
हिंदूंचेच सगळे चुकते आणि मुसलमान धर्मात सगळे आलबेल आहे असे नव्हे. मुसलमानांच्या अनेक गोष्टी चुकतात. या चुकांची त्यांना जाणीव नसते. जाणीव करून दिल्यास ते बेफिकीर असतात. इस्लाम हा अरबस्तानात टोळ्यांचे जीवन जगणार्या वाळवंटात जन्मलेला अत्यंत निर्ढावलेला (रिजिड) धर्म आहे. या धर्मात कोणतीच लवचिकता नाही. कसल्याच धार्मिक सुधारणा इस्लामला मान्य नाहीत.
ख्रिश्चन धर्मात मार्टीन ल्यूथर किंगच्या नेतृत्वाखाली धर्मसुधारणेची (रीफॉर्मेशन) चळवळ झाली. हिंदू धर्मात बौद्धांचे बंड झाले. त्यानंतर ज्याला आपण ’प्रछन्न बुद्ध’ असे संबोधतो त्या आदी शंकराचार्यांनी हिंदू धर्मातील गुणदोषांची चिकित्सक छाननी केली. बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने स्वीकारली. करुणा, अहिंसा, मुदिता, मैत्री, सर्वमंगल ही मूल्ये आत्मसात केली. यज्ञयागातील जनावरांची हिंसा थांबली. सणाउत्सवांत हिंदू धर्म शाकाहारी झाला.
या धर्माच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहासात श्रमण परंपरेतून आलेले नास्तिक, लोकायत, चार्वाक, बार्हस्पत्य, जडवादी सांख्य, अज्ञेयवादी बौद्ध व जैन, शाक्तपंथीय आनंदमार्गी या विचारधारा हिंदू धर्माने सामावून घेतल्या. संत बसवेश्वर, संत तुकाराम, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी महात्मा गांधी, रामस्वामी पेरियार, बाबासाहेब आंबेडकर यांनी ही परंपरा पुढे नेली.
मुसलमान धर्मात हमीद दलवाईचा मुस्लीम सत्यशोधक समाज व भक्तिमार्गी सुफी पंथ हे दोन अपवाद सोडले तर धर्मसुधारणेचे कोणतेच प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेले नाहीत.
इस्लाममध्ये मक्का मानसिकता व मदिना मानसिकता अशा दोन मानसिकता आहेत. मदिनात महमंद पैगंबर पराभूत होता. त्यामुळे मदिनेतला त्याचा उपदेश जहाल, आक्रमक होता. मक्केत पैगंबर जित होता. त्यामुळे मक्केतील पैगंबराचा उपदेश उदारमतवादी होता. दुर्दैवाने मदिना मानसिकतेचे भूत मानगुटीवर बसून मुसलमानांत जिहाद, दहशतवाद यासारखे प्रकार सुरू झाले.
महंमद पैगंबर हा समाजसुधारक होता व तत्कालीन अरबी समाजात त्याने खूप समाजसुधारणा केल्या. पण पुढे हा सुधारणेचा वारसा खंडीत झाला.
मुसलमान आक्रमकांनी मूर्तिभंजन केले, देवळे आणि अन्य वास्तू उद्ध्वस्त केल्या, एवढेच नव्हे तर ग्रंथालयातील दुर्मीळ पुस्तकेही जाळली. जे कुराणात सांगितलेले आहे तेच या पुस्तकात असेल तर या पुस्तकांची गरज नाही आणि जे कुराणात सांगितले आहे त्याच्या विरुद्ध काही या पुस्तकात आहे तर ही पुस्तके जाळली पाहिजेत असा हा तर्कदुष्ट कांगावा होता.
मुसलमानांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. मुस्लीम मदरशांत केवळ धार्मिक शिक्षण दिले जाते. कोणतेच आधुनिक शिक्षण दिले जात नाही. मुसलमानांत अंगभूत कौशल्ये असल्यामुळे मुस्लीम युवक - युवती स्वयंरोजगार निर्माण करतात. शिकून नोकरी किंवा अन्य ज्ञानाधिष्ठित व्यवसाय करायची भावना त्यांच्यात नसते.
मुसलमान शरीयत कायदे मानतात. देशातील नागरी कायदे त्यांना शरीयत कायद्याच्या तुलनेत गौण आहेत.
