

मडगाव: येथे माल वाहतूक वाहनधारकांकडून जी सोपो वसुली केली जाते, तिला ऑल गोवा एफएमसीजी डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनने विरोध करत मडगावमधील व्यापाऱ्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. मालवाहू वाहनांवरील सोपो वसुली तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच सोपो वसुली करणारे तथाकथित कंत्राटदार ‘माफिया पद्धतीने’ काम करत असून व्यापाऱ्यांमध्ये भीती व दहशत निर्माण करत असल्याचा युवा नेते प्रभव नायक यांचा दावा संघटनेने मान्य केला आहे.
मडगावमधील व्यापाऱ्यांकडून विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकडून, सोपो वसुली दारांकडून होत असलेल्या दमदाटी व गैरवर्तनाबाबत सतत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभव नायक यांनी २० एप्रिल रोजी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन सादर केले होते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, फातोर्डा व कुडतरीचे आमदार तसेच मडगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांना पाठवून या वसुलीच्या कायदेशीरतेबाबत चौकशीची मागणी केली होती.
सोपो वसुलीदारांकडून होणाऱ्या दादागिरीच्या दाव्याला अधिक बळ देण्यासाठी ‘मडगांवचो आवाज’ने ज्येष्ठ व्यापारी अरुण प्रभाकर देसाई, युवा उद्योजक समर्थ तळावलीकर तसेच असोसिएशनचे सचिव चेतन कापडी आणि अध्यक्ष डॅरिल परेरा यांचे व्हिडिओ प्रसारित केले. त्या सर्वांनी या चित्रफितीत सोपो वसुलीदारांकडून होत असलेल्या दादागिरीच्या घटना स्पष्टपणे सांगितल्या. तसेच मडगाव नगरपालिकेला अशाप्रकारची वसुली करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, यावर प्रश्न उपस्थित केला होता.
ही सोपो वसुली प्रणाली अन्यायकारक, मनमानी व भेदभाव करणारी असल्याचे व्यापारी संघटनेने स्पष्ट केले आहे. गोव्यातील इतर कोणत्याही नगरपालिकेत अशी पद्धत अस्तित्वात नसताना केवळ मडगावमध्येच ही वसुली का केली जाते, असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या प्रणालीमुळे व्यापारावर विपरीत परिणाम होत असून कोणतीही पारदर्शकता किंवा जबाबदारी नसल्याचा दावा व्यापारी संघटनेने केला आहे.
मडगाव नगरपालिकेने नियुक्त केलेल्या सोपो कंत्राटदाराशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या काही व्यक्तींनी प्रभव नायक यांनी ‘माफिया’ असा उल्लेख केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर या व्यक्तींनी नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन करणारा व्हिडिओही प्रसिद्ध केला होता.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना नायक यांनी सांगितले की, संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने मडगाव पोलिस निरीक्षकांनी त्यांना तोंडी संपर्क साधून पोलिस स्थानकात बोलावले होते. ‘मी माझ्या वकिलाचा सल्ला घेतला असून योग्य ती कायदेशीर पावले उचलेन. मी घाबरणार नाही किंवा गप्प बसणार नाही. मडगावच्या व्यापाऱ्यांसोबत उभा राहून या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध लढा सुरूच ठेवेन’, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.