
कदंब वाहतूक महामंडळाने ‘कॅशलेस’ बससेवा सुरू करून आधुनिकतेकडे पाऊल टाकले पण आता अधिकारी ‘नॉट रिचेबल’ होताहेत, असे ग्राहक बोलू लागलेत. ग्राहक सांगतात की, महामंडळातील अधिकाऱ्यांची फोन उचलण्याची सवयच आता गेलेली आहे. पणजीत सुरू झालेली कॅशलेस सेवा नियमित ग्राहकांना ‘बस नाही, बघा फक्त!’ या नव्या अनुभवाकडे ढकलत आहे. अनेक प्रवाशांकडे डिजिटल पेमेंटची सुविधा नाही, त्यामुळे बस समोर असतानाही त्यांना चक्क तिथेच उभे राहावे लागते. ही तांत्रिक युगातील गंमत समजावी का त्रास, हे प्रवाशांनाच ठरवावे लागेल. अधिकाऱ्यांचे फोन लागतात, पण ते उचलत नाहीत. या कॅशलेस सेवेवर उत्तर देणे टाळण्यासाठी अधिकारी फोन उचलत नाहीत असे ग्राहक आता सर्रास बोलत आहे. आधी कॅशलेस सेवा आणि आता अधिकारी स्वतःच ‘नॉट रिचेबल’ झाल्याने ‘कदंब’ची सेवाही नॉट रिचेबल झाल्याची टिप्पणी ग्राहक करू लागलेत. ∙∙∙
राज्यातील ड्रग्जचा बीमोड करण्याचा तसेच गोवा हे ड्रग्जमुक्त करण्याचा संकल्प सरकारने अनेकदा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात ते शक्य झालेले नाही. पोलिसांनी केलेल्या कारवाईत यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. यावरून राज्यात ड्रग्जवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा कमी पडत आहे, असेच दिसून येते. गोवा हे पर्यटन राज्य आहे, त्यामुळे गोव्यातून ड्रग्जचा नायनाट करणे अशक्य असले तरी त्याची दरवर्षीची होणारी उलाढाल रोखण्यास तरी सरकारने प्रयत्न केलेले दिसत नाहीत. ड्रग्ज गोव्यात विविध मार्गाने येतात. मात्र, तेथेही ते कमी पडत आहेत. ड्रग्जची विक्री थेट काही हॉटेलमध्येही उपलब्ध होत असल्याने पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही कोलमडली आहे. झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाने काही स्थानिकही या ड्रग्ज व्यवसायात गुंतले असल्याने पोलिस यंत्रणा हतबल ठरत आहे. राज्यात सिथेंटिक ड्रग्ज कमी प्रमाणात असले तरी गांजाची विक्री वाढली आहे. गांजाप्रकरणी अटक झाली तर जामीन मिळतो, हे विक्रेत्यांना माहीत असल्याने त्याचे भय राहिलेले नाही. ∙∙∙
‘सनबर्न’ महोत्सवस्थळी लाळेच्या चाचणीत पाचजणांनी ड्रग्ज सेवन केल्याचे आढळले. पोलिसांची ही कारवाई जरी दक्षता दाखवत असली तरी हा आकडा पाहिल्यास खूपच कमी म्हणता येईल! या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थिती लावतात, हे तितकेच विशेष ! परंतु, हा ड्रग्ज कार्यक्रमस्थळी पोहचला कसा? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. विरोधकांनीही या ईडीएमवर टीका करताना, वेळोवेळी या महोत्सवाचे नाव ड्रग्जशी जोडले. अशावेळी या प्रकाराला नेमके जबाबदार धरायचे कुणाला? असा सवाल पडतो. याच महोत्सवळी एक तरुण बेशुद्ध झाला, जो कालांतराने इस्पितळात उपचार सुरू असताना मरण पावला. अद्याप त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला नसला तरी, वरील घटनांमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे, एवढे नक्की. ∙∙∙
फोंड्यातील कोणत्याही सरकारी कार्यालयात गेलात तर तिथे तुम्हाला खुर्च्या रिकाम्या अन् कार्यालयात शुकशुकाट, असे वातावरण दिसेल. विचारले तर कर्मचारी रजेवर आहेत, असे उत्तर हमखास मिळते. आता एवढ्या सामूहिक रजा द्यायच्या असतील तर कार्यालये उघडी तरी कशाला ठेवता, असा प्रश्न लोक विचारू लागलेत. त्यापेक्षा इतके दिवस सरकारी कार्यालये बंद राहतील असा फलकच कार्यालयाच्या बाहेर लावून टाका, म्हणजे आमची फेरी तरी टळेल, असा सल्लाही नागरिक देऊ लागलेत. त्यांची तरी काय चूक म्हणा, दुरून यायचे आणि बघायचं काय तर रिकाम्या खुर्च्या असं झाल्यावर लोक वैतागणारच. त्यापेक्षा नागरिकांनी सुचवलेला हा मार्ग सरकारने अंमलात आणून लोकांची ‘सुटका’ करावी, मुख्यमंत्रीसाहेब आपण ऐकताय ना....? ∙∙∙
