Goa Politics: खरी कुजबुज: राजधानीत गांजा उगवला!

Khari Kujbuj Political Satire: मध्यंतरी कळंगुटमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कर आकारणी करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला होता. पंचायत सचिव व कर्मचारी यांनी कारवाईसाठी फेरी मारली ती समजता येते.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

राजधानीत गांजा उगवला!

रानात किंवा वनात गवत उगवले असे म्हणतात. मात्र, पणजीत स्मार्ट सिटीच्याकामांतर्गत शोभेच्या झाडांच्या लागवड केलेल्या जागेमध्ये गांजाचे एक रोप उगवले आणि त्याविषयी तर्कवितर्कांना सुरुवात झाली. नेटकऱ्यांनी या वृत्तावरून नार्कोटेस्ट सेलला औषध म्हणून याची लागवड करावी, म्हणजे त्यामुळे चांगला व्यवसाय सुरू होईल, असे त्याशिवाय एकाने ‘भाजपचे मिशन स्वयंपूर्ण गोवा’ असा उपरोधिक टोला लगावला आहे. खरेतर रोप आले आहे आणि ते सुमारे दोन अडीच फूट वाढले आहे. तसे पाहिले तर तत्काळ हे गांजाचेच रोपटे हे फक्त पोलिस आणि ज्यांनी ते जवळून पाहिले आहे, तेच लोक ओळखू शकतात. शोभेच्या झाडांमध्ये हे रोपटे आल्याने त्याकडे फारसे कोणी गंभीरतेने पाहिले नसावे किंवा दुर्लक्षही केले असावे. आठवण म्हणजे याच ठिकाणापासून कांपालकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला यापूर्वी गांजा विक्री करणाऱ्यांना पकडले होते. एखादे गांजाचे ‘बी’ पडले असावे किंवा कोणी जाता, जाता ते भिरकावलेही असेल. ज्याप्रमाणे इमारतीवर झाड उगवते, अगदी तसाच हा प्रकार पण नेटकऱ्यांनी सरकार आणि नार्कोटेस्टवाल्यांना ज्या काही सूचना केल्या आहेत, त्या भन्नाट आहेत हे मात्र नक्की. ∙∙∙

कळंगुटमधील स्टंटबाजी

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सरपंच काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांनी पंचायतीकडून व्यापार परवाना घेतलेले व्यावसायिक नेमका परवान्यावर नोंद व्यवसाय करतात की नाही हे पाहणे सुरू केले आहे. पंचायत कर्मचारी, पंचांचा फौजफाटा घेऊन त्यांनी ही पाहणी सुरू केली आहे. आमदार मायकल लोबो हे मांद्रेतून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रकरणानंतर तसे विजनवासात गेलेले जोसेफ पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी पंचायत क्षेत्रातील व्यावसायिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मध्यंतरी कळंगुटमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कर आकारणी करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला होता. पंचायत सचिव व कर्मचारी यांनी कारवाईसाठी फेरी मारली ती समजता येते. सरपंच स्वतः दुकानांचे परवाने तपासत फिरत आहे असे हे दुर्मीळ दृश्य आहे. त्यांची ही स्टंटबाजी कशाला याची एक वेगळी चर्चा कानावर पडू लागली आहे. किनारी भाग स्वच्छ करण्याची एका मंत्र्याची इच्छा आहे. त्याच्या सांगण्यावरून म्हणे जोसेफ ही कारवाई करू लागले आहेत. त्या मंत्र्याला मायकल यांना अप्रत्यक्ष शह द्यायचा आहे. साळगाव मतदारसंघात आपल्या समर्थकाची वर्णी लावण्यासाठी तो मंत्री व मायकल इच्छुक आहेत. त्यावरून जोसेफ यांच्या शिडात हवा भरण्याचे काम मंत्र्याकडून करण्यात आल्याची खबर कळंगुट परिसरात कानी पडत आहे.∙∙∙

...आणि कार्यकर्त्यांची झाली अडचण

भाजपने संघटनात्मक पातळीवरील पदांसाठी वयाची लक्ष्मणरेषा आखल्याने अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला व्हावे लागले आहे. याची मोठी चर्चा भाजपच्याच वर्तुळात आहे. मोठ्या राज्यात एका कार्यकर्त्यासाठी अनेक पर्याय पक्षासमोर असतात. गोव्यासारख्या छोट्या राज्यात तशी स्थिती नाही. शिवाय पदे घेणाऱ्या व्यक्तीने पक्षासाठी वेळ देणे आवश्यक असते. सवयीने प्रत्येक ठिकाणी असा कार्यकर्ता ठरून गेलेला असतो. पक्षाचा आदेश आला की तो कामाला लागतो. ती शिस्त नव्याने जबाबदारी स्वीकारणाऱ्यांच्या अंगी बाणवण्यासाठी काही वेळ लागणार आहे. यानिमित्ताने कार्यकर्ते स्व. मनोहर पर्रीकर यांची आठवण काढू लागले आहेत. पर्रीकर आज असते ही वयाचा का निकष गोव्यापुरता त्यांनी शिथिल करून आणला असता असे ते बोलू लागले आहेत. गोव्यासारख्या छोट्या राज्यात विविध ठिकाणी पक्षासाठी पूर्णवेळ देऊ शकणारे कार्यकर्ते मिळवण्यात येणारी अडचण आणि वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्याला बाजूला करण्याचे परिणाम याविषयी प्रदेश पातळीवरून दिल्लीत कोणीतरी बोलणे गरजेचे होते असे कार्यकर्त्यांना वाटते. पक्षात बाहेरून आलेल्यांसाठी पायघड्या घालण्याचे धोरण पक्ष संघटनेच्या मुळावर येऊ शकते असा इशाराही हे कार्यकर्ते देत आहेत. ∙∙∙

वेलिंगकरांच्‍या विरोधात आवाज का उठविला नाही?

