Goa Politics: खरी कुजबुज; काब्राल साहेब, यंदा वह्या लवकर द्या ना!

Khari Kujbuj Political Satire: गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई गुरुवारी गोवा विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण चालू असता, संपूर्ण ४५ ते ६० मिनिटे हातात निषेधाचा फलक घेऊन उभे होते.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

काब्राल साहेब, यंदा वह्या लवकर द्या ना!

‘जो जल बाढ़े नाव में, घर में बाढ़े दाम ।। दोऊ हाथ उलीचिए, यही सयानो काम ।।’ कबीर दास या दोह्यात दानी व्यक्तीलाही खरा सज्जन मानतात. आपल्याकडे असे अनेक दानशूर आहेत, जे चांगल्या कामासाठी आपली झोळी मोकळी करतात. कुडचडेचे आमदार व माजी मंत्री नीलेश काब्राल आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे दानशूर वृत्तीने मदत करतात. प्रत्येक वर्षी नीलेश काब्राल हे पहिलीपासून ते इयत्ता दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटतात. मात्र, काब्राल या वह्या शैक्षणिक वर्षानुसार जून महिन्यात वाटतात. यंदापासून शाळा एप्रिल महिन्यात सुरू होत असल्यामुळे राज्यातील विविध शाळांनी मुलांना एप्रिल महिन्यातच वह्या पुस्तके आणायला सांगितली गेली आहेत. काब्राल साहेबांनी मोफत वह्या लवकर वाटाव्यात, अशी कुडचडेतील पालकांची अपेक्षा आहे. आता पाहूया काब्राल साहेब, ही अपेक्षा पूर्ण करतात का? ∙∙∙

विरोधकांमधला बेबनाव

गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई गुरुवारी गोवा विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण चालू असता, संपूर्ण ४५ ते ६० मिनिटे हातात निषेधाचा फलक घेऊन उभे होते, त्यावेळी दारुणपणे विरोधकांमधला बेबनाव प्रकर्षाने सामोरे आला. सांगण्यात येते की, सरदेसाईंनी या खऱ्या अर्थाने एक दिवसीय अधिवेशनावर संपूर्णतः बहिष्कार घालण्याचा विचार विरोधी सदस्यांकडे बोलून दाखवला होता, परंतु त्याला पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर विरोधी नेते युरी आलेमाव यांनी अचानक सभात्यागाचा निर्णय घेतला. त्यासाठी कोणाला विश्‍वासात घेतले नाही, असा आरोप सरदेसाईंनी केला आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे सभात्यागानंतर १५ मिनिटांतच विरोधक सभागृहात परत आले. ∙∙∙

तवडकरांचा प्रभाव

आमदारांना नको झालेले गोवा राज्य विधानसभेचे सभापतिपद स्वीकारून काणकोणचे आमदार रमेश तवडकर हे जणू मोठ्या आव्हानाला सामोरे गेले, अशी धारणा गोव्यात झालीय. सभापती झाल्यानंतर काम होत नाही, म्हणून सभापती झालेले पुन्हा निवडून येणे अवघड होते, असा समज झाला होता. परंतु तो खोटा असल्याचे सिद्ध करण्याचे काम रमेशरावांनी हाती घेतल्याचे दिसते. त्यांच्या मतदारसंघातील कंत्राटी पद्धतीवर असलेल्या अनेकांची कायमस्वरूपी नोकरी करण्याची मोहीम सुरू केली असून याचे फळ मिळू लागले आहे. रमेशराव हे ज्येष्ठ आमदार असल्याने अनेक मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष त्यांच्या विनंतीला प्राधान्य देत असल्याने तवडकरांचा प्रभाव दिसू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकू येतेय. ∙∙∙

फेव्‍हिकॉल का जोड सुटणार कधी?

