Goa Politics: खरी कुजबुज, स्मार्ट कामे; वाहनचालकांना दणके!

Khari Kujbuj Political Satire: एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुप्तचर पोलिस कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

स्मार्ट कामे; वाहनचालकांना दणके!

पणजीतील रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. कुठे तरी रस्ते गुळगुळीत झालेले दिसत असताना जागोजागी मलनिस्सारणची चेंबर्स डांबरीकरणामुळे झाकली गेलीत. त्यामुळे डांबरीकरण केलेल्या रस्त्यांचे पुन्हा खोदकाम सुरू झाले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करण्यापूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदाराला ही चेंबर्स उंच करणे शक्य होते, मात्र अशी वारंवार कामे करण्यामागचा उद्देशच कळत नाही. एक तर कामाचे नियोजनशून्य असल्याने ही अशी सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी घिसाडघाईने ही कामे केली जातील, मात्र ऐन पावसाळ्यात या कामांच्या दर्जाचा पर्दाफाश होणार आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या आरपार असलेली गटारांचा भाग डांबरीकरणामुळे खाली राहिला आहे. तेथे डांबरीकरण केलेले नाही त्यामुळे दुचाकीस्वारांना या चरीमध्ये दणके बसत आहेत. या कामांचा बट्ट्याबोळ झाल्याने त्याचे परिणाम मात्र वाहन चालकांना भोगावे लागत आहेत. गुळगुळीत रस्त्यांचे काम मात्र नियोजनशून्य पद्धतीने होत असल्याने वारंवार हे रस्ते खोदण्याचे काम कधी संपणार? ∙∙∙

दरोडा तपास; अपयश उघड

दोनापावल दरोड्याला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिस यंत्रणा अजूनही शोधच घेत आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुप्तचर पोलिस कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. खुद्द पोलिस उपअधीक्षक व निरीक्षकांना कामाला लावले आहे. तपासकामात पहिले ४८ तास महत्वाचे असतात, त्यामुळे जसजसे दिवस वाढत जाऊन धागेदोरे मिळेणासे झाले तसेच पोलिस यंत्रणेचे अवसानही गळू लागले आहे. क्राईम ब्रँच व जिल्हा पोलिस मदतीने ही शोध मोहीम सुरू आहे. तपासात काही धागेदोरे व दिशाच मिळाली नाही. हळुहळू या दरोडेखोरांना गजाआड करण्याचे प्रयत्नही निष्फळ होत आहेत. दरोडेखोर दरोडा घातल्यानंतर एकत्रित न जाता विखरून गेले तर त्यांचा माग काढणे मुष्कील झाले. दरोडेखोरांनी लूट केल्यानंतर कोणतेही पुरावे मागे ठेवले नाहीत. अपयश लपवण्यासाठी धागेदोरे सापडले असून प्रयत्न सुरू आहे, असे मुळमुळीत उत्तर वरिष्ठांकडून दिले जात आहे. ∙∙∙

बाबूशचा मार्मिक टोला!

बाबूश आणि स्मार्ट सिटीचा विषय म्हणजे विळ्या-भोपळ्याप्रमाणे वाद आहे. स्मार्ट सिटीवर बोलायचे झाल्यास बाबूश यांनी पूर्वी नाराजीच व्यक्त केली आहे. परंतु सध्या पणजीच्या परंतु स्मार्ट सिटीअंतर्गत न येणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम जोमात सुरू आहे. आल्तिनो, भाटलेतील रस्त्यांवर डांबर पडल्याने रस्ते खड्डेमुक्त होत आहेत, असे दिसते. फक्त आता भाटलेतील आणि मळ्यातील काही रस्त्यांवर डांबर पडायचे बाकी आहे. या कामाविषयी बाबूश यांना कोणी विचारले नाही, तेव्हा मंत्रालयातून बाहेर पडणाऱ्या बाबूश यांनी स्मार्ट सिटीच्या कामावर बोलण्यापेक्षा रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाचा उल्लेख करा, असा सल्ला पत्रकारांना दिला. त्यामुळे बाबूश यांना नक्की काय सांगायचे आहे, हे कदाचित उपस्थितांना समजले असणार. ∙∙∙

