पणजी : गोवा अग्निशामक दलातर्फे आज दलाच्या मैदानावर राष्ट्रीय अग्निसेवा दिवस विविध कार्यक्रमांसह पाळण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या ठिकाणी हुतात्मा स्मारक स्तंभावर पुष्पचक्र वाहून कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या दलाच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दलाचे संचालक नितीन रायकर तसेच अन्य अधिकार व मान्यवर उपस्थित होते.
अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी यावेळी राष्ट्रीय अग्निसेवा दिन पाळण्याचे महत्त्व विषद केले आणि कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या जवानांची नावे वाचली. यावेळी या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्त दलाच्या जवानांचे संचलन झाले आणि मुख्यमंत्री सावंत यांनी त्याची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी दलाच्या विविध अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मदत कार्यातील कामगिरी, चांगली वर्तणूक, समर्पित सेवा अशासाठी प्रशंसा प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रोग्रेसिव्ह मॅनेजमेंट कन्सल्टंट्सच्या सरव्यवस्थापक शीतल वडेर यांनी आपल्या भाषणात गोवा अग्निशामक दलाला आयएसओ ९००१ आणि आयएसओ ४५००१ अशी प्रमाणपत्रे मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. मुख्यमंत्री सावंत यांनी ही प्रमाणपत्रे संचालक नितीन रायकर यांना प्रदान केली.
नितीन रायकर यांनी आपल्या भाषणात आपल्या खात्यातर्फे आयोजिण्यात आलेल्या विविध प्रशिक्षण उपक्रमांविषयी आकडेवारीसह माहिती सादर केली. त्यानंतर नागरिकांसाठी दलाच्या जवानांनी आग दुर्घटनांवेळी केल्या जाणाऱ्या मदत कार्याची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलाचे विभागीय अधिकारी अजित कामत यांनी केले.
मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार
कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी दलाच्या कार्याची प्रशंसा केली. पिळर्ण येथील बर्जर बेकर कोटिंग प्रा. लि. या आस्थापनातील आग दुर्घटनेवेळी तातडीने प्रतिसाद देत आगीवर यशस्वीपणे नियंत्रण आणल्याबद्दल तसेच राज्याच्या दोन्ही जिल्ह्यांमधील अभयारण्य व वनांमधील आग दुर्घटनांचा सामना यशस्वीपणे केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले.
2,200 विद्यार्थ्यांचा सहभाग
अग्निशामक दलातर्फे राबविलेल्या जागृती कार्यक्रमादरम्यान आयोजिण्यात आलेल्या राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या भित्तिपत्रक स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातील २,२०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.