीसाठी एखादा मंत्री येत असल्यास तेथे उपस्थित राहून जणू आपणच आमदार असल्यासारखे ही मंडळी भासवतात.

असे अनेक प्रकार घडले असून विद्यमान आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. घरी पाठवले असले तरी माजी आमदारांची सत्तेची नशा काही कमी होत नाही अशी चर्चा सुरू आहे.

पोलिसांची टाळाटाळ!

कळंगुट परिसरात एका विदेशी महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याची माहिती मिळविण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी हे पोलिसांशी संपर्क साधत होते. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित असे सहकार्य मिळत नव्हते. रात्री उशिरा माहिती दिली, परंतु ती अपूर्ण होती.

मुळात पोलिसांनी प्रेस घेऊन ही माहिती देणे अपेक्षित होती! परंतु पोलिस अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते फोन उचलत नव्हते किंवा संदेशालाही उत्तर देत नव्हते. एरवी हीच मंडळी लहान गुन्ह्याचे सविस्तर प्रसिद्धी पत्रक काढून मोठा गाजावाजा करीत माहिती देतात.

कमी ग्रॅमचा अमलीपदार्थ जप्त केल्यावरसुद्धा संशयितासोबत फोटो काढून ही पोलिस मंडळी मोठा पराक्रम केल्यासारखे छायाचित्र काढून माहिती देतात. परंतु अशा महत्त्वाच्या घटनावेळी अपेक्षित सहकार्य माध्यमांच्या प्रतिनिधींना देत नाहीत! लैंगिक अत्याचार ही घटना संवेदनशील असून लोकांपर्यंत अचूक माहिती पोहोचावी ही जबाबदारी जितकी माध्यमांची तेवढीच पोलिसांची. त्यामुळे किमान भविष्यात तरी पोलिसांकडून माहिती देण्याबाबत सहकार्य मिळणार एवढीच अपेक्षा!

BJP | Congress
Goa: हॉटेलच्या खोलीत झोपले असताना...पीडित रशियन तरुणीने सांगितली आपबीती

‘त्यांची’ घोर निराशा...

गुजरातमधील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आपल्यालाही संधी मिळेल, या आनंदाच्या भरात गोव्यातील भाजपचे 15 नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले होते. त्यांनी पत्रकारांनाही मोठमोठ्या गमजा मारून बातम्या छापून आणल्या होत्या.

मात्र, प्रत्यक्षात झाले वेगळेच... गोव्यातून केवळ एकट्यालाच गुजरातमध्ये प्रचारासाठी जाण्याची संधी मिळाली अन् ती म्हणजे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना... त्यामुळे इतरांची काय अवस्था झाली असेल, हे सांगायची गरज नाही. असे असतानाही हे सर्व नेते ‘आपल्यालाही प्रचारासाठी बोलाविण्यात आले होते’ असे मोठ्या थाटात सांगत आहेत. त्यांना न बोलावण्यामागचे कारणही उघड झाले आहे.

ज्यांना हिंदी भाषा व्यवस्थित अवगत नाही, त्यांना तर गुजरातला आणूच नका असे पक्षाकडून थेट सांगण्यात आल्याची चर्चा आहे. एका नेत्याने तर म्हणे ‘आपल्याला निवडणुकीसाठी गोव्याचा प्रभारी नेमला जाणार’ अशी बातमी पसरविली होती. विशेष म्हणजे काही वृत्तपत्रांनी ती प्रसिद्धही केली होती (गोमन्तक नव्हे). त्यामुळे हा विषय आता चांगलाच चर्चिला जात आहे.

कसे होणार विरोधी ऐक्य?

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा तथा प्रामुख्याने नरेंद्र मोदींविरुध्द सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या इराद्याने राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा हाती घेतली आहे ती जरी गोव्यात आलेली नसली, तरी महाराष्ट्र व कर्नाटक सोडून तब्बल मध्यप्रदेशात जाऊन गोव्यातील काही बिगर भाजप मंडळी त्यात सहभागी झाली.

त्यामुळे येथील भाजपविरोधकांना हर्षोल्हास होणे स्वाभाविक आहे, पण त्यानंतर दोनच दिवसात काहीजण आपच्या बाणावलीतील आमदारावर करू लागलेल्या टीकेमुळे त्यांचा हा आनंद क्षणभंगुर तर ठरणार नाही ना अशी चिंता काँग्रेस गोटातून व्यक्त केली जाऊ लागली आहे. व्हेंझी बाबांनी साळ नदी प्रदूषण मुक्तीसाठी सुचविलेल्या दिल्ली जल बोर्ड प्रस्तावाबाबत काही मंडळींनी अशीच नाके मुरडली होती. अशाने भाजपविरोधी ऐक्य होणार कसे?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com