दामूंचे समांतर सत्ताकेंद्र

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंग शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. यामुळे शिव वॉरियर टॅक्सी संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी खरेतर स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर किंवा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे धाव घेणे अपेक्षित होते. त्यांनी तसे न करता भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली. दामू यांनीही त्यांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यामुळे दामू यांच्या पक्षांतर्गत नेतृत्वाची दखल आता बाह्य घटकही घेऊ लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. असे असले तरी, निरीक्षक म्हणतात, की दामूंनी कला अकादमी प्रकरणात खरेच कारवाई घडवून आणली तर त्यांचे वजन आणखी वाढणार आहे! ∙∙∙

विद्यार्थिप्रिय काब्राल!

‘पोके फार मारप’, असा कोकणीत एक वाकप्रचार आहे.काही राजकारण्यांना असे फुकटचे बोल बोलण्याचा सवय असते.करायचे काही नाही बाता मात्र मारायच्या मोठ्या.कुडचडेचे भावी आमदार म्हणून अनेकांची नावे पुढे येत आहेत. मात्र सामाजिक कार्यात विशेष करून विद्यार्थ्यांना मदत करण्यात कुडचडे मतदार संघात आमदार नीलेश काब्राल जे काम करतात ते आणखी कोणाला जमणार नाही, हे सत्य आहे. काब्राल मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत वह्या वाटतात. ‘काब्राल यंदा वह्या लवकर वाटा’ अशी कुजबूज प्रसिद्ध होताच काब्राल यांनी मार्चमध्येच वह्या वाटल्या.काब्राल आपल्या मतदारसंघात उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करतात. यंदा त्यांनी सुमारे हजारभर विद्यार्थ्यांना उंची भेट देऊन सन्मान केला. शिवाय काब्राल चतुर्थी, दिवाळी, नरकासूर, शिगमा, ईद या सणांवेळीही मोठी मदत करतात. हे सगळे करतात म्हणून काब्राल सक्रिय राजकारणात टिकतात. आता विरोधक कितीही विरोध करोत, काब्राल शांतपणे काम करतात. याला म्हणतात ‘स्मार्ट पॉलिटिशयन’ ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; दिव्या राणे देणार ‘मोठे गिफ्ट’

वाढदिवसाची चर्चा!

पहलगाम (काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजप सरकारातील काही आमदारांना आपण वाढदिवस साजरा केला नाहीतर जगातील सर्व प्रक्रिया बंद पडतील, असे काहींना वाटत असावे. त्यामुळे देशात काही घडले तरी आपण आपला वाढदिवस दणक्यात साजरा करायचाच, असा जणू चंगच बांधला असावा असे वाटते. पहलगाम हल्ला झाल्यानंतर आमदार देविया राणे यांनी काजू महोत्सव पुढे ढकलल्याचे जाहीर केले. महोत्सवासाठी लागणारे सर्व साहित्य कांपालच्या बांदोडकर मार्गावरील बांदोडकर मैदानात आणून ठेवले होते. परंतु हा महोत्सव सध्या होणार नाही, तो काही काळासाठी पुढे ढकलला असल्याचे जाहीर केले. त्याशिवाय मगोपचे आमदार जित आरोलकरांनीही आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले. दुसरीकडे दिलायला लोबो यांनी स्वतःचा वाढदिवस मात्र दणक्यात साजरा केला.यावरून सध्या नेटकऱ्यांनी दिलायला लोबो यांच्यावर टीकेची संधी सोडलेली नाही. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, सरकारने मनात आणले तर...

लोबो मॅडम भाजपच्या ‘रंगात’ रंगल्या नाहीत?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस रद्द करून भाजपची विचारसरणी अन् समाजाप्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली. मात्र, याच दरम्यान भाजपच्या दुसऱ्या आमदार, दिलायला लोबो यांनी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा केला. आता कुणी आपला वाढदिवस कसा साजरा करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी, दिलायला मॅडम भाजपच्या आमदार असल्यामुळे या गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर, कोणताही नेता किंवा कार्यकर्ता खासगी आयुष्यात काय करतो, यावर टीका करणं योग्य नाही. पण जेव्हा मुख्यमंत्री पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडतात आणि दुसरीकडे पक्षाच्याच आमदार मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करतात, तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण तर होणारच ना! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com