

सासष्टी: नुवे पंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत मेगा प्रकल्प तसेच नक्शा (सर्वे ऑफ इंडिया) सर्वेक्षणाला विरोध करणारे ठराव मंजूर करण्यात आले. याचबरोबर पंचायतीच्या ७.५१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पालाही ग्रामसभेची मंजुरी मिळाली.
ग्रामसभेनंतर माहिती देताना सरपंच फ्रेडा डिसा यांनी सांगितले की, मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ६.८७ कोटी रुपयांचा खर्च तर सुमारे १२.७६ लाख रुपयांचा शिल्लक नफा दाखविण्यात आला आहे. किरभाट येथील वादग्रस्त प्रकल्प यापूर्वीच रद्द करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेदरम्यान विविध विषयांवर चर्चा होत ग्रामस्थांनी पंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. झरीना दा कुन्हा यांनी ग्रामस्थांनी पंचायतराज कायद्यांची माहिती करून घ्यावी, असा सल्ला दिला. एवर्सन मार्टिन यांनी पंचायतीच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
माजी सरपंच पॉवसिलिप दोरादो यांनी गावात मेगा प्रकल्प नको, अशी स्पष्ट भूमिका मांडत जुना हमरस्ता डिनोटीफाय करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना सरपंच फ्रेडा डिसा यांनी सांगितले की, जुना हमरस्ता डिनोटीफाय करण्यासंबंधीचा ठराव पंचायतीने यापूर्वीच मंजूर केला आहे.दरम्यान, किल्टन कुतिन्हो यांनी किरभाट येथील प्रकल्प अधिकृतपणे रद्द करण्याची मागणी केली.
जुझे रॉक आंद्राद यांनी नक्शा सर्वेक्षणाला तीव्र विरोध दर्शवला. यावर सरपंच फ्रेडा डिसा यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या भावना आम्हाला समजतात. आमच्या गावाचे शहरीकरण होणे आम्हाला अपेक्षित नाही. शहरीकरण झाल्यास कर, इतर शुल्क वाढतील आणि ग्रामस्थांवर आर्थिक बोजा पडेल. त्यामुळे पंचायतही नक्शा सर्वेक्षणाला विरोध करत आहे.
ग्रामसभेत उपस्थित अनेक ग्रामस्थांनी नुवे गावात कोणतेही मेगा प्रकल्प नकोत, अशी ठाम भूमिका मांडली. भविष्यात अशा प्रकल्पांमुळे गावाचे स्वरूप बदलून पर्यावरण व जीवनशैलीवर परिणाम होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.