Old Goa: जुने गोवे चर्च परिसरात जागा मिळेल, तेथे वाहने उभी केली जातात. ‘नो पार्किंग’ फलकाजवळ पर्यटकांची वाहनांची रांगच लागलेली असूनही या प्रकाराकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. जवळ पोलिस स्थानक असूनही कुठेही वाहतूक व्यवस्था सुरळीत नाही, गांधी सर्कल ते चर्चच्या परिसरातील सर्वच रस्त्यांवर अनागोंदी सुरू असते.
पर्यटक वाहने बिनधास्तपणे ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहने ठेवतात. त्यामुळे संपूर्ण दिवस या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. चर्च परिसरात वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस तैनात असे, परंतु अलीकडच्या काळात पोलिस गायब असतो.
होमगार्डचेही दर्शन होत नाही, ते नेमके कुठे असतात, हेच कळत नाही. त्यामुळे या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांना येथील वाहतूक कोंडीचा नाहक त्रास होत आहे. चर्चजवळच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक शोभेसाठी लावलेले की काय? अशी सर्वसामान्यांना येते. कारण त्या ठिकाणी कोणाचेही निर्बंध नाही.
पोलिस नसल्याने त्या नो पार्किंग फलकासमोरच वाहने उभी केली जातात. वाहनचालकांना कोणाची भितीच राहिलेली नाही. या ठिकाणी पोलिस कधी तरी असतो, पण त्यांचेही बेशिस्त पार्किंगकडे दुर्लक्ष असते.
त्यामुळे पर्यटनांच्या नावाने गोंधळ चाललेला आहे, या प्रकाराबद्दल या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर वाद, भांडणेही होण्याची शक्यता आहे.
दंडात्मक कारवाईची गरज
‘नो पार्किंग’मध्ये गाड्या लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला हवी. त्यांच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जुने गोवे पंचायतीनेही वाहनांच्या बेशिस्त पार्किंग, बेशिस्त पर्यटनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पणजी, मडगाव शहरात ज्याप्रमाणे नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यास कारवाई होते, त्याप्रमाणे येतेही दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे.
विक्रेत्यांची गर्दी
आईस्क्रिम, मेणवाती, स्थळदर्शनाचे फोटो व इतर साहित्य विक्रेत्यांचीही या रस्त्यांवर नेहमीच गर्दी असते.
चर्चला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचीही येथे काळजी घेतली जात नाही. काही वेळेला पोलिस नसल्याने या ठिकाणी चोऱ्याही होतात.
पाकिटमारांची संख्याही या परिसरात मोठी आहे. पर्यटकांना मार्गदर्शनासाठी शासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस पथकांची नियुक्त करणे गरजेचे आहे, असे पर्यटक गाईडने व्यक्त केले.
स्वच्छतेचा अभाव: गांधी सर्कलजवळ नेहमीच कचरा पडलेला असतो. रात्रीच्या वेळी मजूर लोक गांधी सर्कलवर झोपलेले असतात. ज्या ठिकाणी राजकारण्यांचे शुभेच्छा फलक लावले आहेत, त्या ठिकाणी मलमूत्र विसर्जन करतात. त्यामुळे हा परिसर गलिच्छ होत आहे. अलीकडेच गांधी जयंतीनिमित्त हा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. अशी स्वच्छता कायम ठेवण्यासाठी जुने गोवे पंचायत मंडळ, तसेच पर्यटन खात्याने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे ग्रामस्थांचे मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.