पर्यटन व्यवसायातील टॅक्सी हा घटक महत्त्वाचा मानला जातो. परंतु विविध कारणांनी टॅक्सी व्यवसायावरून होणारे तंटे व वाद यावर मात करण्यासाठी प्रत्येक टॅक्सी चालकाला दोन आठवड्यांचे प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. यामध्ये वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच पर्यटक, ग्राहकांशी तसेच लोकांशी सौजन्याने वागण्याचे धडे दिले जातील, अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आज दिली.
ते म्हणाले, ‘गोवा टॅक्सी ॲप’साठी अधिसूचित केलेले दर अधिक असल्याने टॅक्सी चालकांकडून नोंदणीला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. लोकांची ‘गोवा माईल्स’ला अधिक पसंती आहे. ‘गोंयच्या टॅक्सीचो पात्रांव’ योजनेखाली काही बेरोजगार युवकांना एकही पैसा न गुंतवता टॅक्सी उपलब्ध करून दिल्या आहेत.
ते युवक चांगल्या प्रकारे व्यवसाय करत आहेत. पेडण्यातील काही युवकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे व ते प्रति महिना 50 ते 70 हजार रुपये कमवत आहेत. ‘गोवा माईल्स’ची नोंदणी असलेल्या या टॅक्सी चालकांना चांगला व्यवसाय मिळत आहे.
ॲपशी जोडलेले असल्याने त्यांना प्रवास भाडे मिळण्यात मदत होते. यावरून राज्यातील युवकही परिश्रम करण्यास पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
तीन पर्याय उपलब्ध
गोवा माईल्स, गोवा टॅक्सी ॲप तसेच मोपा विमानतळावरील ब्ल्यू टॅक्सी असे अनेक पर्याय ग्राहकांना आहेत.
कोणत्याही ॲपवरून नोंदणी करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रवास दर कमी असतील, तेथे ग्राहक पसंती देतील.
सद्यस्थितीत ‘गोवा माईल्स’चे दर इतर टॅक्सी ॲपपेक्षा कमी आहेत. त्यामुळे या ॲपला उत्तम प्रतिसाद लाभतो.
दुसऱ्या भाड्यासाठी आता थांबताही येणार
टॅक्सी ॲपद्वारे प्रत्येक चालकाला राज्यात कोठेही भाडे घेऊन जाता येईल. तसेच ज्या ठिकाणी तो भाडे घेऊन जाईल तेथे त्याला दुसऱ्या भाड्यासाठी थांबताही येणार आहे.
प्रत्येक चालकाला कोणत्याही भागात ‘ॲप ॲग्रेगेटर’शी नोंदणी करून टॅक्सी भाडे मिळवता येणार आहे.
टॅक्सी व्यवसाय ॲपच्या मदतीने केल्यास फायदेशीर आहे. चालकांना ‘राऊंड द क्लॉक’ ॲप सुरू ठेवल्यास भाडेही सहजपणे मिळू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.