

पणजी: गोव्यातील आलिशान भाड्याच्या व्हिलांमधून देशभरातील नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांत वळविणारे कथित आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी रॅकेट मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे. या प्रकरणातील दोन स्वतंत्र टोळ्यांशी संबंधित संशयित आर्थिक व्यवहारांची व्याप्ती सुमारे ९०० कोटी रुपये असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
दोन व्हिलांवरील कारवायांत २२ जणांना अटक करण्यात आली असून, परदेशातील सूत्रधारांचा शोध सुरू आहे. तपासानुसार, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील भाड्याच्या व्हिलांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध खात्यांत हस्तांतरित करण्यासाठी केला जात होता. या प्रकरणाचे धागेदोरे दक्षिण मुंबईतील एका संशयास्पद कार्यालयापर्यंत पोहोचले. तेथून उघडण्यात आलेली बँक खाती आणि संबंधित सिमकार्डे गोव्यात पाठविली जात असल्याचे तपासात आढळल्याचे वृत्त आहे.
१८६ सायबर गुन्ह्यांशी संबंध?
पहिल्या कारवाईत आढळलेल्या बँक खात्यांचा देशभरातील १८६ सायबर गुन्ह्यांशी संबंध असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते. तसेच सुमारे ७,५०० बँक खात्यांमधील १२० कोटी रुपये गोठविण्यात आल्याची माहिती आहे.
दुबईतील सूत्रधारांचा संशय
या कथित रॅकेटचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहोचल्याचा पोलिसांना संशय आहे. दुबईस्थित व्यक्तींकडून गोव्यातील सदस्यांना सूचना दिल्या जात असल्याचा आरोप आहे. संशयित सूत्रधारांची ओळख, परदेशातील संपर्क आणि पैशांच्या व्यवहारांची साखळी शोधण्याचे काम सुरू आहे. सुमारे ९०० कोटी रुपयांचा आकडा संशयित व्यवहारांच्या अंदाजित व्याप्तीशी संबंधित असून, प्रत्यक्ष फसवणुकीची अंतिम रक्कम आणि आरोपींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होईल.
एका क्लिकवर अनेक खात्यांत पैसे
या कथित रॅकेटमध्ये ‘बँकर पॅनेल’ नावाच्या अॅपचा वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या माध्यमातून एका खात्यातील रक्कम एकाच वेळी अनेक खात्यांत हस्तांतरित केली जात असल्याची शक्यता तपासली जात आहे. इतर व्यक्तींच्या नावावरील अशा मध्यस्थ खात्यांना ‘म्यूल अकाउंट्स’ म्हटले जाते. काही व्यक्तींना पैशांचे आमिष दाखवून त्यांची खाती वापरण्यात आल्याचा, तर काहींवर दबाव टाकण्यात आल्याचा संशय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.