पणजी: गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) चे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी फातोर्डा येथून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. आगामी निवडणूक काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पार्टी एकत्रित लढणार आहे. (Goa Election Vijay Sardesai News)
काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टीची युती ही एकमेव विश्वासार्ह, लोकप्रिय आणि मजबूत राजकीय शक्ती आहे जी गोव्यातून भाजप (BJP) सरकारला हद्दपार करू शकते, असा विश्वास विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी दर्शवला.
पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, गोमंतकीय एकजुटीने आणि उत्साहाने आम्हाला मतदान करतील. गोव्याला ‘भ्रष्टाचारी’ भारतीय जनता पार्टी पासून वाचवण्याचा निर्णय गोवावासीयांनी फार पूर्वीच घेतला आहे. यासाठी ते आम्हाला पाठिंबा देतील.
सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई आणि मडगावचे नगरसेवक रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या नावाचा प्रस्ताव मडगाव नगर परिषदेचे (एमएमसी) अध्यक्ष लिंडन परेरा यांनी मांडला होता. गोवा फॉरवर्डच्या संतोष कुमार सावंत यांनी मयेतून तर दीपक कलंगुटकर यांनी मांद्रे मतदारसंघातून गुरुवारी अर्ज भरला.
“गोव्याचे मतदार हुशार आणि राजकीय जाणकार आहेत. त्यांना कुणाला मत द्यायचे हे माहिती आहे. ते भाजपच्या बी-टीमला मतदान करणार नाहीत. तृणमूल काँग्रेसने प्रमोद सावंत आणि भाजपपेक्षा विरोधकांवर आणि विशेषत: आमच्यावर हल्ला करण्यात जास्त वेळ आणि मेहनत खर्च केली आहे," सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.