Goa Politics: खरी कुजबुज: म्हादई विषय, नको रे बाबा!

Khari Kujbuj Political Satire: विरोधी पक्ष नेते व कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळळी औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या प्रदूषणावर उपाय काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे.
Goa Latest Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

म्हादई विषय, नको रे बाबा!

म्हादई नदीच्या विषयाचा धसका सर्वांनीच घेतलाय. कर्नाटकातील कोणी नेता मुख्यमंत्री सावंत यांना भेटला की, म्हादईवर चर्चा झाली असेल असा अंदाज बांधला जातो. त्यामुळे माध्यमांकडून तसा प्रश्न विचारला जाणे साहजिकपणे ठरून गेलेले असते. त्याची सवय आता नेत्यांनाही झालीय. आता ते म्हादई प्रश्न विचारला जाणार, असे गृहित धरतात. बुधवारी कर्नाटकचे नेते बसवराज बोम्मई मुख्यमंत्र्यांना भेटले. या भेटीत म्हादई प्रश्नावर चर्चा झाली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आपली सुटका करून घेतली. म्हादई प्रश्नी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली तर काय बिघडले असते? चर्चा केली नाही, असे सांगून त्यांनी सुटका करून घेतली तरी म्हादई हा विषय चर्चेसाठी त्यांना महत्वाचा का वाटला नाही, हा प्रश्न उरतोच. या विषयावरील हे मौन संशय वाढवणारे ठरते हे कोणी समजून घेतल्यास बरे होईल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ∙∙∙

प्रदूषणावर किती पत्रे लिहिणार?

‘ॲपलाय, ॲपलाय, नो रिप्लाय’ असे इंग्रजीत एक वाक्य आहे. अशीच गत सध्या कुंकळळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाच्या बाबतीत झाली आहे. विरोधी पक्ष नेते व कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळळी औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या प्रदूषणावर उपाय काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे. यापूर्वीही आलेमाव यांनी या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांना व पर्यावरण मंत्र्यांसह उद्योग मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत विधानसभेत चर्चा झाली होती. प्रदूषणाविरोधात स्थानिकांनी आंदोलन छेडले होते. स्थानिक वर्तमानपत्रात, मीडियात व सोशल मीडियावर या प्रदूषणाच्या विरोधात रकाने भरभरून लिहिले आहे तरी आपले सरकार मठ्ठ. एवढेच काय पर्यावरण मंत्री या शापित औद्योगिक वसाहतीत जाऊन नवीन कारखान्याचे उदघाटन करून त्या कारखानदारांना योग्यतेचे प्रमाणपत्र वाटत आहेत. परंतु एक मात्र प्रश्‍न कोणीच लक्षात घेत नाही ः तो म्हणजे, एक पत्रकार स्वतः या वसाहतीच्या खेटून राहतो, तो अहोरात्र दुर्गंधी अन् प्रदूषणाचात्रास सहन करतो. बातम्याही लिहितो. परंतु कुणी लक्षात घेत नाही!∙∙∙

असेही राजकीय संकेत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची बुधवारी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही भेट घेतली. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप मगोची निवडणूकपूर्व युती होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ढवळीकर सरकारमध्ये आहेत, त्यांच्या खात्याचे काही प्रश्न होते म्हणून ते भेटण्यास आले होते. त्यांच्याशी आगामी निवडणुकीतील युती व अन्य विषयावर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ असल्याने ही निवडणूक म्हणजे जिल्हा पंचायत निवडणूक असावी, असा अर्थ लावला जात आहे. भाजपला या निवडणुकीत ‘मगो’च्या आधाराची गरज या विधानातून व्यक्त झाल्याचे मानले जात आहे. ∙∙∙

पर्यटन उद्याेजकांवर दडपण?

गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या कमी झाली आहे. यंदाच्‍या ३१ डिसेंबरच्‍या नाईटला दक्षिण गोव्‍यातील जवळपास निमर्नुष्‍य असलेल्‍या समुद्र किनाऱ्यांनी त्‍यावर शिक्‍कामोर्तब केले. मात्र, गोवा सरकारला ही वस्‍तुस्‍थिती दिसते की नाही? याचे कारण म्‍हणजे सरकारकडून म्‍हणे, हॉटेल व्‍यावसायिकांवर आणि पर्यटन क्षेत्रातील इतर उद्योजकांवर वाईट बातम्‍या प्रसार माध्‍यमांपर्यंत पोहोचवू नका, म्‍हणून दडपण येऊ लागले आहे. पर्यटनाविषयी वाईट बोललात तर खबरदार, अशा सूचना त्‍यांना केल्‍या जात आहेत. ‘कोंबडे झाकले म्‍हणून सूर्य उगवण्‍याचा थोडाच थांबेल?, ही उक्‍ती गाेवा सरकारला माहीत नाही का? ∙∙∙

ज्येष्ठांना नववर्षाची भेट

गोवा सरकारच्या विविध योजनेमार्फत गोमंतकीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याची रसद लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाही. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विधवा लाभार्थ्यांसाठी गेल्या तीन महिन्यांचे आर्थिक सहाय्य मिळालेले नव्हते. गेल्या सप्टेंबरमध्ये शेवटचे देण्यात आले होते. हे आर्थिक सहाय्य दरमहा वेळेवर मिळत नाही. लाभार्थी मात्र बँकेत जाऊन खेटे मारत असतात. गेल्या तीन महिन्याचे हे आर्थिक सहाय्यक प्रलंबित असताना गोवा सरकारने ऑक्टोबरमध्ये आर्थिक सहाय्य नववर्षाच्या १ तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा करून नववर्ष भेट दिली आहे. सरकारने हे आर्थिक सहाय्य देऊन भेट दिली असली तरी अजून नोव्हेंबर व डिसेंबरचे आर्थिक सहाय्य बाकी आहे. त्यामुळे सरकारने या लाभार्थ्यांसाठी ‘थोडी खुशी, थोडा गम’ दिली आहे. हे आर्थिक सहाय्य देण्यास सरकारकडून नेहमीच विलंब होतो. गेल्या गणेशचतुर्थीला तीन महिन्यांचे आर्थिक सहाय्य दिले गेले नाही, त्यावेळी विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. तेव्हा ते वेळेवर देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते, मात्र ते पूर्ण झालेले नाही. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज: ‘कदंब’ची सेवा ‘नॉट रिचेबल’

महेश काळेंनाही वाटतं ‘भिवपाची गरज ना’

राज्यात नववर्ष स्वागतासाठी आयोजित विविध पार्ट्यांना पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. परंतु बहुतांश गोमंतकीयांनी नववर्षाचे स्वागत साखळीत केले. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक महेश काळे यांच्या मैफलीला गोव्यातील कानाकोपऱ्यांतून आलेल्या रसिकांनी गर्दी केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात तेही नववर्ष स्वागतासाठी आयोजित शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला रसिक आलेले पाहून काळे म्हणाले आता शास्त्रीय संगीताला भविष्य नक्कीच आहे, ‘भिवपाची गरज ना’.. काळेंनी ‘भिवपाची गरज ना’ म्हणायचा अवकाश उपस्थितांत एकच हशा पिकला. म्हणजे ‘भिवपाची गरज ना’ हा मुख्यमंत्र्यांचा डायलॉग किती फेमस झाला बघा! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa BJP: माजी खासदार, माजी आमदार की नवा चेहरा? कोण होणार भाजपचा पुढील प्रदेशाध्यक्ष? सहा नावे चर्चेत

सनबर्न विरोधक नमले?

बहुचर्चित ‘सनबर्न’ अखेर संपन्‍न झाला. सनबर्न आवारात ड्रग्‍जचे सेवन करून वावरणाऱ्या पाच पर्यटकांवर केवळ गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. एक तरुण ड्रग्‍जच्‍या ओव्‍हरडोसमुळे गतप्राण झाला. तरीही पोलिसांची चुप्‍पी. सनबर्न ईडीएम सुरू होण्‍यापूर्वी जे-जे त्‍याला विरोध करत होते त्‍यांनी खरे तर पोलिसांना ड्रग्‍ज प्रकरणी जाब विचारायला हवा होता. परंतु ते शांत. महोत्‍सव उधळून लावण्‍याची धमकी देणारे आमदार प्रवीण आर्लेकर यांचीही तलवार म्यान. ही सनबर्न आयोजकांची जादू म्‍हणावी का? आयोजकांनी असे कोणते व्हिटॅमिन दिले गेले की, सारेच गप्पगार झाले, अशी चर्चा रंगत आहे.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com