म्हापसा: गोव्यातील भाजप सरकारने कोणतेही ताळतंत्र न बाळगता कायदा-कानून धाब्यावरच बसवलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जे ठरवतील तेच घडत आहे. त्यात भरीस भर म्हणजे विरोधकही शक्तिहीन झाले आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे (Sanjay Barde) यांनी केला आहे.
वासुदेव पार्सेकर व सीतेश मोरे यांच्या उपस्थितीत म्हापसा (Mapusa) येथे पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) बोलताना ते पुढे म्हणाले, कोविड प्रादुर्भाव नियंत्रणाचा निर्णय सरकार 3 जानेवारी रोजी घेण्याची शक्यता आहे. तोपर्यंत गोव्यात (Goa) कोविडचा प्रसार झपाट्याने होणार असल्याने त्या महामारीच्या प्रसारास मुख्यमंत्रीच पूर्णपणे जबाबदार असतील. याबाबत मुख्यमंत्री जितके जवाबदार आहेत तितकेच अन्य मतदारसंघांचे आमदारही जबाबदार आहेत.
ते पुढे म्हणाले, काँग्रेस, म.गो. तसेच इतर पक्षांच्या आमदारांना इतर पक्षांत उडी घेऊन निवडणूक जिंकावयाची आहे. जनतेच्या सुखदुःखाशी त्यांचे काहीच देणेघेणे नाही असेच दिसून येते. राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले बाणावलीचे आमदारही पक्षत्याग करून गेले. काही दिवसांपूर्वी मी त्यांच्यासंबंधी केलेले वक्तव्य आज खरे ठरले आहे.
लोबोंनी जनतेला उल्लू बनवले!
संजय बर्डे म्हणाले, मायकल लोबो (Michael Lobo) यांच्यासारख्या मंत्र्यांने जनतेला उल्लू बनवले आहे. कधी ते भाजपचे गुणगान गातात, तर कधी काँग्रेसचे. एका बाजूने ते काँग्रेसचे सुधीर कांदोळकर यांना पाठिंबा देतात आणि आपण मात्र तृणमूलची (TMC) वाट धरण्याची स्वप्ने पाहतात. भाजपच्या राजवटीत श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आहेत, तर मध्यमवर्गीय आणि गरीब अधिक गरीब झाले आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही, असा आरोपही त्यांनी केला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.