Goa Politics: खरी कुजबुज; बापरे ! पाच वर्षात गोव्यात एकशे साठ खून !

Khari Kujbuj Political Satire: गोवा रेंट-अ-कार व्यावसायिक आणि सरकार यांच्यात सध्या ‘व्हीएलडीडी’ ट्रॅकर लावण्याच्या निर्णयावरून मतभेद सुरू आहेत.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

बापरे ! पाच वर्षात गोव्यात एकशे साठ खून !

सुशेगाद राज्य म्हणून जगात मान्यता पावलेल्या आपल्या छोट्याशा गोव्यात गेल्या पाच वर्षांत १६० खून झाले. म्हणजे माणूस म्हणविणाऱ्या १६० नराधमांनी १६० जणाचे मुडदे पाडले.गोव्यात सरासरी प्रति वर्षी ३२ खून होतात. आता खुन्यांना योग्य सजा होते का? हा प्रश्न पडणे स्वाभाविक.पाच वर्षात केवळ तीन खुन्यांना सजा झाली तर चौघे खून करून निरपराधी ठरले. खून करणाऱ्या तिघांनी स्वतःचे प्राण त्यागले. तर इतर म्हटले प्रलंबित आहेत. जागा पासून वेगळा अलिप्त म्हणून गणला जाणारा आपला गोवा आता वाईट कामासाठी उजेडात यायला लागलाय. मुख्यमंत्री साहेब बाब गंभीर आहे.वेळीच विचार करा!∙∙∙

सरकार सैरभैर!

गोवा रेंट-अ-कार व्यावसायिक आणि सरकार यांच्यात सध्या ‘व्हीएलडीडी’ ट्रॅकर लावण्याच्या निर्णयावरून मतभेद सुरू आहेत. सरकारने रेंटला देणाऱ्या वाहनांसाठी हा ट्रॅकर अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला असला, तरी व्यावसायिकांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. रेंट अ कार असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आधीच ‘अदिती’ आणि ‘ऑटोकॅब’ हे ट्रॅकर बसवले आहेत. त्यामुळे आता नव्याने सरकार ‘व्हीएलडीडी’ ट्रॅकर सक्तीचा करण्याचा प्रयत्न का करत आहे, याचा गोंधळ व्यावसायिकांत आहे. आम्ही आधीच दोन ट्रॅकर बसवलेत, मग सरकारला आता तिसरा ट्रॅकर का हवा आहे, अशी विचारणा टॅक्सीवाले करताहेत. या चर्चेमुळे सरकार सैरभैर झालेय का,अशीही विचारणा व्यावसायिक करू लागलेत. ∙∙∙

कारवाईचा सरकारला सोयीस्कर विसर

चिंबल परिसरात बेकायदा बोअरवेल्स असल्याचा सरकारला शोध लागला आहे. भूजल कायदा राज्यात अस्तित्वात आहे. त्‍यानुसार बेकायदा बोअरवेल्स बंद करण्याची जबाबदारी जलस्त्रोत खात्याकडे देण्यात आली आहे. गावागावांत अशा बोअरवेल्स असून त्यातून टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. याविरोधात याआधी उच्च न्यायालयात खटला दाखल झाला होता आणि न्यायालयाने कारवाईचा आदेश दिला होता, याचा सरकारला आता सोयीस्कर विसर पडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रश्न केवळ चिंबलपुरता नाही, असे या चर्चेचे सार आहे. ∙∙∙

दिल्लीत दोतोरांचे वजन वाढले!

गोव्याला घटकराज्याचा दर्जा मिळाल्यानंतरच्या काळात जे जे मुख्यमंत्री झाले त्यात आपले सध्याचे दोतोर मुख्यमंत्री भलतेच नशिबवान मानले जात आहेत. २०१९ मध्ये त्यांना सभापतिपदावरून अचानकपणे मुख्यमंत्रिपदी बढती मिळाली. तेव्हा ते कितीकाळ या पदावर टिकतील, असा प्रश्न जो तो करत होता. पण गेल्या सहावर्षांतील त्यांची वाटचाल पाहिली तर ते दिवसेंदिवस बळकट होत चालले आहेत, असे राजकीय निरिक्षक मानतात. एक दिगंबर कामत सोडले तर अन्य कोणालाच मुख्यमंत्रिपदी पाच वर्षे पूर्ण करता आली नव्हती. पण दोतोरांनी ती केलीच व आता दिल्लीतील निवडणूक निकालामुळे त्यांचे आसन अधिकच बळकट झाल्याचे मानले जाते. आजवर ते ज्या ज्या राज्यात निवडणूक प्रचारासाठी गेले तेथे तेथे भाजप विजयी झालेला आहे. गोव्यात तर त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सगळ्याच निवडणुकांत भाजपची सरशी झालेली असल्याने पक्षांतील त्यांचे प्रतिस्पर्धी सध्या पिछाडीवर गेले आहेत. ∙∙∙

ही अतिक्रमणे नव्हेत का?

