

पणजी: ओला कंपनीला गोव्यात मोठा झटका बसला आहे. सरकारच्या मध्यस्थीनंतर राज्यातील इलेक्ट्रीक स्कूटर्सची विक्री तात्पुरती थांबविण्यात आली आहे. राज्यातील ओलाच्या ग्राहकांची गेल्या काही दिवसांपासून वाताहात सुरु होती, त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
गोव्यातील ओलाच्या शोरुम (विक्री आणि सर्व्हिस) केंद्रात ग्राहकांकडे लक्ष दिले जात नाही. सर्व्हिसिंगसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सर्व केंद्रांबाहेर रांगा लागल्या आहेत.
याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असून, येथील कर्मचारी उद्धटपणे बोलत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला होता. याप्रकरणी ओलाच्या ग्राहकांनी राज्यात कंपनीच्या स्कूटर्सची विक्री बंद करण्याची मागणी केली होती.
ओला ग्राहकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची देखील भेट घेऊन निवेदन सादर केले होते. निवेदनात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
लोकांच्या हातून काहीतरी विपरीत घडण्यापूर्वी सरकारने या समस्येकडे लक्ष घालावे आणि सर्व नादुरुस्त स्कूटर्सची दुरुस्ती लवकरात लवकर करून देण्याची सूचना ओला शोरूमला द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने देखील याप्रकरणी ट्विट करुन गोव्यातील ओला स्कूटर विक्री थांबविण्याच्या मागणीचे समर्थन केले होते. कंपनी त्यांच्या ग्राहकांची काळजी घेत नसल्याचे त्याने देखील आरोप केला होता. इतर राज्य देखील गोव्याचे अनुकरण करतील, असे कामरा म्हणाला होता.
दरम्यान, राज्यातून ओलाच्या ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारी विचारात घेता सरकारने या हस्तक्षेप करत विक्री तात्पुरती थांबविण्याची सूचना केली आहे. ओलाच्या ग्राहकांनी पणजीतील वाहतूक संचालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.