इस्लाम हा स्त्रीस्वातंत्र्य विरोधी धर्म आहे. बुरखा, तीन वेळा तलाक म्हणून पत्नीला घटस्फोट देणे, घटस्फोटितेला पोटगी न देणे असल्या अनिष्ट प्रथा मुसलमानात आहेत.
रमझानचा उपवास काही वेळा गरोदर मुस्लीम स्त्रियाही करतात. त्यामुळे त्यांच्या गर्भाची व नवजात अर्भकाची योग्य वाढ होत नाही.
भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या ३५ वर्षांच्या कालावधीत भारतीय मुसलमानांची भारतीयीकरण होण्याची प्रक्रिया सूक्ष्म पातळीवर चालू होती. पण बाबरी मशिदीचा विध्वंस व गुजरात कांड या घटनेनंतर ती प्रक्रिया थांबली. मुसलमानात प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. ते अधिकाधिक मुल्लामौलवीच्या कळपांत गेले. आपली ओळख (आयडेंटिटी) ठासून दाखवण्यासाठी मुस्लीम पुरुष आवर्जून दाढी वाढवू लागले. मुस्लीम स्त्रिया हिजाब व बुरखा पांघरू लागल्या.
फोंडा, डिचोली, वाळपई, सांगे या भागात शतकानुशतके राहणारे मुसलमान गोमंतकीय समाजात समरस झालेले आहेत. पण मुक्तीनंतर गोव्यात आलेल्या स्थलांतरित मुसलमानांनी समाजात कोणतेच सांकव न बांधता बेट बनून राहणे पसंत केले आहे.
इस्लाममध्ये अनेक इष्ट गोष्टी आहेत. आपल्या उत्पन्नाचा ठरावीक वाटा धर्मादायासाठी द्यावा असा उपदेश इस्लाम करतो. अन्नदान इस्लाम पवित्र मानते. मुसलमानात आतिथ्यशीलता आहे. ईद उत्सवात घरी केलेल्या बिर्याणीचा वास जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंतच्या घरांत बिर्याणी पाठवावी असा त्यांचा संकेत आहे.
भक्तांकडून इस्लाम वैयक्तिक शिस्तीची अपेक्षा करतो. दिवसातून पाच वेळा नमाज, दरवर्षी रमजानचा उपवास, जीवनात एकदा तरी मक्केची हाज यात्रा दर मुसलमानाला बंधनकारक आहे. इस्लामला मद्यपान निषिद्ध आहे. ख्रिश्चन धर्माप्रमाणे इस्लाम विज्ञानविरोधी नाही. भारतात ब्रह्मगुप्ताने शून्याचा शोध लावल्यानंतर इस्लामी संस्कृतीने शून्याची संकल्पना तात्काळ स्वीकारली.
नेति नेति म्हणणारी भारतीय संस्कृती व निराकाराला मानणारी इस्लाम संस्कृती यांतील तात्त्विक साम्यामुळे या दोन्ही संस्कृतींनी शून्याचा स्वीकार केला पण ईश्वरनिर्मित जगाची संकल्पना मानणार्या ख्रिश्चन धर्माने एक शतक शून्याच्या संकल्पनेला विरोध केला व शून्याचे ऐहिक महत्त्व लक्षात आल्यावर विलंबाने शून्याला स्वीकारले.
ख्रिश्चन धर्माप्रमाणे इस्लाम गर्भपात, स्टेम सेलचे संशोधन याला विरोध करत नाही.
इस्लामध्ये ख्रिश्चन धर्माला लांछनास्पद अशा इन्क्विझिशनचा इतिहास नाही. इंग्लंडमधल्या कुरूप स्त्रियांना ख्रिश्चनांनी जाळून टाकले. अशी क्रूर उदाहरणे इस्लाममध्ये नाहीत.
मुसलमानांना देवळे जरूर उद्ध्वस्त केली पण त्यात धार्मिक विद्वेषाची भावना नव्हती. देवळांमधले सोने व संपत्ती मुसलमान आक्रमकांनी लुटायची होती. महमंद गझनीने मशिदी लुटल्याची उदाहरणे आहेत. काश्मीरच्या हिंदू राजांनी देवळे लुटल्याची उदाहरणे इतिहासात आहेत.
