नीट-यूजी फेरपरीक्षा; काही मिनिटांच्या उशिरामुळे दोघांना प्रवेश नाकारला, म्हापसा केंद्रावर 549 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

NEET UG Exam Late Entry: परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बहुस्तरीय व कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.
NEET UG Exam Late Entry
NEET UG Exam Late EntryDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: येथील सेंट फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी काही मिनिटे उशिरा पोहोचल्याने पालकांनी गेटजवळ उपस्थित अधिकाऱ्यांकडे विनवणी केली; मात्र नियमांवर बोट ठेवत दोघांनाही प्रवेश नाकारण्यात आला. पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची (नीट-यूजी) फेरपरीक्षा रविवारी देशभरात पार पडली.

ही परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बहुस्तरीय व कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. म्हापसा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण ६९६ विद्यार्थ्यांपैकी ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १०२ विद्यार्थी गैरहजर राहिले. दरम्यान, अवघ्या काही मिनिटांच्या उशिरामुळे दोन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली.

NEET UG Exam Late Entry
NEET Exam: गोव्यात 12 केंद्रांवर 'नीट'साठी कडक देखरेख; सर्व यंत्रणा सज्ज, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

निर्धारित वेळेनुसार दुपारी १.३० वाजता परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यानंतर काही मिनिटांतच दोन विद्यार्थी केंद्रावर पोहोचले. यातील मये येथील विद्यार्थी ३ मिनिटे, तर माशेल येथील विद्यार्थी ५ मिनिटे उशिरा आला होता. मुख्य गेट बंद झाल्याने सुरक्षा रक्षकांनी दोन्ही विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यास अडवले. उपस्थित पालकांनी अधिकारी व पोलिसांकडे विद्यार्थ्यांना आत सोडण्याची विनंती केली; परंतु एनटीएच्या कडक नियमांमुळे प्रशासनाने कोणालाही प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला.

या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी म्हापसा बसस्थानकावरून बससेवा उपलब्ध असली तरी बसच्या ठरावीक वेळापत्रकामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी खासगी वाहनांचा अवलंब केला. अनेक पालक स्वतः आपल्या पाल्यांना केंद्रावर सोडण्यासाठी आले होते. मात्र, ऐनवेळी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे दोन विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, याबाबत पालकांनी हळहळ व्यक्त केली. येथे मुले व मुलींसाठी स्वतंत्र गेटमधून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येत होता.

NEET UG Exam Late Entry
NEET Exam: साडेचार हजार विद्यार्थी देणार 'नीट' परीक्षा; सरकारी यंत्रणा सज्ज, परीक्षा केंद्रांवर कदंबची विशेष बससेवा

याशिवाय विद्यार्थ्यांनी आणलेले रायटिंग बोर्ड, हातातील घड्याळ व पेन केंद्रात नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर बंदुकधारी गोवा पोलीस तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान तैनात होते. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचवण्यात आल्या. विद्यार्थ्यांना केवळ पारदर्शक पाण्याच्या बाटल्या आत नेण्याची परवानगी होती, तर प्रत्येक मजल्यावर वॉटर फिल्टरची सोय करण्यात आली होती.

चोख सुरक्षा व्यवस्था

परीक्षा केंद्राबाहेर पोलीस व शिक्षकांकडून प्रत्येक विद्यार्थ्याची कसून तपासणी करण्यात येत होती. कडक सुरक्षेचा भाग म्हणून विद्यार्थ्यांचे अवांतर साहित्य गेटवरच जमा करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात किंवा गळ्यात बांधलेले गंडेदोरे काढून ठेवण्यास सांगण्यात आले. तसेच गळ्यातील सोनसाखळी किंवा इतर धातूच्या वस्तू काढूनच प्रवेश देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com