
कळंगुट: गोवा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे विविध मार्गांनी अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात येत आहेत, ज्यामुळे अनेक स्थानिक तरुण व्यसनाधीन होत असल्याची चिंता कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मंगळवारी (दि.१) व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कळंगुट येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित एका जागरूकता कार्यक्रमात ते बोलत होते.
लोबो म्हणाले की, "अंमली पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणांहून, वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांनी गोव्यात आणले जातात आणि येथील तस्करांना पुरवले जातात. त्यांच्यामुळे आमचे विद्यार्थी अंमली पदार्थांच्या व्यसनाचे बळी ठरत आहेत."
त्यांनी विशेषतः १६ ते २२ वयोगटातील विद्यार्थ्यांवर ड्रग्जचा सर्वाधिक परिणाम होत असल्याचे सांगितले. या वयोगटातील मुलांना ड्रग्जची सहज उपलब्धता असल्यामुळे ते अधिक बळी पडतात. लोबो यांच्या मते, "विद्यार्थ्यांना समुद्रकिनाऱ्यांवर, क्लबमध्ये किंवा पार्ट्यांमध्ये ड्रग्ज देऊ केले जातात. सुरुवातीला ते मोफत दिले जातात आणि जेव्हा विद्यार्थी त्याचे व्यसनी होतात, तेव्हा त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. सुरुवातीला ते त्यांच्या पॉकेटमनीतून खर्च करतात. जर तो पुरेसा नसेल, तर ते मित्रांकडून पैसे मागू लागतात आणि कधीकधी चोरीचा मार्गही अवलंबतात."
अंमली पदार्थांच्या सवयीसाठी पैसे मिळवण्यासाठी अनेक तरुण चोरीसारख्या गुन्हेगारी कृत्यांकडे वळत असल्याचे लोबो यांनी निदर्शनास आणले. "हडफडे-नागोवा येथे असे अनेक तरुण आहेत जे आपल्या अंमली पदार्थांच्या सवयीसाठी चोरी करत आहेत," असे लोबो यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांना 'नाही' म्हणण्याचे आवाहन केले, जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित राहील.
गोव्यामध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहेत. तरुणाईला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालक, शिक्षण संस्था आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे लोबो यांनी अधोरेखित केले. अशा जनजागृती कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजू शकतील आणि ते व्यसनापासून दूर राहण्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.