पणजी: पणजी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आमदार बाबूश मोन्सेरात यांनी अखेर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान त्यांच्यासोबत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे , महापौर रोहित मोन्सेरात, भाजपाचे पणजी मंडळ अध्यक्ष नगरसेवक शुभम चोडणकर आदी नेत्यांची उपस्थिती होती.(MLA Babush Monserrat candidature application filed today for Goa Assembly Election)
दरम्यान, बोलताना मोन्सेरात यांनी सांगितले की "पणजीच्या लोकांना कोण लोकप्रतिनिधी हवा याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे. त्याचमुळे मतदानाद्वारे ते योग्य तो निर्णय घेतील. आपण आपले काम करत असून पणजीच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे काम , राज्याचा झालेला विकास आणि आपले काम याच्या बळावर आपण लोकांना आपणास मते देण्याचे आवाहन करत असल्याचे सांगून उत्पल पर्रीकर किंवा इतर कोणीही निवडणूक लढवत असले तरी तो त्यांचा हक्क असून आपण कोणालाही कमजोर उमेदवार समजत नाही . सर्वच मजबूत उमेदवार आहेत. मात्र पणजीचे लोकच काय तो निर्णय घेणार असल्याचे मोन्सेरात म्हणाले .आपले ध्येय लोकांची सेवा करणे हे असून पणजीचे लोक आपल्याला नक्कीच पाठिंबा देतील असेही ते म्हणाले."
राज्यभरातील सर्व मतदारसंघात भाजपाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. 40 ही मतदारसंघात भाजपा निवडणूक लढवत असून. केंद्र सरकारचे काम व गोवा सरकारचे काम आणि गोव्याचा झालेला भरीव विकास याच्या बळावर पुन्हा एकदा गोव्यात भाजपाचे सरकार सत्तेवर येणार असल्याचेही यावेळी तानावडे म्हणाले.
लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपचे
वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना आपण सल्ला देऊ शकत नाही . मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पार्सेकर यांनी बंडखोरी करू नये यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगून उत्पल पर्रीकर यांच्या बाबतही तोच प्रयत्न सुरू असल्याचे तानावडे यांनी पार्सेकर व उत्पल पर्रीकर यांच्या बाबत पत्रकारांनी विचारले असता सांगितले. सिद्धेश नाईक हे भाजपाचे नेते आहेत. अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी असे मलाही वाटत होते. मात्र केंद्रीय निवडणूक समिती जो निर्णय घेईल तो प्रदेश समितीला मान्य करावा लागतो .आणि पक्षाचे काम करावे लागते . भाजपचे अनेक असे नेते आहेत त्यांनी कधीही आमदारकीची अपेक्षा बाळगली नाही. देशहितासाठी, पक्षहितासाठी आपले सर्वस्व दिले आहे . त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष न सोडता पक्षासाठी काम करावे . त्यांच्या कामाची दखल पक्ष केंव्हा ना केव्हा घेईल. असेही तानावडे याप्रसंगी बोलताना म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.