

पेडणे : पेडणे तालुक्यात संमिश्र निकाल लागला आहे. हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राधिका उदय पालयेकर यांनी अनपेक्षित विजय मिळविला. तर मोरजी, धारगळ आणि तोरसे या तीन मतदारसंघांत भाजप व मित्रपक्षांना यश मिळाले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी पुष्पहार घालून, गुलाल उधळत आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. काही ठिकाणी मिरवणुकाही काढण्यात आल्या.
महिलांसाठी राखीव असलेल्या हरमल मतदारसंघात अपक्ष उमेदवार राधिका उदय पालयेकर यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्यांना ४७८४ मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार मनीषा संतोष कोरखणकर यांना ४७३० मते मिळाली. नेट्टी फर्नांडिस (काँग्रेस), श्रुतिका श्याम शेट्ये (अपक्ष) व जेसिंता डिसोझा (आरजी) या अन्य उमेदवार होत्या. दरम्यान, विजयानंतर बोलताना राधिका पालयेकर म्हणाल्या, हा विजय माझ्यासाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून, महत्त्वाचे निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतले जातील.
ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या मोरजी मतदारसंघात मगोच्या तारा बाबूसो हडफडकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना ६०८३ मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी गोवा फॉरवर्डच्या उमेदवार शिल्पा संजय म्हामल यांना २५९७ मते प्राप्त झाली. प्रियंका शिवानंद दाभोळकर (काँग्रेस), सुवर्णा उत्तम हरमलकर (आप) आणि सामिया बालाजी कान्नाईक (अपक्ष) या अन्य उमेदवार रिंगणात होत्या. दरम्यान, विजयानंतर तारा हडफडकर म्हणाल्या, हा विजय म्हणजे माझ्या सामाजिक कार्याची आणि आमदार जीत आरोलकर तसेच मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. या विश्वासाला मी नक्कीच जागेन.
धारगळ मतदारसंघात भाजपचे श्रीकृष्ण रवींद्र हरमलकर यांनी ५०६५ मतांची आघाडी घेऊन विजयाला गवसणी घातली. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर यशवंत शिवजी यांना १८४० मते मिळाली. अनिकेत गोकुळदास साळगावकर (गोवा फॉरवर्ड), रामा वासुदेव नाईक (अपक्ष), अनिल शंकर हरमलकर (रिव्हॉल्युशनरी गोवन्स), ॲड. प्रसाद कमलाकर शहापूरकर (आप), उदय कृष्णा मांद्रेकर (अपक्ष) हे अन्य उमेदवार होते. दरम्यान, विजयानंतर श्रीकृष्ण हरमलकर म्हणाले, या विजयाचे श्रेय मी मतदारांना देतो. सर्वांचे आभार मानतो.
ओबीसीसाठी राखीव असलेल्या तोरसे मतदारसंघात भाजपचे राघोबा लाडू कांबळी यांनी विजय मिळवला. त्यांना ३७२५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार गजानन दत्ताराम गडेकर यांना ३४४८ मते प्राप्त झाली. प्रदीप पुरुषोत्तम कांबळी (अपक्ष), नारायण गोविंद शिरोडकर (आरजी), केशव लाडको कांबळी (आप) हे अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. विजयानंतर राघोबा कांबळी म्हणाले, या विजयाचे श्रेय मी मतदारांबरोबरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व कार्यकर्त्यांना देतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.