

पणजी: पणजीतील कॅसिनो परिसरातील अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी पेट्रोल पंपापासून चर्चपर्यंतचा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी दिले.
दिवजा सर्कल ते बेती फेरी मार्गावर बॅरिकेड्स उभारणे, प्रमुख ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग आखणे आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, अशा उपाययोजनांद्वारे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर न्यायालय पुढील एक ते दोन महिने देखरेख ठेवणार आहे.
कॅसिनो तसेच विविध सरकारी आणि खासगी कार्यालयांकडे जाणाऱ्या वाहनांना जुन्या फैझान (अकाऊंट विभाग) परिसरानजीक प्रवाशांना उतरविण्याची मुभा असेल. मात्र, पेट्रोल पंपापासून चर्चपर्यंतचा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात येणार असून, या भागात वाहने पार्क करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
उच्च न्यायालयाने सरकारला बजावले :
१ वाहतूक फलक : वाहनांना थांबण्यास किंवा पार्किंग करण्यास मनाई असलेल्या ठिकाणी स्पष्ट आणि दृश्यमान फलक लावावेत. एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियमभंगावर लक्ष ठेवावे.
२ नो पार्किंग झोन: जुन्या सचिवालयामागील परिसर, दयानंद बांदोडकर पुतळ्यापासून दामोदर/जोशी वाईन स्टोअर्सच्या कोपऱ्यापर्यंतचा भाग तसेच पर्यटन वसतिगृह आणि एसबीआयच्या बाजूचा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ म्हणून अधिसूचित करावा.
३ पिकअप-ड्रॉप झोन: डी. बी. रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टॅक्सी तसेच कॅसिनोचे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी जुन्या सचिवालयामागे स्वतंत्र प्रवासी चढ-उतार क्षेत्र तयार करावे.
४वाहतूक फलकांची उभारणी: पणजी शहरात आवश्यक ते सर्व वाहतूक फलक बसविण्यासाठी पणजी महानगरपालिकेला कालमर्यादा देण्यात आली आहे.
५बससेवा वाढविण्याचा प्रस्ताव: मिरामार समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची सोय आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कदंब वाहतूक महामंडळ तसेच खासगी बससेवा रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
६एसबीआयजवळ बस बे: एसबीआय शाखेबाहेर कडक ‘नो पार्किंग’ नियमांची अंमलबजावणी करत नियोजित बस बे तयार करण्यात येणार आहे.
रात्री ९ पर्यंत पोलिस तैनात ठेवा
वाहतुकीचे नियमन आणि वाहनधारकांना मार्गदर्शन करण्यासाठी रात्री ९ वाजेपर्यंत पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी शहरातील कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासही सांगण्यात आले आहे. वाहनांच्या नंबर प्लेट्स आणि नियमभंग स्पष्टपणे टिपता येतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, शहरात सार्वजनिक बससेवा रात्री १० वाजेपर्यंत सुरळीत सुरू असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यावर न्यायालयाने समाधान व्यक्त केले. सार्वजनिक वाहतूक बंद करण्याबाबत कोणताही आदेश देण्यात आलेला नसून, संपूर्ण वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीवर न्यायालय लक्ष ठेवणार आहे.
चारचाकी टोइंगसाठी खासगी यंत्रणेचा पर्याय
पणजी महानगरपालिकेकडे (सीसीपी) सध्या केवळ दुचाकी वाहने उचलण्यासाठी व्हॅन उपलब्ध आहेत. चारचाकी वाहने टोइंग करण्याची यंत्रणा वाहतूक सेलकडे आहे. त्यामुळे सीसीपी आयुक्तांनी वाहतूक सेलशी थेट समन्वय साधावा आणि आवश्यक असल्यास चारचाकी वाहने उचलण्यासाठी खासगी टोइंग वाहने भाड्याने घ्यावीत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.