
सरकारने मनात आणले तर काहीही शक्य असते. सरकारी नोकरीत टिकल्यानंतर आपल्याला काय त्याचे अशी मानसिकता बळावते असे म्हटले जाते. त्याला छेद देणारेही काहीजण असतात. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्णतः व्यावसायिकतेचे प्रदर्शन घडवत बुधवारी पर्वरी येथे भंगारात गेलेल्या वाहनांचा लिलाव पुकारला. प्रत्येक वाहनाचे वर्णन, किंमत याची माहिती स्पष्टपणे देणारे फलक वाहनाशेजारी लावले होते. आठवडाभरात तो परिसर त्यांनी स्वच्छ करून घेतला. शामियाना घातला आणि कार्यालयच तेथे थाटले. सर्वच प्रक्रिया जलदगतीने आणि नेमकेपणाने केल्यामुळे सर्व कामे वेळेत पार पडली. प्रत्येक व्यवहाराला गती लाभली. वाहतूक खात्याचे अधिकारी आणि विमा अधिकारी सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी तेथे असतील याची व्यवस्था केली. त्यामुळे दिवसभरात ३५ लाखांचा गल्ला या वाहन मेळ्यातून सरकारने जमवला. त्यामुळे सरकारने मनात आणले तर... काय होऊ शकते हे मात्र दिसून आले. अशा प्रकारे इतरही कामांना जलतपणे गती दिली तर काहीही शक्य आहे.
देशातील राजकारणाचे परिणाम गोव्यात ही दिसू लागले असून दामू नाईक यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले, तेव्हा ओबीसी आणि खास करून भंडारी समाजाला आपल्या बाजूने ठेवण्याचे प्रयत्न भाजपने केल्याचे दिसून आले. याचा फायदा भाजपला होत असून भंडारी समाजावर याचा प्रभाव झाल्याचे जाणवतो. जिल्हा पंचायत आणि नंतर विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भंडारी कार्ड खेळल्याची चर्चा ऐकू येते. ही खेळी इतर समाजात ही खेळली जाईल आणि याचा भरपूर लाभ पक्षाला होणार असल्याचा समज नेत्यांमध्ये झाला आहे. परिणामी भाजपची दूरदृष्टी या सगळ्यातून पुन्हा एकदा पाहायला मिळत असल्याने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला हा खेळ समजत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ∙
भोम रस्ता प्रकरणाचे शुक्लकाष्ठ सध्या सरकारच्या मागे लागले आहे. चौपदरी रस्ता गावातून नकोच, असा धोशा ग्रामस्थ लावत आहेत, तर गावातूनच रस्ता नेण्यावर सरकार ठाम आहे. पण एक गोष्ट आहे, ती म्हणजे पूर्ण भोम गाव एकसंध नाही, कुठे तरी शकले झाली आहेत, नेमका त्याचाच फायदा सरकार उठवू पाहत आहे. मात्र सध्या तरी आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे कुणाला गोंजारायचे आणि कुणाला दूर लोटायचे या संभ्रमात सरकार आहे. आता परत एकदा मुख्यमंत्री ग्रामस्थांसोबत बैठक घेणार आहेत. तेव्हा सरकारची कसोटी लागेल हे नक्की.
२५ रोजी कला अकादमीत ''चाणक्य'' हे नाटक सादर होणार आणि अर्थातच प्रेक्षक उपस्थिती लावणार की पाठ फिरवणार? याबाबत साशंकता आहे. कारण यापूर्वी शरद पोंक्षे यांच्या ''पुरुष'' आणि भारत जाधव यांच्या ''श्रीमंत दामोदर पंत'' नाटकाला कला अकादमीच्या तांत्रिक यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे दोन्ही वेळेला प्रेक्षकांना मनस्ताप झाला. त्यामुळे ‘चाणक्य’ला प्रेक्षक येणार का? असा प्रश्न आयोजकांना सतावत आहे. अजून प्रेक्षकांनी कला अकादमीकडे पाठ फिरवली नाही, म्हणून नाटके तरी होतात. पण प्रत्येक नाटकात व्यत्यय आला तर प्रेक्षक कदाचित पणजीपेक्षा इतर ठिकाणी नाटकाला जाणे पसंत करतील, अशी नाट्यप्रेमींत चर्चा सुरू आहे. ∙∙∙
राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत असल्याचा दावा करणाऱ्या गोवा पोलिसांसमोर दोनापावल येथील बंगल्यावर पडलेला दरोडा ही पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. तपासकामात स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी हतबल झाले आहेत. अजूनही काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत तरीही खात्याची प्रतिमा राखण्यासाठी धागेदोरे मिळाले असल्याचा दावा या अधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेला जात आहे. दरोडा पडल्याची घटना समजल्यानंतर पोलिसांनी त्याची माहिती उघडकीस आणून दिली नाही. पोलिसांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर येईल ही भीती होती म्हणून कोणी अधिकारीही माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे मोठ्या घटनांमध्ये पोलिसांकडून लपवाछपवीचे प्रकार घडतात हे नवीन नाही. दरोडेखोरांचा शोध घेऊ असे वाटत होते मात्र चार दिवस उलटून गेले आहेत व तपासकामाला दिशा सापडत नसल्याने नामुष्की ओढवली आहे. तपास सुरू असल्याचे सांगून टोलवाटोलवी केली जात आहे. या दरोड्यामुळे राज्यातील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
डिचोली मतदारसंघातील एका गावात वेगळ्या प्रकारचे राजकारण खेळले जात आहे. येथील एक नेता आणि त्याच्या भावाने गावाऱ्यांना राजकीय ऑफर दिली आहे. गावात देवीचे मंदिर असून त्याला शेड हवी असेल, तर निवडणुकीत आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल, अशी अट दोन्ही भावांनी घातल्याची समजते. मंदिराला पूर्वी एक भक्कम काँक्रीटची शेड असल्याने नवीन शेडची गरज कशाला असा प्रश्न गावकऱ्यांकडून विचारला जात आहे. देवीची सेवा केली, असे दाखवायचे आणि निवडणुकीत याचा राजकीय लाभ उठवण्याची संधी निर्माण होईल, अशी राजकीय खेळी करायची. परंतु जागृत गावकऱ्यांनी ही राजकीय खेळी ओळखल्याने दोन्ही भावांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले, अशी चर्चा ऐकू येते.
पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे दोघेही तुये येथील इस्पितळ लवकर सुरू करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांना निवडून येऊन आता तीन वर्षे पूर्ण झाली तरी कोणतीच प्रगती इस्पितळात झालेली नाही. त्यामुळे आमदार जर म्हणत असतील कि आम्ही प्रयत्न केले. तर ते स्वप्नात केले असतील म्हणून प्रत्यक्षात शून्य प्रगती दिसत आहे. लोकांच्या बोलण्यातूनही दोन्ही आमदारांवर टीका करण्यात येत आहे.ग्रामस्थ आम्हांला तुये इस्पितळ नकोच, असा नारा सुरू करत आहेत. हा नारा जर गाजला तर आमदार पूर्णपणे अपयशी असल्याचा ठपका त्यांच्यावर लागणार आहे.
नावेली मतदारसंघातील शांतीनगर भागात सोमवारी रात्री एका चायनीज रेस्टॅारंटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली आणि सर्वत्र एकच धावपळ उडाली. कारण ज्या भागांत ही घटना घडली, तो भाग दाट लोकवस्तीचा होता. वेळीच पावले उचलल्याने जरी जास्त हानी झालेली नसली तरी अशा प्रकारे मिळेल, तेथे अशी जी रेस्टॅारंटे सुरू झाली आहेत. त्यांच्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा आता सुरू आहे. मडगाव व सभोवतालच्या भागात निवासी इमारतींतही अशी रेस्टॅारंट चालू झालेली असून त्यांना कोणत्याच यंत्रणेचा परवाना नाही, एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी उघड्यावरही असे खाद्यपदार्थ बनविले जातात व विकतात. एखादी दुर्घटना घडल्यावर धावपळ करून कोणावर गुन्हा नोंदविण्या ऐवजी त्याबाबत सुरूवातीलाच पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल ग्रामस्थांतर्फे केला जात आहे.
पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला. त्यावरून भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी टिप्पणी केली. त्याला कॉंग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काश्मिरमधील या घटनेने राजकारणाला गती मिळाली आहे. कॉंग्रेस आणि भाजपने आपापल्या कार्यालयात अतिरेकी हल्ल्यांत जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या मुद्यावर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असताना राजकीय आरोप प्रत्यारोपासाठी याचा वापर होताना दिसत आहे. सत्य, न्याय आणि जनतेच्या हितासाठी लढत राहणे हे राजकीय पक्षाचे काम असते. त्याचा विसर पडावा अशा पातळीवर आता टीका टिप्पणी होऊ लागली आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षातर्फे शुक्रवारी दक्षिण गोव्यात विविध भागात म्हणे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याबाबत मॅाक ड्रिल केले जाणार आहे. त्याबाबत लोकांनाही सतर्क केले गेले आहे. प्रत्यक्षात ही एक चांगली बाब आहे, पण तोंडावर आलेला पावसाळा व नगरपालिका क्षेत्र वगळल्यास पंचायत क्षेत्रांत पावसाळापूर्व कामांबाबत असलेल्या उदासीनतेबाबत जागृत रहिवासी सवाल करू लागले आहेत. विशेषतः मडगाव सभोवतालच्या सासष्टी तालुक्यांतील ग्रामपंचायतीत गटार व नाल्यांचा उपसा अजून झालेला नाही, अनेक पंचायतीत गेल्या पावसाळ्यांत उन्मळून पडलेली झाडे तशीच आहेत, अनेक भागांतील गटारे कच-याने भरलेली आहेत. अकस्मात पावसाने हजेरी लावली व गटारे तुंबून रस्ते पाण्याखाली गेले, लोकांच्या घरात पाणी शिरले तर यंत्रणा काय करणार? अशी विचारणा होऊ लागली असून त्यासाठी या मॅाक ड्रिलपूर्वी जिल्हाधिकारी यंत्रणेने पंचायत परिसरांचा फेरफटका मारावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.