Ramakant Khalap Interview: गोव्याचे प्रश्‍न लोकसभेत प्रखरपणे मांडायचेत; खलप यांची विशेष मुलाखत

Ramakant Khalap Interview: मी गोवा मुक्तीपासून, विलीनीकरण, भाषा चळवळ, घटक राज्य या सर्व घटनांंचा साक्षीदार आहे. हा गोवा घडताना मी पाहिला आहे - खलप
Ramakant Khalap Interview
Ramakant Khalap InterviewDainik Gomantak

North Goa Congress Loksabha Candidate Ramakant Khalap Special Interview

गोव्याचे असे अनेक प्रश्‍न आहेत जे लोकसभेत बुलंदपणे मांडणे गरजेचे आहे. त्या प्रश्‍नांना वाचा फोडणे गरजेचे आहे त्यासाठी मला लोकसभेत जायचे असून मी विरोधी बाकड्यांवर बसेन की, सत्तापक्षात यापेक्षा मला लोकांचे प्रश्‍न मांडण्यासाठी लोकसभेत गोमंतकीय जनतेचे प्रतिनिधित्त्व करायचे आहे, असे प्रतिपादन उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांंत खलप यांंनी सांगितले.

ते संपादक-संचालक राजू नायक यांनी ‘गोमन्तक टीव्ही’वर घेतलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान, खलप म्हणाले, मी गोवा मुक्तीपासून, विलीनीकरण, भाषा चळवळ, घटक राज्य या सर्व घटनांंचा साक्षीदार आहे. हा गोवा घडताना मी पाहिला आहे. त्यामुळे मी गोवा जाणतो, जरी मी वयस्कर झालो असलो तरी मी जाणकार आहे, मला तरूणाई तसेच ज्येष्ठ नागरिकांशी सदोदित स्नेह लाभला आहे.

मी जिथे-जिथे प्रचारासाठी जात आहे, तिथे-तिथे उत्तम प्रतिसाद लाभत आहे. माझ्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्यामुळे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात मला ओळखणारे माझे हितचिंतक आहेत. त्यांच्याकडूनही चागला प्रतिसाद मला लाभत आहे.

लोकशाहीत काहीही घडू शकते. जनता कुणाच्या हातात सत्ता देऊ शकते, हे सांगता येत नाही. देशाच्या जनतेने तसे अनेकदा केले आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींपाशी शासकीय शक्ती, तंत्रज्ञान सर्व काही हात जोडून उभे असताना उठसूठ पक्षफोडी का करतात? लोकशाहीच्या अनुषंगाने ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे खलप यांनी सांगितले.

Ramakant Khalap Interview
Heatwave Alert: गोव्यात समुद्र किनाऱ्यावर जाताय? थेट ऊनाचा संपर्क टाळा, भरपूर पाणी प्या, सनस्क्रीन वापरा

असाध्य कामे साध्य केली

माझ्या कार्यकाळात मी पूल बांधणी, कोकण रेल्वेसाठी प्रयत्न केला. अनेक प्रश्‍न मांडले. माझ्या भाषणाच्या जोरावर अनेक असाध्य कामे साध्य झाली. मला केंद्रात मंत्रिपदही मिळाले त्यामुळे मी जे कार्य केले आहे, ते निश्‍चितपणाने अधिक आहे.

मी सदोदित सर्व पक्षियांशी मैत्रिपूर्ण संबंध ठेवले आहेत. त्यामुळे आता दिल्ली वाऱ्यांमध्ये घट झाली असली तरीही आजही ओळखणाऱ्या व्यक्ती आहेत, असे खलप यांनी सांगितले.

‘मगो’चे मतदार माझ्यासोबत

‘मगो’पक्षाबाबत मी बोलत नाही, कारण त्यांचे एक मंत्री आणि आमदार सरकारमध्ये आहेत. परंतु मागील अनेक वर्षे केलेले कार्य नागरिकांच्या स्मरणात आहे त्यामुळे मगो पक्षाचे पारंपरिक मतदार आजही मला मानतात ते निश्‍चितपणाने मला मतदान करतील, असे ॲड. खलप यांनी सांगितले.

Ramakant Khalap Interview
Urrak Feni Production: हुर्राक, फेणी गाळप घटले; व्यावसायिक हवालदिल, बोंडू उपलब्ध होत नसल्याने परिणाम

...तर गोव्यात बेरोजगारीच नसती !

गोव्यात आयटी पार्क व्हावा यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले. गोव्यात आयटी खात्याची स्थापना माझ्याकरवी झाली आहे. मला ‘स्मार्ट गोवा’ अपेक्षित आहे. ई- प्रशासन, ई- शिक्षण, आयटी यात गोवा अग्रेसर व्हावा यासाठी माझे प्रयत्न आहेत.

आयटी महामंडळाची स्थापना करण्यासाठी अध्यक्षपदासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विनंती केली होती. तसेच नारायण मूर्ती, विजय भटकर यांना मंडळ सदस्य म्हणून बोलविले होते.

जर ती योजना यशश्‍वी झाली असती तर गोवा आयटी केंद्र बनले असते, गोव्यात एकही व्यक्ती बेरोजगार राहिली नसती, असे ॲड. रमाकांंत खलप यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com