
पणजी : भाजप सरकारने राजधानी पणजीत कॅसिनोंना प्रोत्साहन दिले असून, आता हा 'विषाणू' गावोगावी पसरवला जात आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी व्यक्त केली. आता शेतजमीन विकून गावोगावी हा विषाणू पसरवला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
धारगळ-पेडणे येथे रिसॉर्ट डेव्हलपमेंट प्रकल्प उभारण्यासाठी डेल्टा कॉर्प लिमिटेडला अधिसूचित कमांड एरिया डेव्हलपमेंट ऑथोरिटीची ३.३३ लाख चौरस मीटर जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, यावरून आलेमाव यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांकडून जमीन हिसकावून धारगळ येथील कॅसिनोला दिली आहे. कॅसिनोच्या वापरासाठी शेतजमीन दिली जात आहे ह्या सरकारच्या निर्णयाचा मी निषेध करतो,’’ असे आलेमाव म्हणाले.
भाजप सरकारला मांडवीमधील कॅसिनो हलवण्यास अपयश आले आहे. आता धारगळमध्ये डेल्टा आणण्यास मदत केल्याने स्पष्ट होत आहे की हे सरकार भ्रष्टाचार आणि कॅसिनोला प्रोत्साहन देत आहे.
भाजपने कॅसिनोला प्रोत्साहन देऊन आणि मांडवीत नवीन कॅसिनो आमंत्रित करून पणजीत कित्येक समस्या तयार केल्या आहेत. आता त्यांचे लक्ष येथील गावावर आहे. सर्वांनी भाजप सरकारच्या ह्या जमीन विकण्याच्या व इतर गोष्टीं विरुद्ध एकत्र येवून लढायला हवे,” असे आलेमाव यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
भाजप सरकारने शेतकऱ्यांचा महसूल दुप्पट करण्याचे वचन दिले होते, पण त्यांच्याकडूनच उत्पादनासाठीची जमीन हिसकावली जात आहे. मांडवी नदीला जुगाराच्या क्षेत्रात बदलल्यानंतर, आता हे भ्रष्ट सरकार आमच्या गावाना जुगाराच्या क्षेत्रात बदलत आहे. गोव्यात आधीच अमली पदार्थांची समस्या आहे. अमली पदार्थ आता गावागावात व कॅसिनोतही पोहचले आहे,’ असे त्यांनी सांगितले.
धारगळ आणि आसपासच्या गावांना पारंपारिक उपजीविकांवर अवलंबून राहावे लागते आणि त्यांनी बंधुत्व व गावपण जपले आहे. या क्षेत्रांमध्ये कॅसीनो आल्यास परंपरा व संस्कृतीची हानी होईल, असे आलेमाव म्हणाले.
भाजपने गोव्याची ’फास्ट ट्रॅक’ विक्री सुरू केली आहे. यामुळे आपल्या तरुणांचे भविष्य बिघडेल. धारगळ येथील जमीन कॅसिनोच्या वापरासाठी देणे म्हणजे जल सुरक्षा, कृषी आणि जैवविविधतेला धोका आहे. सरकारने हा निर्णय रद्द करावा,’’ असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.