Goa Updates: खातेवाटपाला पाडव्याचा मुहूर्त

आज शक्यता: पर्यटन, वाहतूक खात्यांसाठी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच
CM pramod sawant
CM pramod sawantdainik gomantak
Published on
Updated on

पणजी: मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन 5 दिवस झाल्याने सर्वांनाच आता खातेवाटपाचे वेध लागले आहेत.  मात्र, सर्वच मंत्र्यांना वजनदार आणि महत्त्वाची खाती हवी असल्याने यासाठी वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज, शनिवारी गुढीपाडवा असल्याने या शुभ मुहुर्तावर मंत्र्यांना खाते दिली जातील, अशी माहिती आहे. सोमवारपर्यंत सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, वजनदार खात्यांसाठी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झाले. 10 मार्चला मतमोजणी झाली. त्यानंतर 28 मार्चला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. ही सारी प्रक्रिया कूर्मगतीने होत आहे.

CM pramod sawant
संगणक प्रणाली बंद असल्याने मडगाव पालिकेत करदात्यांचा खोळंबा

आता मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊनसुद्धा खातेवाटपाला मुहूर्त मिळत नसल्याने विरोधी पक्षासह लोकांमध्येही नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांनी आता तरी खातेवाटप करावे, असे लोकांचे मत आहे. अखेर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी सोमवारपर्यंत सर्व मंत्र्यांना खाते मिळतील, अशी माहिती दिली. मात्र, गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर सर्वांना खाती मिळतील, अशी शक्यता आहे. अर्थात शपथविधी घेतलेले सर्व आठही मंत्री भाजपचे असून त्यांना मंत्रिमंडळाचा अनुभव आहे. त्यामुळे या सर्वांनाच वजनदार आणि महत्त्वाची खाती हवी आहेत. त्यामुळे खातेवाटपासाठी वेळ लागत असल्याची माहिती मिळाली.

गृह खाते सावंत, की राणेंना?

विश्वजीत राणे हे मंत्रिमंडळातील दोन नंबरचे मंत्री बनल्याने त्यांना गृह किंवा अर्थ खात्याबरोबरच आरोग्य खाते हवे आहे. अर्थात, या खात्यावर इतरही अनेक मंत्र्यांचा डोळा आहे. मात्र, गृह खाते आणि अर्थ खाते मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, विश्वजीत राणे यांना गृह खाते मिळण्याची शक्यता आहे.

विस्तार पुढील आठवड्यात

मंत्रिमंडळामध्ये अजून तीन खाती रिक्त असून यासाठी तीन अपक्ष, दोन मगोप आमदार मंत्रिपदासाठी दावेदार आहेत. पक्षाच्या महिला आमदाराला यातील एक खाते मिळण्याची शक्यता आहे. याबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा झाली असून त्याला केंद्रीय पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

CM pramod sawant
मुरगाव परिसरात 570.53 कोटींचे 11 प्रकल्प पूर्ण

नगर नियोजनही चर्चेत

नगर नियोजन खात्याबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. हे खाते बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे यांना हवे आहे, तर महसूल खात्याचा अनुभव असणाऱ्या रोहन खंवटे यांनाही तेच खाते मिळू शकते. याशिवाय गोविंद गावडे यांना पूर्वीचे कला आणि संस्कृती, सुभाष शिरोडकर यांना शिक्षण माहिती तंत्रज्ञान, माविन गुदिन्हो यांना पंचायत आणि वाहतूक ही खाती मिळण्याची शक्यता आहे.

तीन जागा रिक्तच

मंत्रिमंडळामध्ये अद्यापही तीन रिक्त जागा असून या जागांवरच्या मंत्र्यांना ही खाती द्यावी लागतील. त्यामुळे त्यांची खाती सध्या तरी मुख्यमंत्र्यांकडेच राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com