

सांगे: एकेकाळी राज्यात दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या नेत्रावळी गावातील दूध व्यवसायाला आता उतरती कळा लागली आहे. सरकारचे दुर्लक्ष, दूध उत्पादकांना मिळणारा कमी मोबदला, पशुखाद्याचे वाढते दर आणि हिरव्या चाऱ्याची कमतरता यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. वेळीच मदतीचा हात न मिळाल्यास दूध व्यवसायाची अवस्थाही संजीवनी साखर कारखान्याप्रमाणे होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती नेत्रावळी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन म्हाळगो गावकर यांनी व्यक्त केली.
स्व. मनोहर पर्रीकर यांच्या काळात नेत्रावळी गावाची ओळख ‘दूधग्राम’ अशी होती. राज्यातील मोठ्या प्रमाणातील दूधपुरवठा या एकाच गावातून होत असे. मात्र, कालांतराने उत्पादन घटत गेले आणि व्यवसायासमोरील अडचणी वाढल्या. नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रात महालक्ष्मी, चंद्रेश्वर, महामाया आणि रामनाथ अशा चार दूध उत्पादक संस्था आहेत. मात्र, सध्या या संस्थांचा कारभारही आर्थिक अडचणींमुळे कसाबसा सुरू असल्याचे चित्र आहे.
सध्या बाजारात दुधाचा दर प्रतिलिटर ८० रुपये असताना दूध उत्पादकांना दूध महासंघाकडून केवळ ३५ रुपये मिळतात. सरकारकडून मिळणारे सहा रुपये अनुदान धरूनही उत्पादकांच्या हातात साधारण ४० रुपयेच पडतात. ग्राहकांकडून दुधासाठी ८० रुपये मोजले जात असताना प्रत्यक्ष दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित मोबदला मिळत नाही. त्यामुळे मेहनतीच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने अनेक उत्पादक या व्यवसायातून बाहेर पडत आहेत.
दुसरीकडे सरकी पेंड, पेलेट्स आणि अन्य पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. उत्पादन खर्च आणि मिळणारा मोबदला यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. हिरवा चारा मिळणेही कठीण झाले आहे.
कामगार ठेवल्यास व्यवसाय परवडत नसल्याने शेतकऱ्यांनाच दिवस-रात्र गोठ्यात राबावे लागते. परिणामी, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच अनेकजण कर्जबाजारी होत आहेत. या परिस्थितीमुळे नवीन पिढी दूध व्यवसायाकडे वळण्यास तयार नाही. खाणबंदीनंतर अनेक युवकांनी या व्यवसायात लक्ष घातले होते. मात्र, अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनीही पाठ फिरवली आहे.
पशुचिकित्सा केंद्र असूनही अनुभवी पशुचिकित्सकांची कमतरता जाणवते. नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चिकित्सकांना पाठविण्याऐवजी अनुभवी चिकित्सकांची नियुक्ती करावी, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे. एकाच पंचायत क्षेत्रात चार दूध संस्था असल्याने एका पशुचिकित्सकाला सर्व संस्थांतील शेतकऱ्यांना वेळ देणे शक्य होत नाही. कार्यालयीन कामकाज आणि प्रत्यक्ष गोठ्यांतील सेवा या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणे कठीण असल्याने किमान दोन पशुचिकित्सकांची नियुक्ती आवश्यक असल्याचे गावकर यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.