पणजी: गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या प्रार्दुभावामुळे निर्माण झालेली मरगळ झटकून राजधानी पणजी आज ढोल ताशांच्या निनादाने दुमदुमली. ‘ओस्सय ओस्सयचा गजर, घोडमोडणी, रोमटामेळ पथ, गोफ, धनगरी गजानृत्य, विविध कलाकारांनी साकारलेल्या वेषभूषा व चित्ररथाच्या मिरवणुकीने राजधानी पणजीत चैतन्याचे तसेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. संध्याकाळी 5 वाजता श्री सावरेश्वर व काळभैरवाचरणी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पणजी शिगमोत्सव समितीतर्फे श्रीफळ अर्पण करून तसेच भगवा ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, माजी आमदार दामू नाइक, शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
संस्कृतीचे घडले दर्शन
शिगमोत्सव मिरवणुकीतून गोमंतकीय लोककलांचे दर्शन घडून आले. सरस्वती कला मंडळ केळबाय कुर्टी तसेच यशलीला कल्चरल असोसिएशनद्वारे घोडेमोडणी, श्री गुरूकला मंडळ, पिजगाळद्वारे गोफ, सावइवेरेचो सख्याहरी मंडळाद्वारे धनगरी गजानृत्य तसेच कुडचडे काकोडकर शिमगोत्सव मंडळातर्फे, सावर्डे शिगमोत्सव मंडळ, पाईकदेव शिगमोत्सव मंडळ सांगे, सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपई स्वरसाई मंडळ म्हापसा या रोमटामेळ पथकाद्वारे उत्कृष्ट रोमटामेळ सादरीकरण करण्यात आले.
देशी पर्यटकांची गर्दी
शिगमोत्सव पाहण्यासाठी गोव्यातील तसेच पणजीवासांयांनी हजेरी लावलीच होती त्यासोबतच देशी पर्यटकांची उपस्थितीही लक्षणीय होती. काकुलो बेटापासून आझाद मैदानापर्यंत शिगमोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. शिगमोत्सव समितीद्वारे कार्यक्रमाचे उकृष्टरित्या आयोजन करण्यात आले होते
आकर्षक चित्ररथ
पणजी शिगमोत्सवात गोव्याच्या विविध भागातील कलाकारांनी विविध प्रकारचे आकर्षक चित्ररथ साकारले होते.गजानन कला मंडळ कपिलेश्वर यांच्याद्वारे इंद्रजीत राम लक्ष्मणावर सर्पास्त्र चालवतो हा देखावा साकारण्यात आला होता. महादेव बॉयज कुडचडे यांच्याद्वारे लक्ष्मणाला संजीवनी बुटी देण्यासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वत उकलून आणत असलेला देखावा साकारण्यात आला होता. महालक्ष्मी क्रियेशन काकोडा यांच्याद्वारे रावणाच्या दरबारात बंदिस्त हनुमानाचा देखावा साकारण्यात आला होता. कंसवध तसेच रावणाद्वारे यम बंदिस्त विविध चित्ररथ साकारण्यात आले होते, जे आजच्या शिमगोत्सव मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. त्याच सोबतच राखणदार, दुर्गा, खंडोबा, वीरभद्र साईबाबा अशा विविध प्रकारच्या वेशभूषा कलाकारांनी साकारल्या होत्या अनेक प्रेक्षकांना त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नव्हता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.