NEET: गोव्यातील हजारो विद्यार्थी आणि पालक तणावाखाली; हुशार व प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्‍याय झाल्‍याची शिक्षकांची प्रतिक्रिया

NEET Exam Cancellation 2026: तब्‍बल दोन वर्षे ‘नीट’ परीक्षेचा प्रचंड तणावाखाली अभ्‍यास करून तयारी केल्‍यानंतरही आपण दिलेली परीक्षा व्‍यर्थ गेली.
 NEET Exam Cancellation 2026
NEET Exam Cancellation 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: तब्‍बल दोन वर्षे ‘नीट’ परीक्षेचा प्रचंड तणावाखाली अभ्‍यास करून तयारी केल्‍यानंतरही आपण दिलेली परीक्षा व्‍यर्थ गेली. त्‍यामुळे या संपूर्ण अभ्‍यासक्रमाची पुन्‍हा उजळणी करावी लागेल, या भीतीने गोव्‍यातील हजारो विद्यार्थी तणावाखाली आले असून पाल्‍यांनी या तणावाखाली येऊन जीवाचे काही बरे-वाईट करून घेऊ नये, या धास्‍तीखाली पालक आले आहेत.

नीट परीक्षा रद्द झाल्‍याची बातमी फुटल्‍यावर काल रात्रीच कुडतरी येथील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर पालकांमध्‍ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्‍या आम्‍ही आमच्‍या मुलांना एकटे सोडण्‍यासही घाबरत आहोत, अशी प्रतिक्रिया एका पालकाने व्‍यक्‍त केली. यंदा गोव्‍यातून सुमारे ५,३०० विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ (यूजी) परीक्षा दिली होती. यावेळी आलेले पेपर अत्‍यंत कठीण असे होते.

 NEET Exam Cancellation 2026
NEET Paper Leak: सीबीआयचा 'नीट' दणका; देशभर कारवाई; सहाजणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या

अशा स्‍थितीतही काहीजणांना आपल्‍याला ५०० पेक्षा जास्‍त गुण मिळणार, अशी ठाम अपेक्षा होती. हे गुण मिळाल्‍यास वैद्यकीय अभ्‍यासक्रमाचा प्रवेश नक्‍की, अशी भावना निर्माण झाली होती. मात्र, ही परीक्षाच रद्द झाल्‍यामुळे आपली सर्व मेहनत व्‍यर्थ गेली या भावनेनेच हे विद्यार्थी अधिक तणावाखाली आल्‍याचे सांगितले जाते. एका पालकाने दिलेल्‍या माहितीनुसार, बारावीनंतरच्‍या ‘नीट’ परीक्षेची तयारी विद्यार्थी अकरावीपासूनच सुरू करतात.

नियमित वर्ग त्‍यानंतर कोचिंग क्‍लासेस आणि नंतर गृहपाठ असा अगदी दगदगीचा, असा त्‍यांचा नित्‍यक्रम असतो. केव्‍हा ही परीक्षा आपण देतो आणि कधी या तणावापासून आपण दूर होतो, अशी भावना त्‍यांच्‍यामध्‍ये निर्माण होते. ३ मे रोजी ही परीक्षा दिल्‍यानंतर कित्‍येक विद्यार्थी निर्धास्‍त झाले होते. मात्र, काल ही परीक्षा रद्द होऊन पुन्‍हा घेण्‍यात येणार असल्‍याची सूचना मिळाल्‍यानंतर सर्व विद्यार्थी पुन्‍हा तणावाखाली आले.

 NEET Exam Cancellation 2026
NEET PG Goa: गोव्यात पहिला, तर भारतात 212 वा क्रमांक! आंजनेयने उंचावली ‘गोमेकॉ’ची प्रतिष्ठा; नीट-पीजी परीक्षेत दैदिप्यमान यश

‘नीट’ ही महत्त्वाची स्‍पर्धात्‍मक परीक्षा असतानाही ज्‍या गंभीरतेने या परीक्षेचे आयोजन करण्‍याची गरज असते त्‍या गांभीर्याने ती केली जात नाही. वास्‍तविक आयआयटीमध्‍ये ज्‍या तऱ्हेने ऑनलाईन परीक्षा घेतात, त्‍याच तऱ्हेची नीट परीक्षा घेण्‍याची गरज आहे. एकाचबरोबर अनेक केंद्रांवर ही परीक्षा घेतल्‍यामुळे काही ठिकाणांहून पेपर लिक होण्‍याची बरीच शक्‍यता असते, असे दामोदर विज्ञान हायर सेकंडरीचे माजी प्राचार्य राजीव देसाई म्हणाले.

प्रत्‍येक वर्षी पेपरफुटीचे प्रकार घडूनही सरकारने ही परीक्षा पद्धती फूलप्रूफ करण्‍याच्‍या दृष्‍टीने कोणतेही उपाय योजले नाहीत. या परीक्षेच्‍या तयारीसाठी विद्यार्थी अक्षरश: आपले रक्त आटवतात. अशा स्‍थितीत प्रामाणिकपणे परीक्षा देऊनही दुसऱ्याच्‍या चुकीमुळे आपल्‍याला ही परीक्षा पुन्‍हा द्यावी लागते, या भावनेमुळे विद्यार्थी निराश होतात. त्‍यातूनच ते अशाप्रकारचे टोकाचे निर्णय घेतात. या साऱ्या प्रकाराला परीक्षा यंत्रणेलाच दोषी धरणे योग्‍य आहे.

-प्रा. राजीव देसाई,

माजी प्राचार्य, दामोदर विज्ञान हायर सेकंडरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com