आफ्रो अमेरिकन मुस्लीम विचारवंत हिरसा अली हिच्या म्हणण्याप्रमाणे जागतिक स्तरावर इस्लाम बदलतो आहे. सर्वप्रथम मुस्लीम समाज शिक्षणाचे महत्त्व ओळखतो आहे. मुस्लीम युवक - युवती उच्च शिक्षण घेऊन ज्ञान, विज्ञान, संशोधन यांत पारंगत होत आहेत.
मुस्लीम स्त्रिया आपल्या स्वातंत्र्याबद्दल व हक्काबद्दल जागरूक होत आहेत. पुरुषी वर्चस्व त्या झुगारत आहेत.
प्रिटिंग प्रेसच्या शोधामुळे युरोपमध्ये धर्मसुधारणा झाल्या त्याप्रमाणे इंटरनेट, सोशल मिडिया व एकूण जागतिकीकरणाची प्रक्रिया यामुळे मुसलमान समाजात इष्ट बदल होऊन हा परंपरागत समाज आधुनिक होत आहे.
नजीकच्या इतिहासात इस्लामी राष्ट्रांतील राजेशाही, शेखशाही जाऊन या राष्ट्रांत लोकशाही रुजणार आहे.
तेलाची उपयुक्तता कमी झाल्यामुळे तेलाच्या पैशांतून फोफावणारा दहशतवाद कमी होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या तंत्रज्ञानाने दहशतवादी अडचणीत आले आहेत.
पारशी समाज दुधात साखर विरघळावी त्याप्रमाणे भारतीय समाजात समरस झाला. भारतीय मुसलमानांनी पारशी समाजाचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. भारतातल्या हिंदूंनी मुसलमानांना विद्वेषाच्या बहिर्गोल भिंगातून न पाहता सहृदयेतेने पाहावे.
सच्चर समितीच्या अहवालातील सूचनांची अंमलबजावणी करून भारतीय लोकसंख्येच्या १५ टक्के् असलेल्या मुस्लीम लोकसमूहाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दर्जा उंचावण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.
भारतीय मुसलमान हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाला अस्पृश्य मानून आपली एकगठ्ठा मते काँग्रेस, समाजवादी व अन्य विरोधी पक्षांना देतात. भारतीय मुसलमानांनी बहुसंख्येने भाजपात प्रवेश केला पाहिजे असे माझे मत आहे. हिंदुत्ववादी भाजपाला मुसलमान आवडत नाहीत. पण मुसलमान मते आवडतात.
उदारमतवादी विचारांच्या लोकांनीही कौटिल्यीय धोरणाचा अंगीकार करून भाजपात प्रवेश करावा. काही वर्षापूर्वी उजवीकडे झुकणार्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाला डावे वळण लावण्यासाठी साम्यवादी नेते काँग्रेसमध्ये गेले.
उदारमतवाद्यांनी भाजप आवडत नाही. भाजपालाही उदारमतवादी आवडत नाहीत पण उदारमतवाद्यांच्या पक्ष प्रवेशातून आपल्या पक्षाची राजकीय प्रतिमा सुधारेल हे न कळण्याइतके भाजप नेते खुळे नाहीत.
भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूलतत्त्ववादी प्रभावापासून मुक्त केले पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा निधर्मी तत्त्व मनापासून स्वीकारलेला व उजवे आर्थिक धोरण असलेला पक्ष व्हायला हवा. केवळ विकास व सुशासन दिल्यास भारतीय जनता पक्ष अनेक वर्षे सत्ताधारी असू शकतो. त्यासाठी त्याला हिंदुत्वाची गरज नाही.
मुसलमानांवर बहिष्कार हा तोडगा नाही. मुसलमानांचा स्वीकार हे हिंदू मुस्लीम वैमनस्यावरचे उत्तर आहे.
शरीराचा एखादा अवयव रोगग्रस्त झाल्यास संपूर्ण शरीराचे आरोग्य धोक्यात येते. भारतीय मुसलमान हे भारताच्या सांस्कृतिक साखळीतला कच्चा दुवा होऊ नये.
हिंदुत्व ही काही सर्वकालीन, सर्वशक्तीमान संकल्पना नाही. सर्वशक्तीमान काळाने हूण, कुशाण, यवन, मुस्लीम, ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज यांना पचवले. सर्वशक्तीमान काळ - सूर्य हिंदुत्वालाही भस्मीभूत करेल. भारतातले मुसलमान सुदृढ झाल्यास आपला भारत देश बलसागर होईल.
- दत्ता दामोदर नायक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.