गोवा पोलिसात बहुतेक सर्व कर्मचाऱ्यांना एकच रोग जडलेला आहे. तो म्‍हणजे, एका जागी पोस्‍टिंग झाली की तिथून बदली झाली तरी हलायचे नाही. यामागे काहीजणांचे आर्थिक गणितही कारणीभूत असते. तर काहीजण सॉफ्‍ट ड्यूटीमुळे जागेवरून हटायला तयार नसतात. मागच्‍या वर्षी गोवा पोलिसांतील एकूण १३८४ कर्मचाऱ्यांची दुसरीकडे बदली झाली होती. पण त्‍यातील २३० कर्मचारी नव्‍या जागेवर रुजू झालेच नाहीत, ही माहिती उपलब्‍ध झाली आहे. यात मडगाव पोलिस स्‍थानकाचाही समावेश आहे. त्‍यामुळे आता मुख्‍यालय एसपी नेल्‍सन आल्‍बुकेर्क यांनी एक आदेश काढून नव्‍या ठिकाणी रुजू झाले नाही, तर फेब्रुवारी महिन्‍याचा पगार मिळणार नाही, असा फतवा जारी केला आहे. आता तरी हा न सुटणारा फेव्‍हिकॉल का जोड सुटणार का? ∙∙∙

आधीच ठरले होते!

प्रयागराज येथील महाकुंभसाठी सरकार रेल्वेंची घोषणा करते. आरक्षणासाठी एक दूरध्वनी क्रमांक जारी करते. त्यावर तब्बल बाराशेजण नोंदणी करतात. हमीपत्र भरून देतात. समाजकल्याण खाते त्याची पडताळणी करते. यासाठी केवळ दोनच दिवस मिळतात. सरकारी कार्यालये एवढी कार्यक्षम कधीपासून झाली, असा प्रश्न यातून पडू शकतो. मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही. आमदारांच्या पातळीवर कोण व कितीजण कुठून जाणार, याचे नियोजन आधीच करण्यात आले. आमदारांच्या कार्यालयांनी समाज कल्याण खात्याचे काम केले आणि गुरुवारी पहिली रेल्वेही रवाना केली. लोक मात्र, दूरध्वनी क्रमांक चुकीचा असल्यापासून तो लागत नसल्याची चर्चा करत राहिले. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; युरींच्या शुभेच्छा बॅनरवरून चर्चा

देर आए दुरुस्त आए!

सरकारी खात्याचा कारभार कसा चालतो, याचे मूर्तिमंत उदाहरण सध्या सरकारनेच पुढे आणले आहे. एखाद्या सरकारी बँकांना भाड्याने दिलेल्या स्वमालकीच्या इमारतीच्या भाड्यामध्ये सुमारे सत्तावीस वर्षे सरकार एकही पैसा वाढ करीत नाही. शिवाय भाडेवाडीचा विचारही करीत नाही आणि चाललेय ते बरे चाललेय असे म्हणत संबंधित बँकाही त्याचा फारसा विचार करीत नाही, असे दिसून आले आहे. जुन्या सचिवालयाच्या मागील बाजूस असलेल्या सरकारी खात्याच्या इमारतीत स्टेट बँकेकडून केवळ ९७३ रुपये भाडे १९९७ मध्ये घेण्याचे ठरले. ते २०२५ पर्यंत तसेच राहिले, आणि अचानक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लक्षात ही बाब आली आणि बँकेकडून १.६५ लाख रुपये भाडे घेण्याचा निर्णय घेतला, त्याशिवाय मागील सर्व थकबाकीही बँकेकडून वसूल करून घेतली जाणार आहे म्हणे. यावरून राज्य सरकारला एवढी थकबाकीची खरोखरच काळजी असेल तर सरकारने खाण कंपन्यांकडून विविध करापोटी असणारी कोट्यवधीची रक्कम वसूल करण्याकडे लक्ष घातल्यास नक्कीच सरकारी तिजोरीत पैसे आणण्याचा मार्ग खुला होईल. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, गोव्यात काय चालू आहे, ते पंतप्रधानांनी तपासावे!

लतादीदींची आठवण

कुठल्याही क्षणी म्हणे जगात कोण तरी लतादीदींचं गाणं ऐकत असतो. या महान गायिकेला विशेषणं अपुरी पडतात. आकाशवाणीच्या विविध भारतीवरून तर सकाळ पासून रात्री पर्यंत लतादीदींचा आवाज ऐकू येतो. काल लतादीदींचा स्मृतिदिन होता. पण दूरदर्शन अथवा आकाशवाणीने दीदींच्या गाण्यांचा खास नजराणा देऊन श्रध्दांजली का वाहिली नाही, असा प्रश्न अनेक रसिक करत होते. लतादीदीना वंदना करताना त्यांच्याच गाण्यांचे कार्यक्रम प्रसारित करावेत. इतरांनी न गायलेलं बरं कारण ती गाणी कठीण व सुरेलपणे पेश करणंही सोपं नाही असे गुणग्राहक दर्दी लोक म्हणतात. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com