मायकल लोबोंमुळे काँग्रेसला फायदा की तोटा?

माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा, ॲन्थनी मिनेझीस यांनी आता तृणमूलची वाट धरली आहे.
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak

पणजी: भाजपचे माजी मंत्री मायकल लोबो काँग्रेसमध्ये आल्यामुळे कळंगुट कॉंग्रेसमध्ये अपेक्षेप्रमाणे बंड झालेच. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा, ॲन्थनी मिनेझीस यांनी आता तृणमूलची वाट धरली आहे. यामुळे आता भूमिकांत बदल झाला आहे. वरवर या तीन नेत्यांचे कॉंग्रेसमधून बहिर्गमन पक्षाकरीता तोटा वाटत असला तरी लोबोच्या आगमनामुळे झालेल्या फायद्यापुढे हा तोटा कमी वाटतो. (Michael Lobo Congress Latest News)

Michael Lobo
Goa Politics: मनोज परब यांना चोरून रेकॉर्डिंग करण्याची सवय

हे तिन्ही नेते तसे लोबोंच्या विरोधात होते. आग्नेल फर्नांडिस हे कळंगुटचे माजी आमदार. 2002 व 2007 अशा दोन निवडणुकांतून त्यांनी कळंगुट मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. मात्र, 2012 साली त्यांना मायकल लोबोंकडून (Michael Lobo) पराभव स्वीकारावा लागला होता. कळंगुट हा तसा कॉंग्रेसबहुल मतदारसंघ. भाजपला कळंगुटमध्ये प्रवेश मिळाला तो लोबोंमुळे हे सत्य नाकारता येत नाही. 2017 साली तर भाजपचे मोहरे धारातीर्थी पडत असताना लोबोंनी कॉंग्रेसच्या जोजेफ सिक्वेरांवर तब्बल 7311 मतांनी ‘बंपर’ विजय मिळविला होता. हे विसरता कामा नये. त्यामुळे आग्नेल वा जोजेफनी कॉंग्रेस सोडली म्हणून लोबोंवर परिणाम होईल असे वाटत नाही.

तृणमूल व कॉंग्रेसच्या (Congress) संघर्षात कळंगुट परत भाजपच्या हाती लागू शकतो असा तर्क काहीजण व्यक्त करीत आहेत, पण हा तर्क अमलात येईल असे वाटत नाही. याचे कारण म्हणजे लोबो भाजपमध्ये आल्यानंतर कॉंग्रेसची शक्ती तशी बरीच कमी झाली आहे. कॉंग्रेसच्या हातात लोबोंच्या रूपाने एक मोठे ‘घबाड’ लागले आहे असेच म्हणावे लागेल. कळंगुट मतदारसंघातील जवळ जवळ सर्व पंचायती जिल्हा पंचायती या लोबोंच्या कह्यात आहेत. त्यामुळेच कळंगुटमध्ये भाजपपेक्षा लोबोंचेचे वर्चस्व दिसत होते. तसा कॉंग्रेस गलितगात्र अवस्थेत आहे. त्यांना लोबोंच्या रूपात ‘तारणहार’ सापडला आहे. शिवोलीबाबत बोलायचे, तर अजुनपर्यंत एकदाही हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या पदरात पडलेला नाही.

पर्वरीत लोबोंची डाळ शिजेल असे वाटत नाही. तिथे भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या रोहन खवटेंनी आपली अशी ‘ताकद’ निर्माण केली आहे. या ताकदीचा भेद करणे लोबोंना जमेल असे दिसत नाही. थिवीत ‘वेट ॲण्ड वॉच’ अशीच स्थिती दिसते आहे. एकंदरीत ‘बंड’ होऊनसुध्दा लोबोंमुळे बार्देशात कॉंग्रेसची शक्ती वाढणार आहे हे निश्चित. मात्र, निवडणुकीनंतर ही शक्ती भाजपच्या कामाला येते की नाही हे सांगणे सध्या कठीण आहे हेच खरे.

शिवोलीत रंगणार अटीतटीची लढत

शिवोलीत कॉंग्रेसची ताकद अतिशय अल्प आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहेच. लोबोंची पत्नी दिलायला यांना उमेदवारी दिली म्हणून शिवोली कॉँग्रेसला मिळू शकेल अशातला भाग नाही, पण दिलायलाची उमेदवारी कॉंग्रेसला जिंकण्याच्या आशा पल्लवीत करू शकेल एवढे मात्र खरे. तिथे आता कॉंग्रेस व भाजपमध्ये अटीतटीची लढत होऊ शकते.

Michael Lobo
Excise Department: अबकारी खात्यातर्फे धाडसत्र सुरूच

साळगावातही लोबोंची जादू शक्य

हळदोणेचे चित्र अजूनही स्पष्ट झाले नसले, तरी तिथेही समीकरणे बदलण्याची शक्यता दिसत आहे. साळगाव मतदारसंघातही लोबोंची जादू चालू शकते. मागच्या वेळी तत्कालीन मंत्री दिलीप परुळेकरांना पराभूत करून लोबोंनी आपला ‘करिश्मा’ दाखविला होताच. यावेळीही हा करिश्मा रंग दाखवितो की काय हे बघावे लागेल.

म्हापसा काँग्रेसला मिळण्याचे संकेत म्हापसा, हळदोणे या मतदारसंघातही लोबो कॉंग्रेसला ‘तारक’ ठरू शकतात. बार्देशमध्ये कॉंग्रेस तशी नगण्यच होती. 2019 साली झालेली म्हापशाच्या पोटनिवडणुकीत याचकरता कॉंग्रेसला सुधीर कांदोळकरांना उमेदवारी द्यावी लागली. म्हापशात खरे तर गुरुदास नाटेकर, रमाकांत खलप कॉंग्रेसची अनेक बडी धेंडे आहेत, पण तरीही हा महत्वाचा मतदारसंघ कॉंग्रेसपासून दूर होत चालला आहे. यावेळी लोबोंच्या म्हापशात असलेल्या ‘वजना’मुळे म्हणा वा भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे म्हणा म्हापसा कॉंग्रेसला मिळू शकतो असे संकेत मिळताहेत.

- मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com