

दोडामार्ग: गोव्यातून दोडामार्ग तालुक्यात प्रवेश केलेल्या ओंकार हत्तीने आपले रौद्र रूप दाखवून दिले. कळणे येथे बुधवारी (ता. १०) रात्री उशिरा वन विभाग कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत दावणीला बांधलेल्या एका बैलाचा बळी घेतला. अन्य दोन पाळीव जनावरांची वन कर्मचाऱ्यांनी दावणी सोडून सुटका केल्याने ती बचावली. ओंकार शिरवल परिसरापर्यंत पोहोचला.
ओंकार हत्ती काल सायंकाळी गोव्यातून फोंडये परिसर पार करत कळणे गावात दाखल झाला. तो सायंकाळी उशिरापर्यंत बराच वेळ राज्य मार्गावर भ्रमण करीत होता. वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थ त्याला गावच्या वेशीबाहेर घालवण्याचा खटाटोप करीत होते; परंतु त्यांचा प्रयत्न असफल ठरला. अंधार पडताच ओंकारने थेट मायनिंग मार्गे कळणे डबीवाडी येथील शाहीर इस्माईल खान या शेतकऱ्याच्या शेतात शिरकाव केला.
वस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या शेत बागायतीत त्यांनी आपली पाळीव गुरे दावणीला बांधली होती. तेथे शेतातच त्यांचे जुने घर आहे; परंतु ते तेथे न थांबता नव्याने बांधलेल्या घरात राहण्यासाठी जात असतात. काल सायंकाळी ते निघून गेले. याच दरम्यान तेथे दाखल झालेल्या ओंकारला शेतात बांधलेली गुरे नजरेस पडली. त्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी वनविभागाचे कर्मचारी त्याच्या मागावर होते.
दावणीला बांधलेल्या गुरांवर हत्ती हल्ला चढवत असल्याचे निदर्शनास पडताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत दोन गुरांची दावण सोडली व ओंकार हत्तीच्या तावडीतून वाचविले; परंतु एका बैलाची दावण सोडण्याचा अवधी देखील हत्तीने दिला नाही. आक्रमकतेने चढविलेल्या हल्ल्यात बैलाला पायदळी तुडविला. बैलाचे बरगडे व पाय निकामी झाले. या हल्ल्यात बैलाने तडफडून जागीच प्राण सोडले. त्यानंतर हत्तीने बागायतीवर बराच ताव मारला. शेतीचे नुकसान सत्र सुरू केले.
ओंकारचा रात्रभर शेतात वावर होता. याबाबतची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन रीतसर पंचनामा केला. रात्रभर कळणे गावात उच्छाद मांडून ओंकार हत्ती पुढे भिकेकोनाळच्या दिशेने रवाना झाला. दुपारी तो शिरवल गावात होता. ओंकारच्या पुन्हा येण्याने शेतकऱ्यांत (Farmers) धडकी भरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.