Goa Politics: ऐन चैत्रात युतीवरून ‘शिमगा’! प्रियोळ भाजपकडेच, मान्‍य नसेल तर निघा; मुख्‍यमंत्र्यांचा मगोपला इशारा

Goa MGP BJP Alliance: मुख्‍यमंत्र्यांच्‍या विधानानंतर मगोप अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनीही प्रत्‍युत्तर दिले. ‘१९९९ला युती तुटली होती तेव्‍हा पक्षाला सुदिन यांच्‍या रूपात नवा चेहरा मिळाला’, असे म्‍हणाले.
Pramod Sawant, Deepak Dhavlikar
Pramod Sawant, Deepak DhavlikarDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: ‘येत्या विधानसभा निवडणुकीत प्रियोळात केवळ भाजपचाच उमेदवार असेल’, असे सांगताना ‘जर युती मान्‍य नसेल तर निघा’, असा थेट इशारा मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘मगोप’ला दिला. या विधानानंतर ऐन चैत्रात ‘युती’वरून शिमगा सुरू झाला आहे. प्रियोळ येथे शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते.

यावेळी आमदार गोविंद गावडे तसेच प्रियोळ भाजप मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी भाजपने मांद्रेवर आपला दावा सांगितला आहे व आता प्रियोळवर ठाम असल्‍याचे सांगून मगोपला आव्‍हान दिल्‍याचे मानले जात आहे. मुख्‍यमंत्र्यांच्‍या विधानानंतर मगोप अध्‍यक्ष दीपक ढवळीकर यांनीही प्रत्‍युत्तर दिले. ‘१९९९ला युती तुटली होती तेव्‍हा पक्षाला सुदिन यांच्‍या रूपात नवा चेहरा मिळाला’, असे म्‍हणाले. मंत्री गावडे यांनी मुख्‍यमंत्र्यांच्‍या विधानावर समाधान व्‍यक्‍त केले आहे; तर बजेटमध्‍ये सर्वाधिक निधी मिळालेले सुदिन ढवळीकर यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे.

मुख्‍यमंत्री सावंत म्‍हणाले...

प्रियोळ मतदारसंघ हा केवळ भाजपचाच असून तो भाजपकडेच राहील. देशात आणि राज्यात सध्या डबल इंजिन सरकार कार्यरत असून गोव्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरघोस निधी दिला आहे, त्यामुळे गोव्याचा झपाट्याने कायापालट होत आहे.

आता डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणुका तर त्यानंतर मार्चमध्ये पालिका निवडणूक होणार आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होतील. जनता भाजपसोबत आहे. यावेळेला गोवा पूर्ण भाजपमय होईल.

सर्वांना सोबत घेऊन गोव्याचा विकास साध्य करणारे भाजप सरकार असून या पक्षासोबत राहायचे असेल तर रहा, अन्यथा युती तोडा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सुनावले.

Pramod Sawant, Deepak Dhavlikar
Goa Politics: मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ; ढवळीकरांनी स्पष्ट केले युतीचे गणित

मोदी, शहा, गडकरींमुळे युती; कार्यकर्त्यांसमोर बोलावेच लागते

१मगोप आणि भाजपची युती झाली ती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत!

२ केंद्रीयमंत्र्यांनी १९९९ ते नंतरच्या काळाचा आढावा घेतला. मगो - भाजपची यापूर्वी निवडणुकीत झालेली युती लक्षात घेऊनच मगोचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

३केंद्रीयमंत्री तसेच पंतप्रधानांकडून तशी काही सूचना आल्यास आम्ही ती पाळू. मगो आणि भाजप युतीत तसा कोणताही बेबनाव नाही. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलले ते भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात, जेथे कार्यकर्त्यांशी तसे बोलावेच लागते.

Pramod Sawant, Deepak Dhavlikar
Goa Politics: "राहायचं नसेल तर निघून जा!" मुख्यमंत्र्यांनी मगोला पुन्हा डिवचले, प्रियोळात केला एल्गार!

मगोपचाही पक्षविस्‍तार सुरू; दीपक ढवळीकर

आमच्या नेत्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध आहेत. आमची सर्व कामे मुख्यमंत्री करतात. पण त्यांनी असे विधान का केले याचे उत्तर माझ्याऐवजी तेच चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. त्यांच्यातील अंतर्गत बाबींमुळे ही विधाने येण्याची शक्यता आहे, असे मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकरांनी प्रस्‍तुत प्रतिनिधीला सांगितले. मात्र, वारंवार मुख्यमंत्र्यांकडून अशी विधाने होत आहेत. भाजप मगोपवर दबाव टाकत आहे का? ह्या प्रश्नावर उत्तर देताना, मगोपचेही पक्ष बांधणीचे काम सुरू आहे. ७ ते ८ मतदारसंघांत मगोपचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. तुम्हाला एका घटनेची मुद्दामहून आठवण करून देतो की १९९९सालीही युती तुटली होती. त्यावेळी मडकईत सुदिन ढवळीकरांचा राजकीय जन्म झाला. आजपर्यंत सुदिन मगोचे कार्य पुढे नेत आहेत. भविष्यात जर युती तुटली तर सुदिनसारखे अन्य नेते जन्माला येतील, जे पक्षाची पढील वाटचाल सुकर करतील.

भाजप प्रदेशाध्‍यक्षपदाची धुरा मी हाती घेतल्‍यानंतर सर्व मतदारसंघांत भाजपचे मेळावे आयोजित करण्‍यात आले आहेत. जनसंपर्क वाढवला जात आहे. मुख्‍यमंत्री लोकोपयोगी कार्य करत आहेत. आम्‍हाला पुढे जायचे आहे. जे सोबत येतील त्‍याचे नेहमीच स्‍वागत राहिले आहे. सध्‍याचे संपर्क मेळावे आगामी विधानसभेची प्राथमिक तयारी आपण म्‍हणू शकता.

दामू नाईक, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com