गोव्यातील लोकसभा उमेदवार जाहीर करण्यासाठी काँग्रेस एवढा वेळ का घेत आहे? असा सवाल आता राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हेच तर इंडिया आघाडीचे घटक पक्ष देखील विचारत आहेत. भाजपने उत्तर गोव्यातील उमेदवार जाहीर केला असून, दक्षिणेतील तिढा कायम आहे.
भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस उमेदवार जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात असून, यामुळे आता इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसने गोव्यातील दोन्ही जागा लढविण्याची घोषणा केली आहे. राज्यात काँग्रेससोबत आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) इंडिया आघाडीसोबत आहेत. आगामी लोकसभेसाठी राज्यात आघाडीच्या घटक पक्षांसोबत समन्वय समिती स्थापन केली जाईल, असे गोवा काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.
आघाडीच्या सहा मार्च रोजी झालेल्या झालेल्या बैठकीत दोन दिवसांत समन्वय समिती स्थापन केली जाईल, असे सांगितले होते. पण, अद्याप समन्वय समिती स्थापन केली नसल्याचे राष्ट्रवादी (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा म्हणाले.
गोव्यातील इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आम्ही वाट पाहत आहोत, मात्र काँग्रेस उमेदवार घोषणेसाठी विलंब करत आहे. उमेदवार जाहीर करण्यासाठी वेळ लावणे योग्य नाही, अशा शब्दात जिसोझा यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेस येत्या काही दिवसांत उमेदवाराची घोषणा करेल, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले. पक्षाने दोन्ही मतदारसंघात प्रचाराला देखील सुरुवात केल्याची माहिती पाटकर यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.