Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Khari Kujbuj: जिल्हा पंचायत निवडणुका राज्यातील सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल असेही त्याची जाहिरातबाजी केली आहे.
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

मेस्सी गोव्यात आला असता तर !

अर्जेटिनाचा स्टार फूटबॉलपटू मेस्सी गोव्यात आला असता तर, काय झाले असते, असा प्रश्‍न आता येथील फुटबॉलपटूंना नक्कीच पडला असेल. मेस्सी भारतातील फुटबॉल चाहत्यांना भेटण्यासाठी आला होता. कोलकाता, हैदराबाद, दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी स्टेडियममध्ये तो उपस्थित राहणार, असे नियोजन खासगी कंपनीने केले होते. कोलकात्याला स्टेडियममध्ये जो गोंधळ झाला तो लोकांचा राग होता. त्याला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी तिकीट दर होते. भेटण्यासाठी १० लाख रुपये आकारण्यात आले. गोव्याचा प्रमुख खेळ फुटबॉल असला तरी असे सिलेब्रेटी खेळाडू येथे आणले जात नाहीत तेच बरे. जर मेस्सी गोव्यात आलाच असता तर, जर त्याला पाहण्यासाठी तिकीट आकारली असती तरीही येथील फुटबॉलप्रेमींनी निश्चितच गर्दी केली असती. पण या प्रेमींच्या नशीबी असा क्षण कधी येणार कोणास ठाऊक? ∙∙∙

बिचारे पोलिस...

जिल्हा पंचायत निवडणुका राज्यातील सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल असेही त्याची जाहिरातबाजी केली आहे. पोलिसांवर सर्वच पक्षांनी भलतीच जबाबदारी सोपविली आहे. आमचा उमेदवार जिंकून येणार का याचा रिपोर्ट द्या, असे सुनावले आहे. आज शनिवारी निवडणूक आहे. पोलिस आपल्या सोयीनुसार विशेषता सत्ताधारी भाजपाला ‘भिवपाची गरज ना’ असा रिपोर्ट देत आहेत. शेवटी नोकरी आहे. ‘रूलिंग पार्टी’शी पंगा घेऊन चालणार नाही, हे पोलिसांनाही चांगलेच माहिती आहे. ∙∙∙

सुदिनरावांची भिस्त आपल्या कार्यकर्त्यांवर...!

राज्यात मगो - भाजपची युती असली तरी भाजपाने मगोला केवळ तीनच जागा दिल्या आणि इतर सर्वांवर आपला ताबा ठेवला. या तीनपैकी दोन जागा ह्या फोंडा तालुक्याला मिळाल्या. यंदा जिल्हा पंचायतीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने जिंकण्यासाठी प्रचारावर भलताच भर दिला. त्यात या राजकीय पक्षांचे बडे नेते प्रचारात काळवेळ न पाहता कार्यरत राहिले, अपवाद होता फक्त मगो नेत्यांचा. मगो कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. फक्त त्यांचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे कुठेच प्रचारासाठी उतरले नाहीत, आपल्या कार्यकर्त्यांवरच त्यांनी भिस्त ठेवली आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा विश्‍वास सार्थ ठरवला. खरे म्हणजे सुदिनबाबना प्रचारात उतरायची गरजच नाही, कारण मडकई आणि इतर भागात ते लोकप्रिय आहेत, खरे ना!∙∙∙

स्मित हास्य अन् हस्तांदोलन!

गोवा मुक्तीदिन कार्यक्रम गोवा विद्यापीठ आवारात आयोजित केला होता. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव दोन्ही प्रमुख नेते उपस्थित होते. भाषण आणि पदक वितरणाच्या कार्यक्रमानंतर ज्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आसनव्यवस्थेच्या ठिकाणी आले तेथे विरोधी पक्षनेते बसले होते. मुख्यमंत्री आणि सावंत यांच्यात हस्तांदोलन झाले आणि स्मितहास्य करून दोघेही एकमेकांशी काही बोलले मुक्तीदिन हा कार्यक्रम राजकीय कुरघोडीचा वा कुरापती काढण्याचा नव्हे... हे कृतीतून दाखवून दिले. एकंदर जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारे चित्र येणे हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आणि दोन नेत्यांमधील परिपक्वता दिसत असल्याची चर्चा सर्वत्र रंगलीय. ∙∙∙

सरदेसाईंच्या घोषणेचा परिणाम?

