Morjim: आभाळ फाटले, तरी झोपडीमध्ये चतुर्थीला आवडत्या श्री गणरायाचे पूजन करण्याची किमया मालपे डोंगर माळरानावर झोपड्या उभारून राहिलेल्या वानरमारे कातकरी समाजाने केली आहे. निदान पुढच्या वर्षीपर्यंत तरी घर मिळू दे, अशी याचना या समाजातील मंडळी करत आहेत.
गेल्या 35 वर्षांपासून रावराजे देशप्रभू यांच्या जमिनीमध्ये मालपे डोंगर माळरानावर झोपड्या उभारून हा समाज वास्तव्य करत आहे. ना वीज, ना पाणी, ना कोणत्याही मूलभूत सुविधा. सरकारी योजनेचा लाभ आज ना उद्या मिळेल, अशा आशेवर जे मिळेल ते काम किंवा रोजंदारी करून ही मंडळी दिवस कंठत आहेत. या ठिकाणी 50 पेक्षा जास्त वानरमारे समाजाचे सदस्य राहतात. येथील झोपडीत लहान मुलांपासून ज्येष्ठ सदस्यही राहातात. त्यांना रानटी प्राण्यांपासून धोका आहे. कधी कधी सरपटणारे प्राणी त्यांच्या अंथरुणात येतात.
देणाऱ्यांचे हात हजारो पण-
या भटक्या समाजाची सरकारकडे नोंदणी नाही. त्यांना मतदानाचा अधिकार नाही. रेशन कार्डचा तर पत्ताच नाही. काही जणांकडे रेशन कार्ड आहे. काही जणांकडेच आधार कार्ड आहे. मात्र इतरांचे काय? सरकारच्या योजना सोडाच सरकार कोणाचे आहे, हेही त्यांना माहीत नाही. या समाजाला मदत करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. कुणी झोपडीला ताडपदरी घालून दिली, कोणी सोलार विजेची सोय केली, कुणी पाण्याची सोय करतो, कोणी जुने कपडे देतो, कोणी भांडीकुंडी, कडधान्यही देतात.
जन्म दाखल्यांचा पत्ताच नाही
येथील अनेक मुलांचे जन्म रानावनात झाल्याने त्यांची कुठेच जन्म नोंदणी नाही. त्यामुळे त्यांना जन्मदाखले देताना किंवा मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड बनवताना खूप अडचणी येत आहेत. सरकारने याची नोंद घेऊन या भटक्या जमातीचा सर्वे करून त्यांना योग्य न्याय देण्याची गरज आहे.
आकर्षक सजावट: येथील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या श्रीमंत वा मध्यमवर्गीयांच्या घरात जेवढी सजावट नसेल, तेवढी सजावट वानरमारे समाजाच्या गणपतीसमोर करण्यात आली आहे. या मंडळींनी वाद्यांच्या तालावर गणपतीचे विधिवत पूजन केले. येथील सर्व बालगोपाळांकडे पाहिल्यास त्यांच्या नजरेत विलक्षण चमक आणि त्यांच्यात उत्साह, आनंद भरल्याचा दिसून येतो.
ना उन्हाची पर्वा, ना पावसाची तमा, अशा स्थितीत ही मंडळीत जीवन कंठत आहेत. राहायला आसरा नाही, घालायला व्यवस्थित कपडे नाहीत, दोन वेळचे जेवणही मिळत नाही. आरोग्याची समस्या तर नेहमीचीच सरकारकडे आमची नोंदणीच नसल्याने कसल्याही प्रकारच्या सरकारी योजना आम्हाला मिळत नाहीत. हे दु:ख बाजूला ठेवून त्याची चतुर्थीत झोपडीमध्येच गणरायाची प्रतिष्ठापना केली. पुढच्या वर्षी तू येण्याअगोदर आम्हाला पक्के निवासस्थान मिळू दे, असे मागणे ही मंडळी देवाकडे करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.