मडगावच्या बड्डे भागात वाहतुकीला अडथळा आणणारे एक अतिक्रमण हल्लीच हटविले गेले. त्यामुळे वाहतुकीत काही प्रमाणात सुसह्यपणा आलेला असला तरी त्या एकाच अतिक्रमणावर संबंधित यंत्रणा संतुष्ट झाली आहे की काय, अशी विचारणा या भागातील रहिवासी करत आहेत. कारण घोगळ-आगाळी जंक्शनवरील जे अतिक्रमण हटविले त्याच जंक्शनकडून जो रस्ता बोल्शे सर्कलकडे जातो त्या रस्त्याच्या गटारावर सर्रास दुकाने व स्टॅाल तसेच पानपट्टी व सिगरेट स्टॅाल झालेले आहेत त्यावर कारवाई का होत नाही, असा मुद्दा उपस्थित होत आहे. तेथे पूर्वी वऱ्हांडा होता त्याचा विस्तार करून तेथे सर्रास व्यावसायिक उपक्रम सुरू आहेत. त्यामुळे त्या चौकात वाहतुकीस अडथळा तयार होतो. नगरपालिकेने अशा अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्यानेच संपूर्ण बोर्डा रस्त्यावर वाहतुकीची समस्या तयार होत आहेत. खरे तर परवाच्या कारवाईवेळी सगळीच अतिक्रमणे हटवायला हवी होती. पण त्याऐवजी एकच अतिक्रमण हटविल्याने एकंदर कारवाईबाबत संशयाने पाहिले जात आहे. बोल्शे सर्कल ते होली स्पिरिट चौकापर्यंतची सगळी अतिक्रमणे हटवून सदर रस्त्यावर दुभाजक घातले तर रस्त्यावर होणाऱ्या पार्किंगलाही आळा बसेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Lottery: गोमंतकीयांसाठी खूशखबर! दररोज 15 लाख रुपये जिंकण्याची संधी; 3 कोटींची तिकिटे

खऱ्या कुजबूजची धास्ती

राज्यातून महाकुंभसाठी सोडलेल्या पहिल्या रेल्वेतून गेलेल्यांचे अर्ज आमदारांच्या कार्यालयामार्फत भरले गेल्याचे खऱ्या कुजबुजीतून उघड केल्यानंतर धास्तावलेल्या समाज कल्याण खात्याने आता रेल्वेसाठीचे अर्ज भरून घेण्यासाठी सुरवात केली आहे. पणजीत १८ जून रस्त्यावर असलेल्या समाज कल्याण खात्याच्या कार्यालयात सकाळपासून दुपारपर्यंत फूकट रेल्वेतून प्रयागराजपर्यंत प्रवास करण्याची इच्छा असलेल्यांची रांग लागल्याचे दिसते. आता राजकीय हस्तक्षेपातून बाराशेपैकी किती जण घुसतात त्याची चर्चा नंतर ऐकू येईलच. राज्य सरकारने प्रयागराज येथे कोणतीही व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली नसली तरी प्रवासासाठी इच्छूक असलेल्यांची संख्या मात्र वाढती आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: ‘USA’त भारतीयांचा सन्मान राखण्यात सरकार अपयशी, अमित पाटकरांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

दादांचा दैवी योग

मडगावात झालेल्‍या सारस्वत महोत्सवाच्या उद्‍घाटनाला मडगावचे बाबा विधानसभा अधिवेशन सुरू असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. तो मान नगरसेवक असलेल्या कोंबातल्या दादांना मिळाला हे यापूर्वीच याच स्‍तंभात छापून आले आहे. मात्र, आता या उद्‍घाटन सोहळ्यात दादांनी भाषण करताना हे उद्‍गार काढले, त्‍याबद्दल चर्चा होऊ लागली आहे. या महोत्‍सवाचे उद्‍घाटन करण्याचे भाग्य मला योगायोगाने मिळाले असे सांगत, योगायोग जुळून येण्यामागे एखादा दैवी संकेत असतो, असे चंद्रकातबाब केणी म्हणायचे असे दादांनी सांगितले. मात्र, दिगंबर कामतांच्या अनुपस्थितीत सारस्वत महोत्सवाचे उद्‍घाटन करण्याची संधी मिळण्यामागे कसला दैवी संकेत आहे, हे मला माहीत नसल्याचे दादा बोलले. दादांनी केलेले हे भाषण उत्‍स्‍फूर्त होते की, त्‍यामागेही काही कारण लपलेले होते ?, दुसरे म्‍हणजे, दिगंबर कामत गटाला हे भाषण म्‍हणजे केवळ योगायाेग वाटणार का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com