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासमवेत युतीची पत्रकार परिषद घेतली. तेव्हा जिल्हा पंचायतीसाठी ग्रामीण विकास खातेच रद्द करून जिल्हा पंचायतीशी ते जोडायचे, असा त्यांनी मनोदय जाहीर केला होता. त्यासाठी राज्यात फॉरवर्ड-काँग्रेसचे सरकार सत्तेत हवे, अशीही त्यांनी पुस्ती जोडली होती. ग्रामीण विकास खात्याचा मंत्री कार्यक्षम लागतो, तरच त्या खात्यातर्फे नक्की काय उपक्रम चाललेत ते कळते. अन्यथा या खात्याची फारशी दखल घेतली जात नाही, असेच चित्र असते. असो सरदेसाईंनी कल्पना मांडल्यानंतर राज्य सरकार आता या खात्याचा महिला विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावरून कदाचित सरदेसाईंनी केलेल्या घोषणेचाच हा सकारात्मक तरी परिणाम आहे, म्हणायचे का? ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

काब्राल आणि पिंटी आमने सामने

सार्वजनिक ठिकाणी व विशेष करून आपल्या पुढे समाचार चॅनल चा कॅमेरा असल्यावर आपण काय बोलावे, याचे भान आपल्या राजकारण्यांनी ठेवायला हवे. काल कुडचडे काकोडा पालिका मंडळाच्या बैठकीत आमदार नीलेश काब्राल व माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांच्यात जुंपली. आमदार काब्राल यांना पालिका बैठकीत बोलण्याचा अधिकार नाही त्यांना बाहेर काढा, अशा शब्दांत नगरसेवक होडारकर यांनी गोंधळ घालण्यात सुरवात केली.काब्रालही आपल्या रागावर ताबा ठेवू शकले नाही तू गेलो रे तेल लायत" असे काब्राल यांनी म्हणताच भांडण वाढले.. बिचारे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रमोद नाईक यांना बैठकीत चर्चा पुढे नेताना नाकी नऊ आले. खरे म्हणजे आमदाराला पालिका बैठकीत हजर राहण्याचा व चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असतो, मात्र मतदानाचा अधिकार नसतो. आमदाराच्या अधिकारावरून पिंटी यांनी गोंधळ घातल्याने बैठक बरीच तापली. नगरसेवक पिंटी व काब्राल यांच्यातील विळया-भोपळ्याचे वैर सगळ्यांना माहीत आहे. मात्र, पालिका बैठकीत लहान मुलांसारखे भांडणे योग्य आहे का? असा प्रश्न लोकांना पडला आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

केस आहे, पण चालू ठेवा

सरकार लोकांना म्हणत होतं की, तुम्ही जे पाहत होतात ते तुमचं डोळ्यांचं भ्रम होता आणि आज ‘बेकायदेशीर काहीच नाही’, ‘किनाऱ्यावर सगळं कायदेशीरच चालतं’,‘अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत’ असं ठासून सांगणारे सरकारच ती आस्थापने बंद पाडते. आता लोक मात्र शांतपणे डोकं खाजवत म्हणतायत, मग काल आम्ही जे ओरडलो, ते नुसतं गाणं होतं का? कारण आज बंद करण्यामागचं कारण बेकायदेशीर असेच आहे. म्हणजे आज सरकारच अप्रत्यक्षपणे कबूल करतंय की, लोक जे बोलत होते त्यात तथ्य होतं. ‘तुमच्यावर केस आहे, पण चालू ठेवा’ हा गोव्याचा नवा पर्यटन ब्रँड होऊ नये, इतकीच अपेक्षा लोक व्यक्त करू लागले आहे. आता खरा प्रश्न असा की, सरकार अपेक्षेला खरे उतरेल? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com