

वास्को: मुरगाव पालिका क्षेत्रात सुमारे ४० जीर्ण इमारती धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. त्यात पालिकेच्या मालकीच्या काही इमारतींचाही समावेश आहे. खासगी जीर्ण इमारती मालकांनी हटवण्यासाठी पावले उचलावीत अशी पालिकेची अपेक्षा असली तरी पालिका आपल्याच जीर्ण इमारतींबाबत फार गंभीर नसल्याने जीर्ण झालेल्या खासगी इमारतीचे मालक पालिकेला जुमानत नाहीत.
पालिकेने पाठविलेल्या नोटिसांना हे मालक कोणतेही उत्तर देत नाहीत. त्यामुळे पालिकेला आता ठोस कृती करण्याची गरज आहे. येथे काही जीर्ण इमारतीच्या पदपथावरून लोकांची ये-जा चालू असते. या इमारती रस्त्यालगत असल्याने त्याबाबत नेहमी चिंता व्यक्त करण्यात येते. जीर्ण इमारती पाडण्यात याव्यात यासाठी मुरगाव पालिका प्रत्येक वर्षी नोटिसा देते. परंतु त्या नोटिसांना संबंधित किंमतच देत नसल्याचे दिसून येत आहे.
अंतर्गत रस्त्याकडेला असलेल्या हॅप्पी अपार्टमेंटच्या दोन बाल्कनी ऑगस्ट महिन्यात रस्त्यावर कोसळल्या. सुदैवाने त्यासमयी रस्त्यावर वाहने, पादचारी यांची ये-जा नसल्यान मोठी आपत्ती टळली होती. ही इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक ठरल्याने येथे कोणी राहत नाही. मात्र तळमजल्यावर दोन दुकानदार व्यवहार करीत होते.
मात्र बाल्कनी कोसळल्यावर त्यांना दुकाने बंद करावी लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्या बाल्कनी कोसळल्यावर तेथील अर्धाअधिक रस्त्यावर बॅरिकेड्स ठेवण्यात आल्या. जेणेकरून त्या इमारतीच्या खालून कोणी जाऊ नये हा उद्देश आहे. मात्र या रस्त्याच्या एका बाजूने वाहनांची ये-जा सुरू आहे. या इमारतीसंबंधी कधी व कोणता निर्णय घेण्यात येईल असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जीर्ण इमारतींसंबंधी आमदार कृष्णा साळकर यांनी दखल घेतली आहे. त्या इमारती पाडण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. येणाऱ्या दोन महिन्यात योग्य कृती होईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्या इमारतींची स्थिती पाहता आम्हाला लोकांच्या जीविताची काळजी आहे.
सुमारे ४० इमारतींपैकी चार-पाच इमारतींची परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे त्या इमारती पाडण्यासाठी आपण दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इग्ना क्लिट्स यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यानुसार त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.