काणकोणातील लोलये कोमुनिदादीची बैठक अशीच नवी समिती निवडण्यासाठी बैठक झाली व तीत समितीची एकमताने निवड झाली अन् अनेकांना धक्का बसला. कारण या संस्थेच्या जागेत फिल्मसिटी होण्याचे घाटत आहे. सरकारने त्याला तत्वतः मान्यताही दिली आहे. पण या प्रकल्पाला विरोध करणारे गेले अनेक दिवस म्हणे ही बैठक सुरळीत होऊ नये, म्हणून आटापिटा करत होते. नवी समिती त्या प्रस्तावाला विरोध करणारी यावी, म्हणून हा आटापिटा होता. पण प्रत्यक्षात नवी समितीही फिल्मसिटीला अनुकूल असल्याचेच संकेत या निवडीतून दिसले. त्यामुळे विरोधकांनी या बैठकीकडे फिरकणे टाळले. अन् निर्वाचन अधिकाऱ्यांना हायसे वाटले खरे. ∙∙∙
राज्यात नववर्ष स्वागतासाठी अनेक लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. किनारी भागासह राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात पार्ट्या सुरू झाल्या आहेत. परंतु या पार्ट्यांना जाणारे सांगतात की, बरोबर रात्री १० वा. पार्ट्या बंद होतात, त्यामुळे नियमांचे पालन होत आहे. परंतु या अशा कर्णकर्कश पार्टीचे आयोजन न करता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळीत प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवत नवा पायंडा पाडला आहे. महेश काळेंच्या या गायन मैफलीचे मोठ्या प्रमाणात स्वागतही केले जातेय. पुढीलवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यातील इतरही भागात नववर्ष स्वागतासाठी होतात, की केवळ साखळीच अपवाद ठरणार हे कळेलच, परंतु या निर्णयाची मात्र राज्यभरात चर्चा आहे.. ∙∙
राज्यात तीव्र विरोध होत असतानाही सनबर्नला सरकारने अखेर परवागनी दिलीच, पण शेवटी जी भीती होती ती खरी ठरली. या ‘सनबर्न’मध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाल्यामुळे गोव्याची सगळीकडे नाचक्की झाली. सरकार सध्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्याचे कमी पण महोत्सव आयोजन करण्यावर भर देत आहे. जनता दरबारसारखे कार्यक्रम राबवून लोकांच्या डोळ्यांना पाने पुसण्याचे प्रकार होत असतानाच सनबर्नसारख्या मोठ्या कार्यक्रमांना केवळ निधी मिळतो म्हणून मान्यता देणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे. ‘सनबर्न’मध्ये जो धांगडधिंगा चालतो, तो सर्वश्रूत आहे, पण सरकार हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून चिडीचूप आहे. ∙∙∙
गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना होईल, काहींना वगळणार तर काही नवे चेहरे समाविष्ट केले जातील, अशी चर्चा गेले अनेक महिने माध्यमांतून तसेच लोकांतही सुरू आहे. आता अनेक समाजमाध्यम समूहांवरून नजर फिरविली, तर ही मंडळी गोवा मंत्रिमंडळाची फेररचना करून मोकळी झाल्याचे दिसून येते. त्यांनी एका मंत्र्याला वगळून व दोन महिलांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. तेवढ्यावर ही चर्चा थांबत नाही, तर एकाला उपमुख्यमंत्रिपदी बढती दिल्याचे दिसते. मात्र, ही चर्चाच ठरेल का,ते लवकरच दिसून येईल. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.