
पणजी: आम आदमी पक्षाच्या महिला नेत्याला झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी तक्रार देऊनही राजकीय दबावामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यास उशीर होत आहे. पोलिस यंत्रणा भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) नव्हे तर भाजप न्याय संहितेने काम करत आहे. सत्ताधाऱ्यांना व सामान्यांना वेगवेगळा न्याय दिला जात आहे, असा आरोप ‘आप’चे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी केला.
ओडशेल येथील डोंगर माथ्यावर खोदकाम केल्यामुळे पावसाच्या पाण्यासह पायथ्याशी असलेल्या वस्तीत घरांमध्ये घुसलेल्या चिखलमय मातीमुळे लोकांत भीती निर्माण झाली. त्यांच्या मदतीस गेलेल्या ‘आप’ नेत्या सिसिल रॉड्रिग्ज यांना स्थानिक आमदार जेनिफर मोन्सेरात व सिडनी बार्रेटो या दोघांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी करूनही कोणतीही कारवाई पणजी पोलिसांनी न केल्याप्रकरणी ‘आप’चे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांच्यासह आमदार क्रुझ सिल्वव इतर कार्यकर्त्यांनी पणजी पोलिस स्थानक गाठले.
यावेळी पोलिस निरीक्षकांनी राज्यात असलेल्या उपराष्ट्रपती असल्याने सुरक्षाव्यवस्थेसाठी पोलिस व्यग्र होते. येत्या २४ तासात तक्रारी नमूद केलेल्या व्यक्तींना बोलावून त्यांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती ॲड. पालेकर यांनी दिली.
घटनेच्या ठिकाणी भरारी पथकाचे उपजिल्हाधिकारी रात्रीच्यावेळी आले व त्यानंतर ते फिरकले सुद्धा नाही. या खोदकामासाठी बेकायदेशीररित्या परवाने दिले गेले आहेत. जमीन मालक हा स्थानिक आमदार तसेच उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरण अध्यक्षांचे जवळचे आहेत तसेच या आमदारांचे पती हे महसूलमंत्री असल्याने या बांधकामाला पाठिशी घातले जात आहे.
स्थानिक बांधकाम विकासकाला आमदारांचा पाठिंबा असल्याने कोणतीच सरकारी यंत्रणा कारवाईसाठी पुढे सरसावत नाही, अशी टीकाही ॲड. अमित पालेकर यांनी केली.
अंगावर धावून येऊन धक्काबुक्की करणे हा दखलपात्र गुन्हा होत असताना पोलिस कारवाई करत नाहीत. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांच्या जबान्या पोलिसांनी नोंद कराव्यात. त्यांना काहीही उद्देशून बोलले नसतानाही त्यांनी हा प्रकार नैराश्यातून केला. त्यांच्यासोबत आलेले पंच सिडनी बार्रेटो हे तर गुंडासारखे वर्तणूक करत होते. ताळगावात अनेक ठिकाणी डोंगर कापणी तसेच शेतजमिनी बुजवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याविरुद्ध आवाज उठविल्यावर भरारी पथकाला जाग येऊन कारवाई केली गेली, असे सिसिल रॉड्रिग्ज म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.