
Goa Cabinet Reshuffle
पणजी: 'गोवा मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होतील', या प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या वक्तव्याने सुरु झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री सावंत यांच्या 'फेरबदल आत्ताच नाही', या व्यक्तव्याने पूर्णविराम मिळाला आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पण मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्यामुळे सरत्या वर्षाच्या अखेरीस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला फेरबदलांच्या चर्चेला आलेले ऊत यामुळे काहीसे थांबले आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये गोव्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना ऊत आले होते. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह राज्यातील विद्यमान मंत्री आणि आमदारांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठींमुळे फेरबदल दृष्टीक्षेपात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. सरकारची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करणार? का नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार? याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. जोरदार राजकीय हालचालींमुळे फेरबदल लवकरच होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच होईल असे वक्तव्य केल्याने या चर्चांना दुजोरा मिळाला होता. कोणाला नारळ दिला जाणार आणि कोणाच्या शपथविधीसाठी पायघड्या अंधरल्या जाणार? याबाबत आडाखे बांधले जात होते. पण, यावर आत्ता खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वक्तव्य केल्याने पुन्हा या चर्चांना पूर्णविराम लागल्याचे संकेत मिळालेत.
गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप दोन वर्षांचा अवधी आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी फेरबदलाचा प्रयोग होऊ शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात. काँग्रेस आमदारांनी पक्षांतर केल्याने भाजप सध्या मजबूत स्थितीत आहे. काँग्रेसमधून आलेल्या एका आमदाराला मंत्रीपद देऊन भाजपने आश्वासन पूर्ण केले खरे पण, आणखी एका फेरबदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे.
फेरबदलाचा अंतिम निर्णय दिल्ली दरबारी होणार असला तरी राज्यातून शिफारस झालेली नावे अद्याप समोर आलेली नाहीत. भाजप प्रदेशाध्यक्ष निवड देखील येत्या काही दिवसांत होणे अपेक्षित आहे. यासाठी सात नावे निश्चित करण्यात आली आहेत. तानावडेंनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ११ जानेवारीला भाजप प्रदेशाध्यक्ष ठरण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष ठरल्यानंतरच मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता सध्यातरी वर्तवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.