Fake RTO Challan: पार्सलचा बहाणा, चलनाचा धाक! सायबर ठगांचा आर्थिक हल्ला; कॉल फॉरवर्डिंग, एपीके फाइलच्या माध्यमातून गंडा

Fake RTO Traffic Challan: पार्सल डिलिव्हरी आणि वाहतूक चलनाच्या नावाने नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत.
Fake RTO Traffic Challan
Fake RTO ChallanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पार्सल डिलिव्हरी आणि वाहतूक चलनाच्या नावाने नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. सायबर भामटे आता नागरिकांच्या घाईगडबडीबरोबरच त्यांच्या मनातील भीतीचाही गैरफायदा घेत आहेत.

पार्सलच्या नावाने फोन करून मोबाईलवरील कॉल फॉरवर्डिंग सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर दुसरीकडे एआय कॅमेऱ्यांमुळे चलनाची भीती असलेल्या वाहनचालकांना बनावट ‘आरटीओ ट्रॅफिक चलन’ पाठवून एपीके फाइल डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जात आहे.

‘पार्सल कंपनीतून बोलत आहे. डिलिव्हरी बॉयला तुमचा पत्ता दिसत नाही. त्याला फोन करून पत्ता सांगा,’ असे सांगून नागरिकांना एका विशिष्ट क्रमांकावर फोन करण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर पाठविलेला क्रमांक डायल करताच मोबाईलवरील कॉल फॉरवर्डिंग सुरू केले जाते. यामुळे संबंधित व्यक्तीला येणारे कॉल सायबर भामट्यांच्या क्रमांकावर वळविले जातात.

Fake RTO Traffic Challan
Goa POCSO Case: पोक्सो प्रकरणात 26 वर्षीय युवक निर्दोष; डीएनए अहवाल ठरला महत्त्वाचा पुरावा

१४ ऑगस्ट रोजी अशाच प्रकारचा कॉल एका प्रतिनिधीलाही आला. सुरुवातीला कोणताही संशय न आल्याने त्याने डिलिव्हरी बॉयचा क्रमांक पाठविण्यास सांगितले. काही मिनिटांनी आलेला क्रमांक पाहिल्यानंतर मात्र त्याला संशय आला. या क्रमांकाची सुरुवात *21* अशी होती आणि शेवटी # चिन्ह होते. त्यामुळे हा नेहमीचा मोबाईल क्रमांक नसल्याचे त्याच्या लक्षात आले. प्रतिनिधीने तत्काळ मोबाईल बंद केला. मात्र, त्यानंतरही कॉल फॉरवर्डिंग सुरू असल्याचे लक्षात आले.

चलनाच्या भीतीचा फायदा

राज्यात एआय कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन नोंदविले जात असल्याने वाहनचालकांमध्ये चलनाची धास्ती वाढली आहे. याचाच फायदा घेत सायबर भामटे बनावट वाहतूक चलन पाठवून नागरिकांना लक्ष्य करत आहेत. पोलिसांच्या छायाचित्रासह ‘आरटीओ ट्रॅफिक चलन’ असा उल्लेख असलेले संदेश व्हॉट्सॲपवर पाठविले जात आहेत.

या संदेशामध्ये चलन क्रमांक, तारीख, उल्लंघनाचे ठिकाण आणि दंडाची रक्कम यांसारखी माहिती देऊन तो अधिकृत असल्याचा भास निर्माण केला जातो. त्यानंतर दंडाची रक्कम तातडीने भरण्याच्या नावाखाली एपीके फाइल पाठविली जाते. ही फाइल डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यास संवेदनशील माहिती सायबर भामट्यांच्या हाती जाण्याबरोबरच बँक खात्यातील रक्कम धोक्यात येऊ शकते. भारत सरकारच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवरही संशयास्पद लिंक, फोन क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि इतर सायबर-संबंधित घटकांची तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पणजीतील एका नागरिकाला अशाच प्रकारचे बनावट चलन व्हॉट्सॲपवर प्राप्त झाले. मात्र, संदेशासोबत एपीके फाइल असल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिकाने ती डाउनलोड केली नाही. त्यामुळे संभाव्य आर्थिक फसवणूक टळली.

Fake RTO Traffic Challan
Goa Cricket Association: अनधिकृत क्रिकेट स्पर्धांत खेळणे महागात पडणार; 'जीसीए'चा नोंदणीकृत खेळाडूंना कडक इशारा

एपीके फाइल म्हणजे धोक्याची घंटा

‘दंडाची रक्कम तातडीने भरा’, असा दबाव निर्माण करून नागरिकांना एपीके फाइल उघडण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे वाहतूक चलनाचा संदेश आला तरी त्यातील लिंक किंवा एपीके फाइलवर क्लिक अथवा डाउनलोड करण्यापूर्वी त्याची अधिकृतता तपासणे आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करू नये. राष्ट्रीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रानेही संशयास्पद एपीके फाइल्स व बनावट ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांना सावध केले आहे.

१९३० वर तक्रार

कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्यास सायबर भामटे संबंधित व्यक्तीच्या नावाने इतरांना फोन करून पैशांची मागणी करू शकतात. मोबाईलवर येणारे संदेशही त्यांच्या हाती लागल्यास ओटीपीचा गैरवापर करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या घटनेनंतर प्रतिनिधीने तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. तसेच ऑनलाइन तक्रारही नोंदविण्यात आली.

Fake RTO Traffic Challan
Goa Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; 'त्या' तिघांच्या जामिनावर 18 रोजी निकाल, आव्हान याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण

काय घ्याल काळजी?

पार्सल किंवा कुरिअरच्या नावाने अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास घाईघाईने कोणताही क्रमांक डायल करू नका किंवा असलेला संशयास्पद क्रमांक डायल करू नका.

पार्सलची माहिती संबंधित कुरिअर कंपनीच्या अधिकृत क्रमांकावरून तपासा.

वाहतूक चलनाच्या नावाने आलेली एपीके फाइल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका.

व्हॉट्सॲपवर आलेल्या संशयास्पद लिंक किंवा फाइल उघडू नका.

ऑनलाइन ऑर्डरची माहिती कुटुंबातील अन्य सदस्यांना द्या.

मोबाईलमध्ये अचानक कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने ते बंद करा.

कोणत्याही संशयास्पद सायबर व्यवहाराची माहिती तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर द्या. ऑनलाइन तक्रार राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवरही नोंदविता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com