

सासष्टी: भाजप सरकारच्या राजवटीत अन्य क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्रालाही भ्रष्टाचाराचा विळखा पडला आहे, असा आरोप दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केला.
‘नीट’ परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण हे भ्रष्टाचाराचे ज्वलंत उदाहरण आहे. ही परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे देशातील सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे, असे मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फर्नांडिस म्हणाले.
यावेळी दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष आसिस नोरोन्हा, काँग्रेस प्रदेश समिती पदाधिकारी एवर्सन वालीस, मडगाव काँग्रेस गटाध्यक्ष सावियो कुतिन्हो आणि युवा नेते लिंडन उपस्थित होते.
यंदा देशभरातील ५७०० केंद्रांवर सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. या प्रक्रियेसाठी सरकारने मोठा खर्च केला. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचाही त्यात मोठा सहभाग होता. त्यांची मेहनत, वेळ व पैसा पाण्यात गेला, अशा शब्दांत फर्नांडिस यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
पेपरफुटीप्रकरणी जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. ज्या राज्यांमध्ये पेपरफुटी झाली, त्या राज्यांतील शिक्षणमंत्र्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे फर्नांडिस म्हणाले.
भाजप सरकार भ्रष्टाचारात अडकलेल्या व्यक्तींवर कारवाई करत नसल्याचा आरोप करताना त्यांनी गेल्या वर्षीच्या पेपरफुटी प्रकरणाचाही उल्लेख केला. एनटीएचे तत्कालीन महासंचालक सुबोध कुमार सिंग
यांना पदावरून हटविण्यात आले होते; मात्र नंतर त्यांची एका भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा दावा कॅ. फर्नांडिस यांनी केला.
दरम्यान, काँग्रेसचे कुशावती जिल्हाध्यक्ष राजेश वेरेकर यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत देशातील विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या ९० हून अधिक घटना घडल्या असून त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होत चालला आहे.
विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव वाढला
विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांवर पेपरफुटीमुळे पाणी फेरले गेले आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव वाढला असून त्यातून आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडत असल्याचे फर्नांडिस यांनी नमूद केले.
तक्रारीकडे पोलिसांनी केले होते दुर्लक्ष
२०२४ मध्येही अशाच प्रकारे पेपरफुटी झाली होती आणि त्यावर संसदेत चर्चा झाली होती. मात्र ‘त्या’ शिक्षणमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी न स्वीकारता इतरांवर दोष ढकलला होता. दरम्यान, यावेळी राजस्थानमध्ये परीक्षेपूर्वीच पेपरफुटीबाबत तक्रार करण्यात आली होती; मात्र पोलिसांनी ती नोंदवून घेतली नसल्याचा आरोपही फर्नांडिस यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.