विचारवंत दत्ता नायक यांनी देवळे आणि मठ लोकांना लुटतात, असे वक्‍तव्‍य एका मुलाखतीत केल्‍यानंतर एका घटकाकडून त्‍यांचा निषेध होत आहे. वास्‍तविक या वादाला जर कुणी तोंड करून दिले असेल तर ते भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी. सावईकर यांनी आपल्‍या फेसबुक पोस्‍टात नायक यांच्‍या या वक्‍तव्‍यावर भाष्‍य केले आणि त्‍यामुळे चर्चेला उधाण आले. आता समाज माध्‍यमांवर चर्चा करण्‍यास कुणाचीही हरकत नसावी. मात्र सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍या विरोधात केलेल्‍या वक्‍तव्‍यावर असाच गदारोळ माजला होता. त्‍यावेळी सावईकर यांनी कुठलेच वक्‍तव्‍य न करता मौन का बरे पाळले होते? प्रतिगामी चळवळीतील लोकांकडून आता हा प्रश्र विचारला जात आहे. ∙∙∙

हे कशासाठी?

राज्याच्या राजकीय वर्तुळात काही मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी विशेष जवळीक साधत असल्याची चर्चा आहे. मात्र, या जवळिकीचे नेमके कारण काय, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. काहींना वाटते, की ही जवळीक मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आहे. परंतु, प्रत्यक्षात ती वैयक्तिक प्रकरणे झाकून ठेवण्यासाठी असल्याचा दावा काही राजकीय निरीक्षक करत आहेत. लोक आता मिश्‍कीलपणे म्हणू लागले आहेत, की या जवळिकीचा उद्देश जनतेच्या हितासाठी नसून स्वतःच्या गैरप्रकारांवर पांघरूण घालणे हा आहे. जर कोणी असे समजत असेल, की मंत्री किंवा आमदार मुख्यमंत्री सावंत यांच्याशी घनिष्ट संबंध केवळ विकासकामांसाठी ठेवत आहेत, तर ते अजून जुन्याच काळात जगत आहेत, असे टोमणे लोक मारत आहेत. त्यामुळे आज जनतेच्या मनात प्रश्न आहे, ही जवळीक विकासासाठी की स्वार्थासाठी? ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज: म्हादई विषय, नको रे बाबा!

जुन्या विहिरीतही कचरा..!

केरये - खांडेपार येथे मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका जुन्या विहिरीत प्लास्टिक आणि इतर टाकाऊ कचरा ‘चोरी -छुपे’ टाकत असल्याचे उघडकीस आल्यानंतर हा काय प्रकार चालला आहे, असा सवाल केला जात आहे. कुणीही यावे आणि काहीही करून जावे, सरकारी यंत्रणा आहे की नाही, असा प्रश्‍न पडण्यासारखी परिस्थिती आहे. पोलिस नव्हे तर सामाजिक कार्यकर्तेच असे बेकायदा प्रकार उघडकीस आणत असल्याने पोलिस यंत्रणा असून काय फायदा, असाही सवाल केला जात आहे.∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज: म्हादई विषय, नको रे बाबा!

सावईकरांचे सूचक मौन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे अभाविप आणि सध्या भाजप असा सावईकर यांचा प्रवास झाला आहे. त्यांच्यासोबत अभाविपचे काम करणारे विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस तर चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात मंत्री आहेत. स्व. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे देण्याविषयीही चर्चा भाजपच्या एका गटाने चालवली होती यावरून त्यांनी दिल्लीत आपले महत्त्व किती वाढवले होते याची कल्पना येते. ते सावईकर आता प्रदेशाध्यक्षपदी येतात काय हे पहावे लागणार आहे. पक्षाची भूमिका जनतेपर्यंत संयत शब्दांत पोचवण्यात आणि कार्यकर्त्याला लढण्यासाठी बळ देण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. भाजपने दक्षिण गोव्यातून खासदारकीसाठी उमेदवारी नाकारली तरी सावईकर यांनी जाहीर नाराजी न दर्शवता पक्षाने दिलेले काम केले. संघ परिवाराच्या शिस्तीत वाढलेला नेता २०२७ मध्ये स्वबळावर सरकार स्थापनेसाठी पक्षाला हवा आहे. तो शोध सावईकरांच्या रूपाने समाप्त होऊ शकतो. त्यातच या विषयावर सावईकर यांनी बोलणे टाळल्याने संशय निश्चित बळावला आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com