

दोडामार्ग/बांदा: गेले काही दिवस गोव्यातील उगवे, तोरसे येथे स्थिरावलेला ओंकार हत्ती बुधवारी सकाळी फकीरफाटा येथून डोंगरपाल डिंगणे येथे प्रवेश करत दिवसभरात कळणे फोंडये येथे दाखल झाला. मंगळवारी (ता.९) रात्री उशिरा त्याने डिंगणे येथे माड व केळी बागायतीचे नुकसान केले. त्याला आता दोडामार्ग तालुक्यात तिलारीच्या दिशेने नेण्याचे काम वनविभाग करीत असल्याचा दावा ग्रामस्थ करीत आहेत.
त्याला तळकट, कोलझरच्या दिशेने नेण्यात येणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांत चालू होती. त्यामुळे हा हत्ती घाट माथ्यावरून माघारी फिरलेल्या दोडामार्ग तालुक्यातील आपल्या मुख्य कळपात परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कळपापासून विलग झालेल्या ओंकार हत्तीने गेल्या काही महिन्यांपासून सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात ठिय्या मांडला होता. साधारण चार ते पाच महिने येथील परिसरात त्याचे भ्रमण चालू होते. दोडामार्ग तालुक्यात आक्रमक असलेल्या या हत्तीने बांदा व गोवा परिसरात पाऊल ठेवताच शांत व संयमी पणाचे दर्शन घडवून आणले.
वनविभागाचे जे कर्मचारी त्याचा शंभर मीटर अंतरावर जाण्यास धजावत होते ते कर्मचारी याठिकाणी अगदी खाद्य तोंडात घालण्यापर्यंत त्याच्या जवळ जात असल्याचे पाहण्यास मिळाले. ओंकारने आपल्या उग्र रूपाचा त्याग करून सामंजस्याचे दर्शन घडविल्याने सर्वजण अचंबित झाले.
ओंकार हत्ती या विषयावरून बांदा परिसरात अनेक उलथापालत झाली. प्राणीप्रेमी यांच्यात व शेतकऱ्यांमध्ये संघर्षाचे वातावरणही निर्माण झाले. बांद्यातील प्राणीप्रेमींनी ओंकारला वनतारात नेण्याच्या प्रश्नावरून आवाज उठवीत आंदोलन छेडले आणि प्रखर विरोधाची भूमिका घेतली. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे दोडामार्ग तालुक्यातील जे शेतकरी हत्तींच्या उपद्रवामुळे हैराण झाले होते.
आदेश आणि नाराजी
ओंकार हत्तीला ‘वनतारा’त नेण्याच्या वादावरून कोल्हापूर खंडपीठाने पहिल्यांदा वनतारात नेण्याचा आदेश जारी केला होता. मात्र, त्यावरून प्राणीप्रेमींनी अख्खे रान उठविले. ओंकारला नेण्यासाठी आलेल्या वनताराच्या टीमला न्यायालयीन आदेश असतानाही प्रखर विरोध केला. त्यामुळे न्यायालयीन आदेश असूनही वनताराने ओंकारला पकडण्याचे धारिष्ट दाखविले नाही. परिणामी न्यायालयाने ओंकारला नैसर्गिक अधिवासात ठेवण्याचा दुसऱ्यांदा आदेश दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.