
मडगाव: मी स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष सोडला असा माझ्यावर आरोप केला जातो. मात्र या आरोपात तथ्य नाही. मी काँग्रेसबरोबर शेवटपर्यंत निष्ठेने राहिलो. मात्र मी काँग्रेसमधून बाहेर पडावे, अशी स्थिती काँग्रेसने माझ्यावर आणली त्यामुळेच मला पक्ष सोडावा लागला.
ज्या काँग्रेससाठी मी पाच वर्षे स्थिर सरकार दिले त्याच काँग्रेसने मी जेव्हा कायद्याच्या कचाट्यात सापडलो त्यावेळी कसलीही मदत न करता मला वाऱ्यावर साेडले, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त मंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कामत म्हणाले, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा राजकीय स्थिती कशी होती हे सर्वांनाच माहीत आहे. अगदी तारेवरची कसरत करीत मी पाच वर्षे स्थिर सरकार दिले. २०२२ च्या निवडणुकीतही एकटाच आमदार असूनही मला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पक्षाने घोषित केले नाही.
विजय सरदेसाई तसेच अन्य काही नेते आपण मडगावातून निवडणूक लढविणार असे सांगतात याबद्दल तुमचे मत काय असे विचारले असता, गेली ३२ वर्षे मला मडगावचे मतदार निवडून देताहेत. मी कसा हे त्यांना पूर्ण माहीत आहे. मडगावकरांवर,श्री दामोदरावर माझा ठाम विश्वास आहे,असे कामत म्हणाले.
पण माझा स्वभाव असा की, मी कुणावरही राग धरणारा माणूस नाही. मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर मी मंत्री म्हणून काम केले होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कसलाही आकस नव्हता, असे म्हणत पत्रकार आणि राजकारणी मला देवाचा माणूस म्हणतात. जर मी देवाचा माणूस असेन तर कुणावरही मी आकस कसा धरू शकेन? माझ्या या स्वभावामुळेच मी मुख्यमंत्री असताना मला मवाळ मुख्यमंत्री म्हणायचे. म्हणूनच काल चर्चिल आलेमावनी स्वत: माझ्या घरी येऊन माझे अभिनंदन केले. मला ही अपेक्षाही नव्हती, असे कानत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.